तीनशे रुपयांसाठी युवकाचा खून!

file photo
file photo

सेलू (जि. परभणी) : पैशाच्या देवाणघेवाणीतून चार जणांनी मिळून एका युवकाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना कुंडी (ता. सेलू, जि. परभणी) येथे बुधवारी (ता. १८) रात्री साडेअाठच्या सुमारास घडली. घटनेनंतर चारही आरोपी स्वत:हून रात्रीच पोलिस ठाण्यात हजर झाले.

मृताची अाई प्रयागबाई डंबाळे (रा. कुंडी, ता. सेलू, जि. परभणी) यांनी सेलू पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांचा मृत मुलगा राहुल देविदास डंबाळे (वय ३५) याने घराशेजारील राहणारे एकनाथ डंबाळे यांना ६०० रुपये उसणे दिले होते. मंगळवारी (ता.१७) सकाळी दहा वाजता दवाखान्यात जायचे काम पडल्याने राहुलने एकनाथ डंबाळे यांना पैसे मागितले. त्यांनी तीनशे रुपये दिले. राहिलेले तीनशे रुपयांवरून राहुल अाणि एकनाथ डंबाळे यांच्यात शिवीगाळ होऊन भांडण झाले. बुधवारी (ता. १८) एकनाथ डंबाळे यांचे नाशिक येथे राहणारे तीन मुले अाणि एक त्यांचा मित्र अशा चौघांनी मिळून रात्री साडेअाठच्या सुमारास घरासमोर उभे असलेल्या राहुल डंबाळे याच्यावर कोयत्ता, चाकूने वार केले. यात राहुलचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी ठाण्यात हजर
 खून करून अारोपी संतोष एकनाथ डंबाळे, कपिल एकनाथ डंबाळे व मिलिंद देविदास कांबळे हे तिघे त्यांच्याकडील असलेल्या कारसह शस्त्र घेऊन ठाण्यात हजर झाले. त्यांनी अाणि स्वत: पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली. तर उर्वरित अारोपी प्रकाश एकनाथ डंबाळे यास कुंडी (ता. सेलू, जि. परभणी) येथून अटक केली. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.


हेही वाचा ...
परभणीत गुटख्याचा साठा जप्त
परभणी :
परभणी शहरातील दोन ठिकाणांवरून पोलिसांनी बुधवारी (ता. १८) गुटख्याचा साठा रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जप्त केला. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
परभणीचे सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील रायगड कॉर्नरवर व ऑडिटनगरमधील एका ठिकाणी गुटख्याचा साठा असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी या दोन्ही ठिकाणी कारवाई केली असता त्यांना गुटखा व सुंगधीत तंबाखूचा साठा सापडला. या दोन्ही ठिकाणच्या गुटखा विक्रेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


हेही वाचा ... 
गंगाखेडमध्ये घरफोडी
परभणी :
गंगाखेड (जि.परभणी) शहरातील कोद्री रस्त्यावर असणाऱ्या एका घरात चोरी झाल्याची घटना मंगळवारी (ता.१७) घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीत नगदी दोन लाख रुपयांसह सोन्या-चांदीच्या वस्तू चोरीस गेल्याची माहिती आहे. गंगाखेड शहरातील गजानननगर मधील तुकाराम गणपत जाधव यांनी मंगळवारी (ता. १७) सायंकाळी सहा वाजता गंगाखेड पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. तुकाराम जाधव यांचे कुटुंबीय मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान, गंगाखेड शहराजवळील एका धार्मिक कार्यक्रमासाठी होते. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराचे दोन दरवाजे तोडून कपाटातील नगदी दोन लाख रुपये रोख व २५ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. फौजदार विठ्ठल घोगरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com