फ्लोरिबंडा फुलला!

अनिल ओढेकर
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

आपलं स्वागत व्हावं ही भावना आत कुठेतरी असतेच. नकळत मनी असलं तरी ध्यानी नसतं आणि अचानक स्वागत होतं. एक सुखद धक्का असतो. वर्षभराने घरी परतल्यावर शेजारच्या मुलीनं केलेलं अबोल स्वागत असाच धक्का देऊन गेलं.

आपलं स्वागत व्हावं ही भावना आत कुठेतरी असतेच. नकळत मनी असलं तरी ध्यानी नसतं आणि अचानक स्वागत होतं. एक सुखद धक्का असतो. वर्षभराने घरी परतल्यावर शेजारच्या मुलीनं केलेलं अबोल स्वागत असाच धक्का देऊन गेलं.

"स्वाऽ गऽ त करूया' या गाण्याच्या शब्दांनी एका विशिष्ट आवाजात आणि टिपिकल नृत्याने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत हा माझ्या लहानपणी कौतुक मिश्रित चेष्टेचा विषय होता. त्यातील चेष्टा आजही तशीच आहे. तसे पाहता स्वागत हा उपचाराचा, पण अत्यावश्‍यक भाग आहे. तो आनंद देईलच असे नाही. पण त्याला फाटा दिला तर? ... यजमान आणि पाहुणे दोघांनाही खटकेल. मने खट्टू होतील.
मन आणि माणूस जसजसे मोठे होत जातात तसतसे भवतालचे जग, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अनुभवाच्या परिसीमा ... सगळेच बदलत जाते. आनंद देणाऱ्या आणि प्रतिसाद मिळणाऱ्या भावनांचे शब्दरूप, भावदर्शन यात मात्र काहीच फरक पडत नाही आणि आनंद? तो निखळच असतो. लहानशा बाळाला कडेवर घेण्यासाठी उचलल्यावर त्याच्या चेहेऱ्यावरचे हसरे भाव, त्याला कडेवर घेतल्यावर आपल्या आत ... कोठेतरी जाणवणारी सुखद संवेदना शब्दांनी व्यक्त करणे, कितीही कसरती केल्या तरी, अवघड आहे.

आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यावर, प्रसंगानुरूप, संपर्कात येणाऱ्या व्यक्तींबरोबर भावनांची प्रतीकें अनंत रूपे घेत बहरत असतात. त्यात सुजाण, समंजस, समाधानी कुटुंब. रसिक मित्रमैत्रिणीच्या सहवासात भावनांचे पोषण झालेले असल्यावर व्यक्त होण्याचा बहर प्रसंग परत्वे थोडक्‍या शब्दात खूप काही सांगू पाहणारा!

पोषण या शब्दावरून आठवले. फ्लोरिबंडा नावाची गुलाबाची एक जात आहे. थोड्याशा प्रेमळ मशागतीने त्याला प्रचंड बहार येतो. विशेष म्हणजे तो मोसमी नसतो. सदाबहार असतो. असेच एक फ्लोरिबंडाचे रोप आमच्या शेजारी आहे. बिल्वा .... कॉलेज युवती आहे. मौज मजा, ट्रिप्स, ट्रेकिंग नव्या सिनेमाची नवीन गाणी, फोटोग्राफी आणि कविता देखील करणारी. अभ्यासासह या सगळ्या गोष्टी समरसतेने करणारी. पाण्यात राहून माशाशी वैर नको म्हणून थोडीशी बेशिस्ती, वाचनाचा कंटाळा, वेळप्रसंगी मोठ्यांचा अवमान या तरुणांच्या अंगी असणाऱ्या "सद्गुणां'चे वारे तिलाही लागले होतेच!

तर अशा या फ्लोरिबंडानें मनात सदैव घर करून राहील अशी, दिसायला छोटीशी पण अतिशय सुखद, आनंददायी कृती करून आमच्या नात्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले .
आम्ही गेले वर्षभर आमचा नाशिकचा मुक्काम तात्पुरता हलविला होता. जळगावला मुलाकडे तर काही दिवस पुण्याला मुलीकडे, असा आलटून पालटून मुक्काम होत होता. बरेच दिवस मुक्काम झाल्याने मनही तिकडेच, नव्या स्नेह्यांबरोबर रमले होते. तरीही मधूनच नाशिकच्या शेजाऱ्यांची आठवण येतच होती. पण शेजाऱ्यांच्या मनात आमच्या नसण्यामुळे कोणत्या भावना होत्या? त्यांनाही आमची आठवण येत असेल का? अशा विचारात गढल्यावर .. कल्पना विलासात रमता रमता विचार यायचा दुसऱ्याच्या मनात डोकावता आले असते तर? थोडीशी बेचैनी, थोडीशी हुरहूर. मन सैरभैर व्हायचे. त्याच मूडमध्ये नाशिकला परत येण्यासाठी मुलाकडून निघालो. कुटुंबात नव्यानेच दाखल झालेली नाते... वय तीन महिने. तोंडाने जमेल तसा आवाज काढीत आणि नजरेतून सांगत होती "तुम्ही नका नं जाऊ गले ... '

नाशिकचे घर आणि नातीचा आग्रह या द्वंद्वात गाडीने जळगाव कधी सोडले आणि नाशिक कधी आले समजलेच नाही.
थोडेसे सैरभैर, हळवे झालेले मन, नाशिकला घरापाशी आल्यावर, एका सुखद धक्‍क्‍याने अक्षरशः मोहरून गेले! दारासमोर "वेलकम होम' अशी रांगोळीने काढलेली अक्षरे आमचे स्वागत करीत होती. नुकतीच काढलेली स्वच्छ, ताजी रांगोळी. पुन्हा प्रश्नांचे मोहोळ. कोण असेल हा कलाकार? ठरवून, मुद्दाम काढलेली रांगोळी, तीही नुकतीच काढलेली असावी अशी फ्रेश! म्हणजे आमच्याच स्वागतासाठी काढलेली जुजबी चौकशी केली. पण अपेक्षित उत्तर मिळाले नाही. पण खात्री होती. आणि झालेही तसेच ही किमया फ्लोरिबंडाचीच होती !

प्रसन्न मनाने घरात प्रवेश केला. कल्पना विश्वात दोघेही रमून गेलो. रसिकता हळूच बाजूला झाली. रांगोळी चित्र म्हणून सुंदर होतीच. पण मुग्धतेनें केलेले स्वागत त्याहीपेक्षा लाख पटीने जास्त मोलाचे होते. फ्लोरिबंडाच्या फुलाने केलेले. सुगंधी, सुस्मित, सुखद!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil odhekar's article in muktapeeth