मातेची ममता

अद्वैत देव
शनिवार, 22 डिसेंबर 2018

आई आपल्या सहजच्या छोट्याशा कृतीतून मुलांवर संस्कार करीत असते. मुलांमध्ये हे संस्कार नकळत रुजून येतात.

आई आपल्या सहजच्या छोट्याशा कृतीतून मुलांवर संस्कार करीत असते. मुलांमध्ये हे संस्कार नकळत रुजून येतात.

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी. आई म्हणजे मायेचा महासागर. आम्ही नवीन घरी राहायला गेलो असतानाची ही गोष्ट. जड पिशवीचे ओझे गळ्यात घेऊन एक मावशी नेहमी पत्र घेऊन कॉलनीत येत असत. आम्ही त्यांना केवळ लांबूनच बघत असू. ते उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी अशाच दुपारच्या कडक उन्हात त्या आमच्या घरी आल्या. दारावरची बेल वाजली. मी नेहमीप्रमाणे धावत जाऊन दार उघडले तर समोर त्या मावशी. घामाने निथळत त्या उभ्या होत्या. मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. तेवढ्यात आई मला हाक मारत बाहेर आली. त्यांना पाहून आईने त्यांना घरात बोलावले. त्या नको म्हणत असताना बसायला सांगून पिण्यासाठी थंड पाणी दिले. तेव्हा त्यांना खूपच बरे वाटले. आईने प्रेमाने त्यांची विचारपूस केली. त्याचवेळी मला त्यांच्यासाठी सरबत करून द्यायला सांगितले. या आदरातिथ्याने मावशी इतक्‍या भारावून गेल्या की, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. जाताना त्यांचे ते गोड हास्य आणि माझ्या आईच्या डोक्‍यावरून फिरवलेला आशीर्वादाचा हात मी कधीच विसरू शकणार नाही. आपल्याकडे कोणीही येवो, आपण त्यांचे मनापासून आदरातिथ्य करावे; हा संस्कार किती सहजपणे आईने माझ्यावर रुजवला.

आजही पोस्टमन, भाजीवाले काका, दूधवाला, सिलिंडरवाले दादा असे कोणीही आले तरी आमच्याकडे पाणी आणि हातात काही तरी खाऊ घेतल्याशिवाय जात नाहीत. "अतिथी देवो भव', हा नियम आम्ही सर्व जण आनंदाने पाळतो. सध्याच्या टीव्हीच्या जमान्यात अनेक जण मालिकांना जवळ करतो; पण आईपासून दूर होत जातो याची खंत वाटते. घरी आल्यावर आईच्या मायेच्या कुशीत गेल्यावर किंवा कामांत छोटीशी मदतही आईला समाधान मिळवून देते, हे अनेक मुले विसरून जात आहेत. आईच्या घरकामात आपण खारीचा वाटा उचलला की तिला हत्तीचे बळ येते, हे मी अनुभवले आहे. तुम्ही?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: advait deo write article in muktapeeth