महिला रुग्णांसाठी गुड न्यूज : कोरोनाग्रस्तांसाठी स्वतंत्र वार्ड

प्रल्हाद कांबळे
Saturday, 26 September 2020

कोरोनाग्रस्त महिला रुग्ण आणि पुरुष रुग्ण एकाच वार्डात उपचार घेत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. कोरोना बाधितांमध्ये महिलांचीही संख्या लक्षणीय आहे. मात्र कोरोनाग्रस्त महिला रुग्ण आणि पुरुष रुग्ण एकाच वार्डात उपचार घेत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात काही अप्रिय घटना घडु नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी महिला कोरोना रुग्णांसाठी आता कोवीड सेंटरमध्ये स्वतंत्र वार्ड तयार करण्याच्या सुचना शासकिय व खासगी रुग्णालयाना दिल्या आहेत. 

कोरोना बाधित महिलांवर उपचार करण्यासाठी शासकीय व खासगी रुग्णालयांनी स्वतंत्र वार्ड तयार करून तेथे तपासणीसाठी महिला कर्मचारी नेमावेत असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी काढले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यात महिला रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. महिला व पुरुष रुग्णालयात एकाच वार्डात उपचार घेत असल्याने महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेला येत आहे.

महिलांच्या उपचार व सुरक्षिततेसाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नियुक्त

दोन महिन्यापूर्वी पनवेल येथे डॉक्टर असल्याचे सांगून एका तरुणाने कोवीड सेंटरमधील एका महिलेवर अतिप्रसंग केला होता. अशा व अन्य अप्रिय घटना टाळण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व कोवीड सेंटर, महानगरपालिका, नगरपालिका, रुग्णालय ग्रामीण, तालुका रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, खासगी रूग्णालय आणि अन्य ठिकाणी रुग्ण उपचार घेत आहेत. तेथे महिला व पुरुष यांच्यावर उपचारासाठी वेगळी व्यवस्था करावी. महिला रुग्णांची सुरक्षितता उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. महिला रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय संस्थांनी स्वतंत्र महिला वार्ड निर्माण करावा. आणि तेथे महिलांच्या उपचार व सुरक्षिततेसाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नियुक्त करावेत असेही आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे प्रत्येक रुग्णालयांना महिलांसाठी वेगळा कक्ष व वेगळे कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत.

हेही वाचा - शौर्यदिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार -

विजेचा शॉक लागल्याने एका महिलेचा मृत्यू, दोघीजणी गंभीर

हदगाव : शेतावर मजुरी करणाऱ्या महिलांचा शेतात काम करताना विजवाहक तारांना स्पर्श झाल्याने त्यातील एक महिला जागीच गतप्राण झाली तर दोघींना गंभीर दुखापत झाली आहे. ती घटना हदगाव शहर परिसरात शुक्रवारी (ता. २५) सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली.

हदगाव पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद 

श्री दत्तबर्डी देवस्थानच्या वाटेगाव रोडवर असलेल्या शेतांमध्ये आठ महिला शेतमजुरीचे काम करीत होत्या. सोयाबीन कापणी करीत असताना अचानक या सर्व महिलांच्या हाताला वीज पुरवठा करणारी तार लागल्याने यात त्यांना जोराचा शॉक लागला.  या दुर्घटनेत विजेच्या धक्क्याने सत्वशिला वाठोरे (वय ४०) ही महिला जागीच गतप्राण झाली. तर तिच्या सोबत असलेल्या विमल कोल्हे व गिताबाई चौरे या दोघीजणी गंभीर जखमी झाल्या. त्या दोघींना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी हदगाव पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for female patients: separate wards for coronary heart disease nanded news