esakal | कोरोना’च्या भीतीने नांदापूर गावची वेस युवकांनी केली बंद

बोलून बातमी शोधा

nakabandi

हिंगोली जिल्ह्यातील एकमेव गाव, ग्रामस्थांनी बैठकीतून घेतला निर्णय, बाहरेगावच्यांनी गावात येवू नये

कोरोना’च्या भीतीने नांदापूर गावची वेस युवकांनी केली बंद
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली ः सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर गर्दीची ठिकाणी टाळली जात असून शहरासह ग्रामीण भागात देखील गावकरी दक्ष झाले आहेत. गावपातळीवरील अनेक जन कामाच्या शोधार्थ शहरात गेले आहेत ते आता गावात परतत असल्याने त्‍या धर्तीवर कळमनुरी तालुक्‍यातील नांदापूर येथे गावकऱ्यांनी बैठक घेवून खबरदारीचा उपाय म्‍हणून बाहेर गावाचा कोणीही गावात येणार नाही, यासाठी प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

कळमनुरी तालुक्यातील नांदापूरच्या गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात प्रवेश बंदी केली आहे. याबाबत सोमवारी (ता.२३) बैठक घेण्यात आली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. यात प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच गावकरी देखील स्‍वतःहून नियम पाळत आहेत. यात घराबाहेर न जाणे, सतत हात धुणे, गावातील सार्वजनिक कार्यकम टाळले जात आहेत. गावपातळीवर होणारे सप्ताह देखील बंद केले आहेत.

हेही वाचा - वसमत, कळमनुरीतील रस्ते निर्मनुष्य

दहा ते पंधरा गावाचा नांदापूरशी संपर्क
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील गावकऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी घेतली जात आहे. या परिसरातील दहा ते पंधरा गावाचा संपर्क नांदापूर या गावात येतो. परिसरातील हारवाडी, म्हैसगाव्हाण, रुपूर, कारवाडी, जामगव्हाण, सोडेगाव आदी गावातील गावकरी येथे बाजारपेठेसाठी येतात. गावात बँक, दवाखाने, मेडीकल, किराणा आदी सामान खरेदीसाठी गावकरी येतात. सध्या या परिसरात असलेल्या अनेक गावातील गावकरी कामानिमित्त पुणे, मुंबई येथे गेले होते. सध्या ते त्यांच्या गावात आले आहेत. त्यामुळे असे नागरिक नांदापूरात देखील कामासाठी येतील, याच्या पार्श्वभुमीवर गावकऱ्यांनी बाहेर गावातील येणाऱ्यांना गावात प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - Video : १४४ कलमात दीडशहाणे पडले बाहेर, मग पोलिसांनी दाखवला इंगा

सोमवारी झाली गावकऱ्यांची बैठक
यासाठी सोमवारी सकाळी गावात बैठक घेण्यात आली. या वेळी सरपंच देवराव कऱ्हाळे, उपसरपंच संदीप बोरकर, सचिन चव्हाण, सुरेश देशमुख, गजानन चव्हाण, विश्वनाथ बोरकर, शिवाजी शिंदे, शंकर शिंदे, विनायक बोरकर, दिपक कल्याणकर, सतिश बोरकर, अविनाश चव्हाण, गुलाब शिंदे, आंबदास बोरकर, बळवंत बोरकर, विजय गायकवाड, मुकेश जैस्‍वाल आदी गावकरी सहभागी झाले होते.

ये-जा करणाऱ्यांनी रजिस्टरला नोंद करावी
या वेळी कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगण्यात आल्या. त्यानंतर गावात नवीन व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गावातून बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या रजिष्टरला नोंद करूनच बाहेरगावी जायचे व परत आल्यानंतर त्याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच गावात प्रवेश करताना हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

अशा केल्या गावकऱ्यांनी उपाययोजना
नांदापूर हे गाव उमराफाटा ते बोल्‍डाफाटा मार्गावरून हारवाडी गावापासून पश्चीमेस तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. हारवाडी ते औंढा जाणाऱ्या मार्गावर औंढा रस्‍त्‍यावरून गावात जाणाऱ्या मार्ग बंद केला आहे. तसेच पिंपळदरीकडून येणाऱ्या मार्गावरून गावात जाणाऱ्या रस्‍त्‍यावर आरोग्य केंद्राच्या जवळचा एकच रस्‍ता सुरू ठेवून येथे एक दोर लावून प्रवेश बंदी केली आहे. गावात येणाऱ्या या एका मार्गावर युवक थांबले असून बाहेर गावातील येणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात आहे. या ठिकाणी दोन युवक ठेवण्यात आले आहेत.


तीस ते पस्‍तीस गावकरी गावात परतले
येथे गावातील व्यक्ती बाहेरून आल्यानंतर त्यांची नावे नोंदवली जात आहे. इतर रस्‍ते बंद केले आहेत. गावातून पुणे, मुंबई या सारख्या शहरात कामासाठी गेलेले गावकरी गावाकडे येत आहेत. आतापर्यंत गावात आलेल्या या गावकऱ्यांची नोंद घेण्यात आली आहे. आतापर्यंत तीस ते पस्‍तीस गावकरी गावात परतले असून त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. या गावकऱ्यांची आरोग्य विभागामार्फत तपासणी केली जात आहे.

कोणाला भेटायचे याची माहिती घेतली जातेय
गावात नवीन व्यक्ती महत्वाच्या कामासाठी आला असेल तर त्याला नेमके कोणत्या गावकऱ्याला भेटायचे याची माहिती घेतली जाणार आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन व्यक्तींनी गावात प्रवेश करू नये. तसेच गावकऱ्यांनीही गावाबाहेर जाताना नोंदणी करूनच जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.