बायकांनी बांधले घर

अनघा ठोंबरे
शनिवार, 17 मार्च 2018

आपल्याकडे घरकामाला येणाऱ्या मावशींची झोपडी कधीही वाऱ्यावर उडून जाईल, असे त्या बायकांना समजले. त्या एकमेकींशी दूरध्वनीवरून बोलल्या आणि त्या बायकांनी मावशीचे घर बांधले.

आपल्याकडे घरकामाला येणाऱ्या मावशींची झोपडी कधीही वाऱ्यावर उडून जाईल, असे त्या बायकांना समजले. त्या एकमेकींशी दूरध्वनीवरून बोलल्या आणि त्या बायकांनी मावशीचे घर बांधले.

जयाबाईंचे तसे बरे चालले होते. नवरा महापालिकेत सफाई कामगार होता. पगार, निवृत्तीवेतन, भविष्यनिर्वाह निधी सारे ठीक होते. पुढे मुलालाही नोकरी मिळण्याची शक्‍यता होती. मुख्य म्हणजे एक झोपडी होती मालकीची. मुलाला लहानपणी चुकीचे इंजेक्‍शन दिले गेल्याने त्याचा डावा हात वाकडा झाला, त्याच्यावर वेळेवर उपचार न झाल्याने तो एका हाताने अपंग होता. त्यामुळे त्याला सफाई कामगार नोकरी अठराव्या वर्षांनंतर मिळणारच होती. पण दुर्दैव असे की, नवऱ्याची आई वारल्याने सगळे गावी गेले. तिथून नवरा परतायलाच तयार होईना. तिथे त्याला दारूचे व्यसन लागले. दोन-तीन महिने महापालिकेने नोटिसा पाठवल्या. हजर व्हायला सांगितले. नवऱ्याला काही वाचता येत नव्हते. त्याने त्या नोटिसा कुणाला दाखवल्याही नाहीत. मग कामावरून निलंबित केल्याची नोटीस आली. त्या वेळी नवरा भरपूर दारू पिऊन पालिकेत गेला आणि साहेबांना शिवीगाळ केली. मग अशा माणसाला कोण कामावर ठेवणार? त्याला काढून टाकले, साहजिकच मुलाची नोकरीची संधीही गेली. लवकरच दारूचे व्यसन वाढून, यकृत खराब होऊन नवरा मरून गेला.

विधवा जयाबाईंनी आसपासच्या सोसायट्यांमध्ये धुणेभांडी, केरफरशी, स्वयंपाकाची कामे धरली. जयाबाईंना दम्याचा विकार होता. दोन मुली, एक अपंग मुलगा पदरात. मुलगा काही ना काही काम करायचा. शिकतही होता. सकाळपासून रात्रीपर्यंत जयाबाई कामातच असायच्या. त्यांच्या पोळ्या मऊसूत, ओठाने खाव्यात अशा, भाजीचीही गरज नाही. कामात खाडा नाही, स्वच्छ काम, बोलणे चांगले, नवीन शिकण्याची तयारी, त्यामुळे मालकीणीही मदत करायच्या. मुलांची फी, धान्य, कपडे, उचल त्यांना मिळत असे. त्यांनीही कधी काम कमी-जास्त असेल तर कुरकुर केली नाही. शिक्षण नाही, पुरुषाचा आधार नाही, मालकिणींनी रेशनकार्ड दिले जाते त्या कार्यालयात चकरा मारून तिला रेशनकार्ड काढून दिले. नवऱ्याच्या नावावरची झोपडी जयाबाईंच्या नावावर करून दिली, जयाबाई घरातल्याच एक झाल्या. पूर्ण विश्‍वासाने त्यांच्याकडे घराची किल्ली देऊन काही मालकिणी नोकरीला जात. काळाच्या ओघात काही मालकिणी जागा सोडून दुसरीकडे गेल्या, तरी जयाबाईंना विसरल्या नाहीत.
एकीने जयाबाईंना मोबाईल घेऊन दिला, त्याचे पैसे पगारातून वळते केले, नवीन कामे मिळत गेली, औषधांची मदतही मालकिणी करतच होत्या.

किती वर्षे गेली, जयाबाईंची आधीच जीर्ण झोपडी, जमीनदोस्त व्हायची वेळ आली, भिंती कुजल्या, भोके पडली. त्यातून मोठमोठे उंदीर, घुशी आल्या. छत कधी कोसळेल याचा भरवसा नव्हता. खांब वाकू लागले. उंदरांनी कपडे, मुलांची वह्यापुस्तके, कागदपत्रे सर्वांची वाट लावली. हातात ताठे घेऊन जेवायची वेळ आली. कारण उंदीर ताटातले पदार्थ पळवण्याइतके धीट झालेले. प्लॅस्टिक बरण्या खाल्ल्या, प्यायच्या पाण्यात पडू लागले. चांगले गल्लेलठ्ठ होते. जमिनीत त्यांनी बिळे केली, पाऊल ठेवताच जमीन खचू लागली. चर तयार झाले. मग प्लायवूड खड्ड्यावर टाकले तर तेही उंदरांनी कुरतडले, त्या रडकुंडीला आल्या. जगणे कठीण झाले. मालकिणींकडे सिमेंटचा कोबा करायला पैसे मागायला लागल्या. दोन तरुण मुलींना घेऊन फूटपाथवर झोपायची वेळ आली.

मालकिणी तशा एकमेकींना ओळखत नव्हत्या, काही जवळ तर काही दूर राहणाऱ्या, नोकऱ्या करणाऱ्या, पण एकमेकींशी दूरध्वनींवर बोलल्या. दूरध्वनीवरच ठरवून एक बैठक घेतली. सगळ्याजणींनी जयाबाईंच्या झोपडीची अवस्था प्रत्यक्ष पाहिली. लक्षात आले की, नुसता कोबा घालून काहीच उपयोग नाही, झोपडीच कोसळायची भीती होती. मालकिणींपैकी काहींकडे बांधकामातल्या उरलेल्या टाइल्स, दरवाजे, जुन्या खिडक्‍यांच्या चौकटी, थोडी वाळू असे साहित्य होते. त्या सर्वांनी मिळून विटा-सिमेंट व इतर सामान आणून जयाबाईंचे घर बांधून द्यायचे ठरवले. मात्र प्रत्यक्ष मजुरी जयाबाई, त्यांचा मुलगा आणि नातलगांनी करायची. दुष्काळामुळे गावाकडे काम नव्हते. तेथील काही नातलग पुण्याला आले. सगळ्या मालकिणींनी कामे वाटून घेऊन बांधकाम साहित्य आणले. मालकिणींच्या घरातल्यांनी नकाशा काढला आणि मजूर घर बांधू लागले. मजुरांना धान्य, जेवण देणे आवश्‍यक होते. माझ्याकडच्या धान्य बॅंकेतून मी धान्य दिले. तीनही मुले कामाला लागली आणि बघता बघता सुंदर, सुबक छोटे घर तयार झाले. अगदी रंगरंगोटीही मालकिणींनी छान करून दिली.
जयाबाईंना काय बोलावे सूचत नव्हते. त्यांनी वास्तुशांत घरभरणी ठरवली. सर्व मालकिणींना, त्यांच्या घरच्यांना बोलवायचे ठरवले. स्वयंपाक त्या स्वतः करणार! पण सामानाला पैसे कुठे होते? मालकिणींच्या मनात कुठेही उपकाराची भावना नव्हती, पगारही कापला नव्हता. मालकिणींच्या मैत्रिणी-नातलगांनीही मदत केली. पूजा करण्याची जयाबाईंची इच्छा मी पूर्ण केली. धान्य, पैसे, मिठाई घेऊन दिली आणि त्या अनोख्या घराची अपूर्वाईची वास्तुशांत झाली. घर दिलें घर, एका कष्टकरी बाईला... सरकारने नव्हे, दिले सावित्रीच्या लेकींनी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: angha thombre write article in muktapeeth