डॉक्‍टर, तुम्ही सुद्धा...

ऍड. रेणू देव
शुक्रवार, 20 जुलै 2018

वैद्यकीय व्यवसायातील मूल्य विसरून एखाद्या डॉक्‍टरकडून पैशासाठी फसवणूक होण्याचं दुःख मोठं असतं.

वैद्यकीय व्यवसायातील मूल्य विसरून एखाद्या डॉक्‍टरकडून पैशासाठी फसवणूक होण्याचं दुःख मोठं असतं.

हार्टऍटॅक. अठ्ठेचाळीस तास ऑब्झर्व्हेशन. त्यांना तिसऱ्या मजल्यावर हलवा, अगदी हळू काळजीच्या स्वरात सूचना देऊन डॉक्‍टर रूमबाहेर पडले. ही घटना आहे तीस-बत्तीस वर्षांपूर्वीची. डॉक्‍टरांचं निदान ऐकून हृदयापेक्षाही मोठा आघात माझ्या मनावर झाला. तेव्हा फोनची सुविधा सर्वत्र नसूनही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मित्र, मैत्रिणी, नातेवाइकांची दुःख-काळजीने भरल्या चेहऱ्यांनी भेटण्यासाठी गर्दी होत होती.
घडलं असं ! अपघातामध्ये मोडलेल्या पायावर मी नुकतीच उभी राहत होते. त्यातच आईचे अचानक निधन झाले. चालू "लेक्‍चररशिप'मध्ये माझ्या "मेरीट'पेक्षा दुसऱ्यांचा वशिला श्रेष्ठ होण्याचा ताण ! अशा आयुष्यावर खोल परिणाम करणाऱ्या तीन असह्य आघातांनी मी खचले. प्रकृती ठीक नाही म्हणून डॉक्‍टरांकडे गेले तर त्यांनी हे निदान केलं. माझं वय होतं 27 वर्षं. आमची मुलगी होती पाच वर्षांची, मुलगा दीड वर्षाचा ! मी काळजी आणि दुःखाने सुन्न. एकीकडे मी "बेडरेस्ट' तर सोडाच, पण औषधांसाठी तीन मजले चढ-उतर करीत होते. डॉक्‍टरही दरवाज्यातूनच प्रकृतीची चौकशी करायचे, असं कसं हे मला समजत नव्हतं. शेवटी भरपूर बिल भरून मी घरी आले. पतींच्या मित्राने "सेकंड ओपिनियन'साठी दुसऱ्या डॉक्‍टरांकडे नेले. त्यांनी सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या. म्हणाले, "यांना हेलिकॉप्टरमधून खाली सोडलं तरी काही होणार नाही, तेव्हाही काही झालं नव्हतं.' त्यांच्या या सांगण्यामुळं आमच्या मनावरचं ओझं उतरलं.
आम्ही पहिल्या डॉक्‍टरांना भेटायला गेलो. म्हटलं, 'वकील, डॉक्‍टर या व्यवसायात काही मूल्य, तत्त्व आणि कर्तव्य आहेत. ते सर्व विसरून डॉक्‍टर तुम्ही सुद्धा पैशाच्या मागे लागून आम्हाला फसवलंत. मला तर दुःखानं आयुष्यातून उठवलंत. आम्ही तुमच्यावर फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी फौजदारी व नुकसान भरपाईसाठी दिवाणी दावा करू शकतो. पण असे करून आम्ही तुम्हाला आयुष्यातून उठविणार नाही. पण एक लक्षात ठेवा, अशी चूक दुसऱ्या रुग्णाबाबत करू नका.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: advocate renu deo write article in muktapeeth