तत्परता

अनिल कंगले
बुधवार, 23 मे 2018

परदेशात विशेषतः अमेरिकेतील प्रशासकीय तत्परतेबाबत आपण नेहमी ऐकत असतो. परंतु मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कारण कोणतेही असतो, या ठिकाणी विलक्षण वेगाने सेवा दिली जाते.

परदेशात विशेषतः अमेरिकेतील प्रशासकीय तत्परतेबाबत आपण नेहमी ऐकत असतो. परंतु मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कारण कोणतेही असतो, या ठिकाणी विलक्षण वेगाने सेवा दिली जाते.

कॅलिफोर्नियामधील सॅनहोजे येथे काही महिन्यांपूर्वी असताना एकदा रात्री आठच्या दरम्यान मीना (पत्नी) कोपरगाव येथे तेथील लॅंडलाइनवरून फोन लावत होती. फोन लावताना 01191 लावून मग आपला मोबाईल नंबर लावायचा, तर तिच्या हातून चुकून अगोदर 911 लागला. समोरून कुणीतरी इंग्लिशमध्ये बोलल्यामुळे तिने रॉंग नंबर लागला असेल, असे म्हणून लगेच बंद केला. पाच मिनिटांनी फोन वाजला, तर स्वातीने (सून) उचलला. तो फोन पोलिसाचा होता, तिने सांगितले, चुकून लागला व पत्ता विचारल्यावर तोही सांगितला. फोन ठेवल्यानंतर ती म्हणाली, "बहुतेक आपल्याकडे पोलिस येतील'' असे म्हणाल्यानंतर मीना घाबरली. यावर श्रीपाद (मुलगा) म्हणाला, "आई, तू काळजी करू नकोस मी बघतो. 10 मिनिटांनी बेल वाजली. श्रीपादने दार उघडले. दारात दोन पोलिस उभे होते. श्रीपादने त्यांना आतमध्ये घेतले व आई भारतातून आली असून, चुकून रॉंग नंबर लागला, असे सांगितले. तरीही ते एक मिनिट उभे राहिले. सर्व ठिकाणी नजर फिरवली. थोडा वेळ थांबून, ओ.के. म्हणून ते निघून गेले. ते गेल्यावर मी स्वातीला विचारले, "तू तर सांगितले होते, की चुकून नंबर लागला आहे,'' त्यावर स्वातीने म्हणाली, "त्यांच्या कल्पनेप्रमाणे कदाचित येथे दहशतवादी किंवा चोर असेल तर, त्यांच्या दहशतीमुळे तुम्ही फोन लगेच बंद केला असेल, म्हणून ते खात्री करून गेले.'' पाच मिनिटांनी मी खिडकीतून बघितल्यावर काही अंतरावर पोलिसांच्या गाडीचे रेड लाइट चमकत होते. यातली गंमत अशी, की हा लॅंडलाइन पूर्वी श्रीपाद राहत असलेल्या न्यू हॅमशायरमधील रजिस्टर होता. न्यू हॅमशायर ते कॅलिफोर्निया म्हणजे आपल्याकडील काश्‍मीर ते कन्याकुमारीपेक्षाही जास्त अंतर. मीनाने लावलेला फोन न्यू हॅमशायरमधील पोलिसांनी उचलला. त्यांनी सॅनहोजेमधील पोलिसांना कळवले व ते आमच्याकडे आले. हे सर्व रामायण घडले फक्त 15 मिनिटांत.

श्रीपाद न्यू हॅमशायर येथे असताना खुशी तेव्हा एक वर्षांची होती. ती रांगत असताना कसला तरी कोपरा लागून डोळ्याच्या वर छोटी जखम झाली व रक्त येऊ लागले. त्यामुळे घाबरून स्वातीने लगेच 911 ला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली, तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. अवघ्या काही मिनिटांमध्ये बाहेर सायरनचे आवाज येऊ लागले. मी गॅलरीत जाऊन बघतो, तर बाहेर एक पोलिस व्हॅन, एक ऍम्ब्युलन्स व फायर ब्रिगेड उभ्या होत्या. दोन पोलिस आतमध्ये आले. मग डॉक्‍टर आले, त्यांनी बघेपर्यंत जखम छोटी असल्यामुळे रक्त येणे थांबले होते. त्यावर काहीही करू नका, आपोआप बरे होईल असे सांगून सर्व निघून गेले.

साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट श्रीपादला वयाच्या 33 व्या वर्षी हार्टऍटॅक आला होता. तो दुपारी घरी आला व स्वातीला म्हणाला, मला अस्वस्थ वाटते आहे. परंतु त्याचा चेहरा बघितल्यानंतर तिच्या लगेच लक्षात आले व तिने 911 ला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली व अवघ्या पाच मिनिटांत एक पोलिस व्हॅन, एक ऍम्ब्युलन्स व एक फायर ब्रिगेड आली. त्यांनी श्रीपादला ऍम्ब्युलन्समध्ये घेऊन 10 मिनिटे तिथेच इमर्जन्सी ट्रीटमेंट दिली व लगेच हॉस्पिटलला नेले. बरोबर त्याचा मित्र कुणाल नवले होता. मुले लहान असल्यामुळे स्वाती एक तासाने हॉस्पिटलला पोचली. तोपर्यंत श्रीपादची ऍन्जिओप्लास्टी झालेली होती. डॉक्‍टरांनी सांगितले अजून 10 मिनिटे उशीर झाला असता तर काहीपण होऊ शकले असते. यावरून गांभीर्य लक्षात यावे. खरंच केवढी ही तत्परता. श्रीपादच्या ऍन्जिओस्प्लास्टीनंतर सांगितले होते, अजूनही एक क्‍लॉट आहे. परंतु त्याचा विचार आपण सहा महिन्यांनंतर करू. परंतु दोन महिन्यांनंतर श्रीपाद चेकअपसाठी गेला असता, तो क्‍लॉट त्यांना कुठेही दिसला नाही. यावर डॉक्‍टरही आश्‍चर्यचकित झाले. जेव्हा त्यांनी हे स्वातीला सांगितले, तेव्हा ती म्हणाली, ही श्री साईबाबांची कृपा.

आम्हाला स्वातीने फोन करून सांगितल्यानंतर आम्ही खूप घाबरून गेलो. पूर्णवेळ गृहिणी असलेल्या मीनाला मी विचारले, ""तू एकटी अमेरिकेला जाशील का?'' कदाचित इतिहासातील हिरकणी तिच्यात जागी झाल्यामुळे असेल, ती लगेच हो म्हणाली. तिसऱ्या दिवशी ती अमेरिकेला गेली. कुणाल तिला घ्यायला आला होता. तोपर्यंत श्रीपादला कल्पना नव्हती, की आई येत आहे. जेव्हा बेल वाजली व स्वातीने दार उघडले, आईला समोर बघून तिघांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दीड महिना राहून मीना इकडे आली, कारण तोपर्यंत मुलीचे लग्न ठरवून, साखरपुडा ठरला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil kangle write article in muktapeeth