उभा तरी मी!

आबासाहेब गाडेकर
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

योग्य वैद्यकीय सल्ला मिळाला अन्‌ हृदयावर शस्त्रक्रिया न करता गेली वीस वर्षे उभा आहे.

योग्य वैद्यकीय सल्ला मिळाला अन्‌ हृदयावर शस्त्रक्रिया न करता गेली वीस वर्षे उभा आहे.

चौतिसाव्या वर्षी मला हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्यामुळे मी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये तपासण्या करून घेतल्या. "हृदयाचे दोन व्हॉल्व्ह लवकरात लवकर बदला,' असे सांगण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे मी त्या रुग्णालयात उपचार घेऊ शकत नव्हतो. म्हणून आंध्र प्रदेशातील पुट्टपूर्ती येथील सत्यसाई रुग्णालयात जाऊन पुन्हा तपासणी केली. त्यांनीही दोन व्हॉल्व्ह खराब असून, केव्हाही मृत्यू होऊ शकतो किंवा अजून पन्नास वर्षे जगूही शकता, असे सांगितले. सहा वर्षांसाठी दोन गोळ्या सकाळ-संध्याकाळ लिहून दिल्या. दर वर्षी तपासणीसाठी यायला सांगितले. वजन अजिबात उचलू नका, असे बजावले. पुण्यात शस्त्रक्रिया करण्याविषयी सांगितले होते. म्हणून मी तेथील डॉक्‍टरांना शस्त्रक्रिया करण्याविषयी विनवले. त्या वेळी त्यांनी मला सांगितले, "आपणास विचारलेल्या सर्व माहितीवरून आम्ही असे अनुमान काढले आहे, की आपणास पंचवीस वर्षे तरी शस्त्रक्रियेची गरज नाही. तसेच, पुढेही शस्त्रक्रिया टळू शकते.''

डॉ. द. रा. भागवत म्हणाले, ""दोन्ही व्हॉल्व्ह खराब असलेले आपल्यासारखे रुग्ण हे वीस वर्षांपेक्षा अधिक काळ सहसा जगत नाहीत. पण, आपण चौतिसाव्या वर्षी रुग्णालयात आलाय. प्रमाणात आहार, आहारात मिठाचे योग्य प्रमाण, व्यसन नाही, मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण, अधूनमधून आयुर्वेदिक औषधे, शाकाहार इत्यादीमुळे आपल्याला शस्त्रक्रियेची गरज नाही. समजा, आपल्याला जर अधिक त्रास झालाच, तर नगरहून पुट्‌टपूर्तीला रुग्णवाहिकेतून या, पैसे संस्थान देईल. त्या वेळी शस्त्रक्रिया करू.'' मी विनाशस्त्रक्रिया किती काळ राहू शकतो, याचा अहवाल जगातील सर्व संशोधन केंद्रांना पाठवता येईल आणि याचा फायदा जगातील इतर लोकांना होईल, असेही त्यांनी मला सांगितले. माझे समाधान होऊन मी शस्त्रक्रियेचा विचार रद्द केला. त्यानंतर पाच वर्षांनी माझा एक व्हॉल्व्ह पूर्ण बरा झाला. दुसऱ्याला थोडेसे छिद्र आहे. शस्त्रक्रिया न करता गेली वीस वर्षे मी उभा आहे. आता तर फक्त एकच गोळी सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aabasaheb gadekar write article in muktapeeth