अखेरच्या श्‍वासापावेतो...

आरती भालेराव-देशपांडे
बुधवार, 21 मार्च 2018

तिला गाण्याची फार आवड होती. माहेराहून येताना हाच वारसा ती घेऊन आली होती. तिच्याबाबत सांगायचे तर- अखेरचा श्वास, तरीही संगीत शिक्षणाचा ध्यास, असेच मी पाहिले.

तिला गाण्याची फार आवड होती. माहेराहून येताना हाच वारसा ती घेऊन आली होती. तिच्याबाबत सांगायचे तर- अखेरचा श्वास, तरीही संगीत शिक्षणाचा ध्यास, असेच मी पाहिले.

"घननिळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा' माणिक वर्मांचे सुंदर गाणे रेडिओवर चालू होता. माणिकताई माझ्या आईचे, वैजयंती भालेराव हिचे, दैवतच. त्यांची सर्व गाणी आईला अवगत होती. गाणे ऐकत असताना मी भूतकाळात गेले. माझ्या आईपाशी शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताचा उत्तम मिलाफ होता. तिला देवांने अतिशय गोड गळा दिला होता. अभंग, गवळण, जोगवा, डोहाळे, मंगलाष्टके, घाण्याच्या ओव्या, मातृभोजनाची गाणी या सगळ्यात तिचा हातखंडाच होता. विशेष म्हणजे तिला नुसते शब्द मिळाले तरी त्यांना ती स्वतःच्या चाली लावून त्या शब्दांचे सोने करायची. तिचे माहेर म्हणजे सारे देशपांडे घराणे संगीतमय होते. माझा एक मामा हार्मोनियम वाजवायचा. एक मामा बुलबुल वाजवत असे. दोन्ही मावश्‍या हॉर्मोनियम आणि गाणे म्हणत असत. असे असले तरी आईचा संगीतातील प्रवास लग्नानंतरच पुण्यात सुरू झाला. माझ्या वडिलांनी (विष्णू भालेराव) तिची संगीतातील आवड ओळखून तिला गाणे शिकायला प्रोत्साहन दिले. आम्हा चार मुलांचे शिक्षण, अभ्यास, डबे सगळे व्यवस्थित करून तिने लग्नानंतर सरस्वती संगीत विद्यालयाच्या आसावरी करंदीकर यांच्याकडे सर्व प्रकारच्या संगीताचे धडे घेतले. माझे आई-बाबा सर्व संगीत महोत्सवांना, उदा. सवाई गंधर्व महोत्सव, शनिवार वाडा संगीत महोत्सव, दत्तजयंती महोत्सव अशा अनेक कार्यक्रमांना जात असत. घरचे सणसमारंभ रीतिरिवाज हे सगळे सांभाळून तिने तिच्या गाण्याची आवड जोपासली. तिने कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या उत्तम सांभाळत संगीत शिक्षण चालू ठेवले.

तिने गळा खराब होऊ नये म्हणून घशाची विशेष काळजी घेतली होती. आवाज खराब होऊ नये म्हणून खडीसाखर खाणे, विड्याचे पान खाणे चालू असायचे. आंबट पदार्थ, लोणची, तळेलेले पदार्थ जणू तिने वर्ज्यच केले होते. तिच्या आवडीचे राग म्हणजे गुजरी तोडी, यमन, भीमपलासी, भैरवी इत्यादी. तिचे आवडणारे गायक होते पंडित सी. आर. व्यास, पंडित भीमसेन जोशी व माणिक वर्मा.

भजनी मंडळात, गायन कार्यक्रमामध्ये, ध्यान मंडळामध्ये तिला खूप मानाचे स्थान होते. खूप मोठा परिवार होता तिचा. तिच्यामुळे घरात सतत हॉर्मोनियम, ताल, संगीत चालू असे आणि सतत घरात लोकांचा राबता असे. तिने मलाही संगीत शिकायला प्रोत्साहन दिले आणि गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांची तयारीही माझ्याकडून करून घेतली. वयाच्या साठीनंतर तिला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. तिला भेटायला येणाऱ्यांचा ओघ वाढतच राहिला. सर्व जण तिला हेच सांगायचे, आम्हाला अजून शिकायचे आहे, तुम्ही लवकर बऱ्या व्हा; पण आता ती पूर्णपणे अंथरुणाला खिळली होती आणि दवाखान्यातील विविध उपकरणांमध्ये अडकली होती. तिच्या गुरू आसावरी करंदीकर तिला भेटायला दवाखान्यात आल्या. तेव्हा त्यांच्यातला संवाद अंतःकरण हेलावून टाकणारा होता. त्या अवस्थेतही ती त्यांना विनवणी करत होती. ""बाई, मला मधुवंती राग अजून येत नाही. मला शिकवाल का हो?'' तिच्या गुरूंनाही तिचा अतिशय अभिमान वाटत होता. हीच त्यांची शेवटची भेट. त्यानंतर आईचे निधन झाले. तिचे हे संगीतप्रेम बघून आम्ही सगळे थक्क आहोत. तिची संगीताची निष्ठा अपार होती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ती जिथे कुठे असेल, तिथे गंधर्व संगीतातच रममाण असेल, याची मला खात्री आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aarti bhalerao deshpande write article in muktapeeth