साचो तेरो नाम

अच्युत चक्रदेव
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

समोरच्याचा अंदाजच नसतो आपल्याला, पण आपण सहज खिल्ली उडवतो. नंतर आपली चूक उमजते.

समोरच्याचा अंदाजच नसतो आपल्याला, पण आपण सहज खिल्ली उडवतो. नंतर आपली चूक उमजते.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगाधिकारी (वर्ग-एक) म्हणून मी कार्यरत होतो. प्रजासत्ताक दिन जवळ आला होता. बंदीजनांचे सांस्कृतिक कार्यक्रम आखत होतो. सर्व विभागांमध्ये सूचना पाठविली, ज्या बंदींना गायन, वादन कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल, त्यांनी नावे नोंदवावीत. भीमा जाधव याने गायनासाठी नाव नोंदविले. मी त्याचे नाव पुकारले. अंगात नाईट पायजमा, चट्ट्यापट्ट्याचा शर्ट, कसेही वाढवलेले केस. मी मनात म्हटले, "हा काय गाणार? एखादे चित्रपटगीत गाईल. दुसरं काय?' मी उपहासाने म्हणालो, "अरे, तुझे नाव भीमा म्हणजे तू पंडित भीमसेन जोशींसारखा गायला पाहिजेस!' त्याने कोपऱ्यात ठेवलेला तानपुरा उचलला. स्वर नीट जुळवून घेतले. स्वर लावला आणि आरोह, अवरोह, ताना मागून ताना सुरू झाल्या. आता आश्‍चर्याने आम्ही थक्क झालो. भीमाने चक्क राग बैरागीभैरव सुरू केला. त्या गायनात आम्ही सर्व न्हावून निघालो. प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमात तो मनसोक्त बैरागी गायला.

कार्यक्रमाला त्या वेळेचे कारागृह महानिरीक्षक शिव रामकृष्ण आले होते. ते संगीताचे चांगले जाणकार होते. त्यांनी भीमाला जवळ बोलावून विचारणा केली. भीमाला तीन महिने सक्तमजुरी झाली होती. त्याचा अपराध म्हणजे रात्री एका कार्यक्रमात तो ज्या सभागृहात गायला, तेथेच झोपला होता. तेथून रात्री एक हार्मोनियम चोरीला गेली होती. पुण्यात नवीन. मूळचा सोलापूरचा. गायन शिकण्यासाठी बनारसला गेला होता. तो नवीन असल्याने सारे पुरावे त्याच्याविरुद्ध गेले. तू चूक कबूल केलीस तर शिक्षा कमी होईल, असे एका हवालदाराने सांगितले, म्हणून त्याने चूक कबूल केली आणि ती शिक्षा तो भोगत होता. कारागृह महानिरीक्षकांनी भीमाला घसघशीत माफी दिली. नियमाप्रमाणे रेल्वे वॉरंट देऊन त्याला बनारसला पाठवायची सोय केली.

आता कधीही बैरागीभैरव ऐकला, की हटकून आठवतो भीमा जाधव, त्याचा बैरागीभैरव आणि त्याची चीज - साचो तेरो नाम...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: achyut chakradeo write article in muktapeeth