आगळं वेगळं समाधान

अदिती साने-जोगळेकर
मंगळवार, 13 मार्च 2018

माझं मन आनंदाने अगदी भरून गेलं होतं. स्वतःला हवी ती गोष्ट करायला मिळाल्याने होणारा आनंद वेगळा आणि आपण दुसऱ्या कोणाला तरी आनंद देऊ शकलो याचा आनंद आणखीनच वेगळा. ते असतं एक आगळं वेगळं समाधान.

माझं मन आनंदाने अगदी भरून गेलं होतं. स्वतःला हवी ती गोष्ट करायला मिळाल्याने होणारा आनंद वेगळा आणि आपण दुसऱ्या कोणाला तरी आनंद देऊ शकलो याचा आनंद आणखीनच वेगळा. ते असतं एक आगळं वेगळं समाधान.

माझ्या आईची आई गेली बारा-तेरा वर्षं माझ्याजवळ राहते आहे. वय वर्ष 86. मला मुलगा झाला त्या वेळी ती माझ्याबरोबर नागपूरहून पुण्याला आली. अख्खा जन्म पुण्यात काढलेला; पण मध्यंतरी आजोबा गेल्यावर तिला नागपूरला राहावं लागलं. पण आता माझ्या लहानग्याच्या निमित्ताने पुण्यात पुन्हा राहायला मिळणार म्हणून आनंदून गेली आजी! हळूहळू मुलांनाही तिचा लळा लागला. मग आम्ही तिला आमच्याकडेच राहण्याचा आग्रह केला. माझी मोठी मुलगी आणि हा तान्हुला यांच्या बाललीलांमध्ये रमलेली त्यांची ही पणजी आमच्या कुटुंबाची ज्येष्ठ-श्रेष्ठ सदस्य झाली. लहानपणापासून आजी-आजोबांच्या प्रेमळ सहवासात राहिलेल्या माझ्या पतीलाही स्वतःची आजी नुकतीच गेल्याच्या दुःखातून सावरायला या आजीच्या प्रेमाची साथ मिळाली.

माझ्या मुलांची दुखणी खुपणी, छोटी-मोठी आजारपण यात मला आजीची खंबीर साथ मिळाली. ती घरी असल्यामुळेच मी घराबाहेर पडून नोकरी करू शकले. आता आजी म्हातारी झालीय. वयाच्या 86 व्या वर्षी जुन्या आठवणींना उजाळा देताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही बोलून जातात. तिच्याशी बोलताना मला जाणवलं, आपणही कधीतरी अशाच म्हाताऱ्या होणार आणि जुन्या आठवणींना उजाळा देत राहणार. मग तेव्हा आपल्यालाही फक्त या आठवणींच्या शिदोरीवरच समाधान मानाव लागेल की काय? आजीच्या बोलण्यातून सतत तिच्या एका फार जुन्या मैत्रिणीचे मीराताई पावगीचे नाव यायचं. समितीमध्ये दोघींनी एकत्र काम केलेलं. अनेक भल्याबुऱ्या प्रसंगी एकमेकींना साथ देणाऱ्या या दोन सख्या मधल्या वीस-बावीस वर्षांत एकमेकींना भेटूसुद्धा शकल्या नव्हत्या.

मी विचार केला, आज मी माझ्या मैत्रिणींशी किती सहजपणे भेटू-बोलू शकते. मोबाईल फोन, व्हॉट्‌सअपमुळे आम्ही सतत संपर्कात असतो. पण काही वर्षांनी म्हातारपणामुळे जर परावलंबीत्व आलं तर आम्ही भेटू शकणार नाही. कोणीतरी आपल्याला घेऊन जाईल याची वाट पाहावी लागेल. या कल्पनेनेही माझ्या अंगावर काटा आला.
लगेचच्या रविवारी आजीला मस्त ठेवणीतली साडी नेसून तयार व्हायला सांगितले. तर आमच्या प्रभाताई साने मस्त नऊवारी नेसून तयार झाल्या. सर्वांत आधी ज्या सदाशिव पेठेत ती पंचेचाळीस वर्षं राहिली तिथल्या स्वामींच्या मठात दर्शनाला नेलं. नंतर लक्ष्मी रस्त्यावर गेलो. माझी आई मीराताईंना गाडीजवळ घेऊन आली. अचानक त्यांना समोर बघून ""अय्या मीरे तू!'' आजीच्या आनंदाला पारावार उरला नाही. ""अगं प्रभा, किती वर्षांनी भेटलीस गं'' असं म्हणून दोघींनी गळामिठी मारली आणि ते पाहून आमच्याही डोळ्यांत पाणी आलं. एकमेकींचे हात हातात घेऊन जुन्या आठवणींनी उजाळा देणाऱ्या त्या दोघी मैत्रिणींचे चेहरेही खरोखर उजळून निघाले होते. दोघी आनंदाश्रूंनी एकमेकींची खुशाली विचारत होत्या. आजीला पायाचा त्रास असल्यामुळे ती खाली उतरू शकणार नव्हती आणि त्या वाहत्या रस्त्यावर गाडी जास्त वेळ उभी करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्यांना फार थोडा वेळ मिळाला, पण त्या थोड्या वेळात त्यांना मिळालेला आनंद अवर्णनीय होता हे मात्र खरं. त्या दिवसापासून आजी आणखीनच जास्त आनंदी दिसायला लागली.

ती सतत काही जवळच्या मंडळींची आठवण काढत असायची. म्हणून तिच्या वाढदिवशी जवळच्या लोकांना आजीला भेटायला बोलावले. एका वेळी एकेक जण येईल, अशा पद्धतीने त्यांना बोलावले. एरवी न येणारी मंडळी वाढदिवशी कशी काय अचानक येत आहेत याचं आजीला नवलच वाटत राहिलं दिवसभर! आजीला एवढं आनंदी पाहून खूप खूप समाधान वाटलं.

आपल्या घरातली म्हातारी माणसं सतत आपल्या भल्याचा विचार करत असतात. आपलं एखादं वागणं त्यांना आवडलं नाही तर अधिकाराने दोन शब्द बोलतात. त्यामागेदेखील इतर कोणी बाहेर आपल्याला वाईट म्हणू, बोलू नये हाच उद्देश असतो. अशा वेळी आपण त्यांच्यावर रागावून त्यांचा अपमान होईल असं कधीच बोलू नये. कारण त्यांच्या मान सन्मानाला जर ठेच लागली, तर त्यांना परावलंबित्वाची जाणीव होऊ लागते आणि मग त्यांना जीवन नकोसं होऊन जातं.
सुरकुतलेल्या ज्या हातांनी
उधळण केली प्रेमाची।
नको तयांना धन-संपत्ती
फक्त अपेक्षा प्रेमाची।।

म्हणूनच माझ्या आजीला मी आनंदाचा, समाधानाचा क्षण देऊ शकले, याबद्दल मी खूप खूप समाधानी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aditi sane joglekar write article in muktapeeth