राजयाचा पुत्र अपराधी देखा, परीका तो कोना दंडवेल

thief
thief

इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये असताना मला घरून पैसे चोरायची वाईट सवय लागली होती. नोटा चोरून मी शालेय पुस्तकांमध्ये ठेवत असे. तेव्हा माझा समज असा होता की पुस्तकांमध्ये पैसे ठेवल्याने ते दुप्पट होतात. त्याचप्रमाणे मी नाणे चोरून घराजवळच्या एका विहिरीत टाकायचो. कारण पुन्हा तेच की नाणी दुप्पट होऊन वर येतात. माझ्या चोरीच्या सवयीबद्दल जेव्हा घरी कळाले तेव्हा मला भरपूर चोप बसला आणि मला जवळपास मध्यरात्रीपर्यंत घराबाहेर बाहेर ठेवण्यात आले होते. हे सर्व घडलं हिवाळ्यात. नागपुरात हिवाळ्यात बऱ्यापैकी थंडी असते. एक जमेची बाब होती ती म्हणजे मी त्या चोरलेल्या पैशाचा गैरवापर करत नव्हतो. त्याचा वापर मी कधीच वाममार्गी लागण्यासाठी पण केला नाही. घरच्यांनी चोप दिल्यामुळे किंवा स्वतःची चूक समजल्याने म्हणा त्यानंतर माझी चोरी करण्याची सवय तुटली. पण, घरच्यांनी म्हणजेच माझ्या आई-बाबांनी प्रेमापोटी जर मला चोप दिला नसता किंवा जाब विचारला नसता आणि आपलाच मुलगा आहे म्हणून सोडून दिलं असतं तर कदाचित माझा चोरी करण्याचा आत्मविश्वास आणखी वाढला असता आणि पुढे मी एखादा मोठा चोर किंवा दरोडेखोर झालो असतो. अर्थातच असे काही घडले नाही आणि याचे पूर्ण श्रेय जाते ते म्हणजे माझ्या आई-बाबांना. पुत्रप्रेमाला बळी न पडता त्यांनी मी केलेल्या चुकांची सावरासावर केली नाही व योग्य तो निर्णय घेतला आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. पण, झालेल्या चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून स्वीकारण्याची आणि त्याला सुधारण्याची किती लोकं हिंमत दाखवतात, याचे समाजातील प्रमाण पडताळून बघितले तर ते नक्कीच कमी आढळेल.
आपल्या अवतीभवती बरीच अशी उदाहरणे दिसतील जिथे आई-बाबांच्या प्रेमापोटी चुकलेल्या निर्णयामुळे त्यांच्या मुलांचे आयुष्य मातीत गेले. कुठलाही मोठा हुकूमशहा, गुन्हेगार, गुंड, आतंकवादी किंवा निरंकुश व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती जन्मजात असंवेदनशील नसते. ती त्याप्रकारे घडत जाते आणि बऱ्याचदा संबंधित व्यक्ती आप्तजनांनी योग्य वेळेवर जाब न विचारल्याने किंवा चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून स्वीकार न केल्याने पुढे तसे करणे त्याच्या अंगवळणी पडत जाते. हुकूमशहा हा विषय निघाला की आपल्याला फक्त हिटलर आणि वर्तमान काळातील काही देशांचे राज्यकर्तेच दिसतात, पण दररोजच्या जीवनातील उदाहरणांचं काय? हे सर्व हुकूमशहा अगदी लहानपणापासूनच असे नसणार. त्यांनी वारंवार केलेल्या चुकांकडे कानाडोळा झालेला असेल. आपले त्या व्यक्तीशी संबंध खराब होऊ नये किंवा प्रेमापोटी त्यांच्या पालकांनी, भावंडांनी आणि समोर जाऊन मित्रपरिवाराने कधीच त्यांना जाब विचारला नसेल. परिणामी त्यांचा आत्मविश्वास वाढून ते या पातळीवर पोहोचू शकले. हिटलर, ट्रम्प, मोदी यांनी केलेल्या चुकांबद्दल आपण नेहमीच बोलत असतो, पण हेच आपण आपल्या जवळच्या व्यक्तींबाबत करत नाही. तेव्हा आपली नीती आणि मूल्ये ही मुद्दाम डावलली जातात.
सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने याप्रकारचे अनुभव अगदी जवळून बघायला मिळतात. लोकांशी आणि प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असताना जवळपास सगळेच नीती आणि मूल्यांचा डोंगर उभारतात. पण, याच नीती-मूल्यांचा त्यांच्या जीवनातील निर्णयप्रक्रियेत फार काही वाटा दिसत नाही. हिटलरसारखी पातळी गाठल्यानंतर त्याच्यावर ताशेरे ओढून फार काही उपयोग होत नाही. वेळोवेळी आपल्यासोबत किंवा आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या अन्यायाबद्दल आणि चुकांबद्दल बोलल्याने एखादा हिटलर इन मेकिंग (Hitler in making) नक्कीच दुसरी वाट घेईल. हे करणे आपल्याला शक्‍य आहे का आणि ते करण्यासाठी आपल्या पाठीत कणा उरला आहे काय?
आपला मित्र नेहमी मुलींना काही तरी अभद्र बोलतो, पण आपण मैत्रीखातर त्याला काही म्हणत नाही. कुठली तरी मोठी व्यक्ती काही तरी चुकीचं करते तेव्हा आपण काही करत नाही कारण आपल्याला पुढे जाऊन त्या व्यक्तीची गरज भासू शकते. आपले गुरू (idol/mentor) बोलतात एक आणि करतात एक पण आपण गप्प असतो कारण ते आपले गुरू असतात. आपला बॉस किंवा वरिष्ठ कुठल्यातरी विशिष्ट व्यक्तीला मजा म्हणून नेहमी त्रास देत असतात, पण आपल्याला बढती हवी असते म्हणून आपण गप्प असतो. अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतील जेव्हा आपण आपल्या क्षुल्लक-क्षुल्लक फायद्यांसाठी सत्य आणि न्यायाची बाजू न घेता अन्यायाची बाजू घेतो आणि आपण स्वतः एका असंवेदनशील हुकूमशहाला जन्म घालतो. म्हणूनच वेळोवेळी सत्याची बाजू घेऊन उभे राहणे त्याबद्दल बोलणे हे आपल्यासाठी आणि संपूर्ण समाजासाठी आवश्‍यक असते. संत तुकाराम म्हणूनच गेले आहेत
"राजयाचा पुत्र अपराधी देखा, परीका तो कोना दंडवेल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com