धांदरट धांदल...

अजित मोहनीराज वैद्य
बुधवार, 12 जुलै 2017

परदेशात पहिल्यांदाच गेलो होतो. मुंबईच्या विमानतळावर मोबाईल हरवलेला. म्हणजे परदेशात जाऊन संपर्ककक्षेच्या बाहेर. काही धांदरटपणा, काहीशी धांदल; पण प्रत्येक वेळी जणू देवाचीच सोबत होती.

परदेशात पहिल्यांदाच गेलो होतो. मुंबईच्या विमानतळावर मोबाईल हरवलेला. म्हणजे परदेशात जाऊन संपर्ककक्षेच्या बाहेर. काही धांदरटपणा, काहीशी धांदल; पण प्रत्येक वेळी जणू देवाचीच सोबत होती.

पाच वर्षांपूर्वी पासपोर्टच्या गडबडीमुळे परदेशवारी हुकली आणि आता ती पुन्हा चालून आली. कंपनीने निवडलेल्या मशिन्सच्या उत्पादकता चाचणीसाठी इटलीला जायचे होते. परदेश गमनाची पहिलीच वेळ. सोबत कोणीही नाही. पहाटे सहा वाजताचे विमान होते. मुंबई ते इस्तंबुल आणि इस्तंबुल ते बोलोनिया असा प्रवास होता. पहाटे तीन वाजताच विमानतळावर हजर झालो. अत्यंत उत्सुकतेने व तितकाच सावधानतेने बसलो होतो. बरेचसे प्रवाशी पेंगुळले होते; परंतु मी मात्र खुर्चीवर सावध. दोन्ही खिशांत दोन मोबाईल. एक "इंटरनॅशनल कॉल'साठी कंपनीने दिलेला आणि दुसरा माझा वैयक्तिक डिरेक्‍टरीसारखा वापरण्यासाठी म्हणून ठेवलेला.

आमच्या "बोर्डिंग'ची जागा बदलल्याची घोषणा झाली. मी लगबगीने सामान घेऊन दुसऱ्या बोर्डिंग स्टेशनवर निघणार, तोच मला खिशात मोबाईल नसल्याचे जाणवले. मी दोन्हीही खिसे चाचपले. फक्त माझा डिरेक्‍टरीवाला मोबाईल होता. कंपनीने दिलेला आंतरराष्ट्रीय कॉलवाला मोबाईल खिशात नव्हता. सर्वत्र पळत पळत पाहिले. बॅग उचकली नाही आणि नाहीच. प्रवासाची पहिलीच वेळ, मी एकटाच. मोबाईल हरवल्यानंतर मी कोणाला कसा संपर्क करणार किंवा मला कोण कसा संपर्क करणार? विमान सुटायची वेळ वेगाने जवळ येत चाललेली. एक मन म्हणत होते, परत घरी फिरावे; परंतु देवाचे नाव घेतले आणि प्रवासाला सुरवात केली. खरे सांगू, ती दहा मिनिटे माझ्या आयुष्यातील सर्वोच्च उलथापालथीची वाटली.

इस्तंबुलला उतरलो. मोठे विमानतळ. पहिल्यांदाच विमानतळावरचे सगळे सोपस्कार करून बाहेर पडलो. घड्याळात पाहिले तर दोन वाजले होते. पुढचे विमान अडीच वाजता होते. पुन्हा पळापळ. बोर्डिंग स्टेशनला गेल्यावर लक्षात आले, की माझे घड्याळ इस्तंबुलपेक्षा वेगळा वेळ दाखवित होते. मी घड्याळाची वेळ बदलायला विसरलो होतो. मग मस्त सृष्टीसौंदर्य न्याहाळत बसलो आणि नंतर आरामात बोलोनियाकडे जाणाऱ्या विमानात बसलो. बोलोनियाला उतरल्यानंतर मला कोणी घेण्यासाठी येते किंवा नाही याचा ताण होता; पण विमानतळाच्या बाहेर येताच समोर "अजित वैद्य' असा फलक झळकलेला दिसला. स्वीर हॉटेलपर्यंत तर पोचलो. आता मोबाईल हरविल्याचा निम्मा ताण कमी झाला होता.

सात दिवसांचा नियोजित दौरा व्यवस्थित चालू होता. अचानक कंपनीतून फोन आला, की इटलीमधील दुसऱ्या एका ग्राहकाकडे जायचे आहे. आता आली का पंचाईत? इटलीत अनोळख्या ठिकाणी प्रवास तोही एकटा! मला बोलोनियाहून मिलानला आणि मिलानहून पाचशे किलोमीटर दूर असणाऱ्या ग्राहकाकडे बुलेट ट्रेनने जायचे होते. माझी सर्व तिकिटे मला काढून देण्यात आली होती; पण हा प्रवास जमेल का? विनामोबाईल मी बोलोनियावरून मिलानला गेलो. अरे बापरे! एवढे प्रचंड मोठे रेल्वे स्टेशन; पण सगळीकडे डिजिटल डिस्प्ले होते. सहज सोपे वाटले. मी ट्रेनची वाट पाहत होतो आणि प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. त्या गडबडीत माझी ती बुलेट ट्रेन निघून गेली. आई शप्पथ! त्या ग्राहकाला काय सांगू? मोबाईल नाही. माझ्या कंपनीत सर्व जण हसतील मला. मी प्रचंड बावरलो. इतक्‍यात एका टीसीच्या लक्षात ही गोष्ट आली. त्याने मला पुढील ट्रेनचे बुकिंग करून दिले. एटीमसारख्या मशिनवर त्याने मला पुढील ट्रेनचे तिकिट काढून दिले.

पाचशे किलोमीटर बुलेट ट्रेनचा प्रवास. ताशी साडेतीनशे किलोमीटरचा वेग. कोणते स्टेशन कधी येणार, हवामान कसे आहे हे सगळे स्क्रीनवर दिसत होते. योग्य स्टेशनवर उतरलो. ते एक मध्यम गाव होते. पाऊस पडत होता. आमच्या ग्राहकाने पाठविलेल्या गाडीने स्टेशनवर माझी वीस मिनिटे वाट पाहिली आणि तो माघारी गेला. चला, आपण टॅक्‍सीने जाऊ म्हटले तर आसपास एकही टॅक्‍सी नाही. एका छोट्या हॉटेलवाल्याला कस्टमरला फोन लावायची विनंती केली; पण नकार आला.

मी त्या रेल्वे स्थानकाबाहेर घुटमळत असताना एक तरुण आणि एक ज्येष्ठ गृहस्थ सारखे माझे निरीक्षण करत होते. मी दचकलो. अनोळख्या ठिकाणी माझ्यावर पाळत. आधीच मोबाईल गेलेला आणि आता बॅग गेली तर! त्यांच्या संशयास्पद हालचाली वाढल्या होत्या. त्यांनी जवळ येऊन माझ्याशी संवाद साधला. त्या तरुण व्यक्तीने त्याच्या मोबाईलवरून तीन टॅक्‍सी बुक करायचा प्रयत्न केला; परंतु गाडी उपलब्ध नव्हती. मग मी त्याच्याच मोबाईलवरून आमच्या ग्राहकाच्या कंपनीत फोन लावला. सुदैवाने तो लागला. दुर्दैवाने कंपनीतील त्या व्यक्तीला इंग्लिश समजत नव्हते. युवकाने इटलीतून त्या माणसाला समजावून सांगितले आणि कंपनीची टॅक्‍सी मला घेण्यासाठी आली. ते दोघे समाजसेवक होते. माझ्यासाठी परमेश्‍वराने पाठविलेले दूत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit vaidya write article in muktapeeth