माओरींच्या देशात

अनिल सहस्रबुद्धे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

"हिरवे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी' असे अनुभवण्यासाठी न्यूझीलंडमध्ये जायला हवे.

"हिरवे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी' असे अनुभवण्यासाठी न्यूझीलंडमध्ये जायला हवे.

न्यूझीलंडच्या दोन छोट्या बेटांवर लोकसंख्या फक्त पंचेचाळीस लाख व आकार उत्तर प्रदेशाएवढा. या देशाच्या सत्तर टक्के भागात गर्द वनराई आहे. बहुतेक बैठीच घरे आहेत. औद्योगीकरण फारसे झाले नसल्याने प्रदूषणही नाही. दुग्धव्यवसाय व मेंढ्यांच्या लोकरीचा व्यवसाय हे इथले प्रमुख उद्योग आहेत. या देशातील मेंढरांची संख्या तिथल्या लोकसंख्येच्या नऊ पट आहे. यावरून या उद्योगाची व्याप्ती लक्षात यावी. आम्हाला एका मेंढीपालन केंद्रात जगातील सर्व जातीच्या मेंढ्या दाखवल्या गेल्या. एका मेंढीची लोकर कातरून दाखवली. एक विलक्षण दृश्‍य एका ठिकाणी पाहिले. खूप मोठ्या बर्फाच्या थरांवर बंदिस्त काचघरात पन्नास-साठ पेंग्विन्स्‌ बागडत होते. तिसरा अत्यंत आगळावेगळा अनुभव म्हणजे काजव्यांची कॉलनी! आम्हाला एका नावेत बसवून मिट्ट काळोखातून एका छोट्या कालव्यातून नेण्यात आले. वर पाहावे तर शेकडो काजव्यांची दाटी झालेली. हे "ग्लोवर्मस्‌' उजेडाला व आवाजाला बुजतात. त्यामुळे त्यांना असे अंधारातच बघावे लागते. त्यांना पाहिल्यावर आपण आकाशगंगेचे तारे पाहात आहोत की काय, असा भास होतो.

न्यूझीलंडमध्ये अनेक विस्तीर्ण तलाव आहेत. त्यापैकी एक एवढा मोठा आहे की त्याला नदी म्हणणेच योग्य ठरेल. या तलावाच्या चारी दिशांना एक शहर वसलेले आहे. संध्याकाळी या तलावाच्या काठावर फिरताना खूपच आल्हाददायक वाटते. पर्यटकांसाठी आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे एका पर्वतशिखरावर प्रचंड ग्लेशियर (हिमतुकडा) आहे. त्या शिखरापर्यंत हेलिकॉप्टरने जाता येते. न्यूझीलंडमधील पर्वतराजींमधून आपण एका सुंदर ट्रान्स अल्पाईन रेल्वेने जाऊ शकतो. डौलदारपणे धावणाऱ्या झुक झुक गाडीतून "हिरवे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी' असे अनुभवता येते. ब्रिटिश यायच्या आधी या दोन्ही बेटांवर माओरी वंशाच्या लोकांच्या टोळ्या होत्या. या माओरींच्या खेड्यांमध्ये त्यांच्या मूळ संस्कृतीचे संवर्धन करण्यात आले आहे. माओरी भाषा शाळांमध्ये शिकवली जाते. माओरी भाषेतील कार्यक्रमांसाठी एक स्वतंत्र दूरचित्रवाहिनीही आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil sahasrabudhe write article in muktapeeth