काय करु सये ...

अंजली बाजीराव घुले
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

आई पंढरीची वारकरी, तर सासू पुरेपूर संसारी. एक पंढरीच्या काळ्याला भेटू पाहणारी, तर दुसरी काळ्या जमिनीत विठूचैतन्याला भेटणारी. दोघींच्याही सावळ्या गोवितात मी गोवत गेले.

आई पंढरीची वारकरी, तर सासू पुरेपूर संसारी. एक पंढरीच्या काळ्याला भेटू पाहणारी, तर दुसरी काळ्या जमिनीत विठूचैतन्याला भेटणारी. दोघींच्याही सावळ्या गोवितात मी गोवत गेले.

मनात आले आणि पंढरीत जाऊन रायाला भेटले. गाडीने जायाचे नि रायाला भेटून यायाचे, इतकें सोपे झाले. हे भेटणे सोपे, तितकेच जगणेही सोपे झाले. तरीही पंढरीला जायाचे सायास नाही पडले, तर ते जाणे, ते भेटणे खरे वाटत नाही. मनास भावत नाही. वारीत मजल दर मजल चालताना एक समाधान असते. माऊली आपल्याबरोबर आहे, याचे समाधान. रथाच्या पुढे, मागे, संगतीने एक अनामिक सुख, संरक्षण, संस्कार, लय याची अनुभूती मिळते. मनात येते, मागे राहिलेल्या नित्य वास्तव्य असलेल्या गावांना असे माऊलीच्या जाण्याने करमत असेल का? जसे आई दृष्टीआड झाली की तिची आठवण येत राहाते, "बाळ, माता चुकलिया वनी। न पावेतो जननी दुःख पावे विठ्ठले। पांगुळले मन काही ना ठवे उपाय।' तशी. आई आपल्या स्वतःची हक्काची ठेव असते, तशीच ही विठूमाऊली मर्मबंधातली ठेव "सर्व सुकृताचे क्षेम' असलेली. गाडीतून जाताना मागे उरणाऱ्या गावांचे क्षेमकुशल पुसलेच जात नाही.
गाडीने जाऊन यायचे तर हातपिशवी पुरते. पण पालखीबरोबर जायचे तर भल्या मोठ्या पोत्याची गोणीच हवी. भराभर ट्रकमध्ये भरायला सोपी. आमची पायी वारीही सुखाची असते. माझी आई वारीला जात असे, त्याकाळी इतक्‍या सुविधा नव्हत्या. तिची वारीची तयारी महिनाभर आधी असे. खळी उलगली की तिला वारीचे वेध लागत. प्रचंड पसारा, राने तापून उठलेली, आखाडाच्या तोंडावर बी-भरान, खत-माती, उसाताटासाठी औजारे तयार ठेवणे. लागवडीसाठी सऱ्या-दोऱ्या बांध, पांद सुसज्ज ठेवणे, सगळें जिथल्या तिथें. अगदी गोठ्यात बैल, बारदान यांनाही सांगून ठेवी ती, "उगा हुर्राळ्यावानी करु नका. मी माघारा येईतवर गप गुमान ऱ्हावा. मालकाला तरास व्हईल असं कायबी करायचं नाय?' एखादी गाभण म्हैस, गाय असेल तर म्हणे "बायांनो, मी पंढरीवून आल्यावं तुमचं बाळातपण, नाय तर आडू नडू नका, चांगलं गुळ, घुगऱ्या खायाच्या असत्यालं तर इठू माऊली वाट दावील।' त्या जणू हंबरुन होकार देत.

वारीत कोणते अभंग, गवळणी म्हणायचे याची तालीम मोकळ्या शिवारात, आंब्या-जांभळीखाली, कुमजाईच्या साक्षीनें गोड गळ्यानें व्हायची. तिची "श्रीहरी गोड तुझी बासरी' ही नाथांची रचना खास ढंगात गाताना पांथस्त थांबून ऐकत. सधन, समृद्ध गावची पाटलीन. पण कधी गर्व, अभिमान, आळस नाही. अंधश्रद्धा, लागीरं-भूतखेत याची तिला चीड होती. एखादा दुखणेकरी देव-देवरुषी, मांत्रिकाच्या नादी लागला तर त्याच्याच छडीने त्याला पिटाळून लावी. अशी ही वारकरी लक्ष्मी अन्‌ गावाची जीवाभावाची सुंदर "बाय'. एकदा दुष्काळात केंदूर-पाबळ वगैरे गावातून दुष्काळग्रस्त शेतकरी दादा-आईच्या आश्रयाला आले. त्यावेळी दादांनी ओढ्याला बंधारा बांधून जलसंवर्धन करुन दुष्काळी लोकांना हाताला काम व पोटाला अन्न याची सोय केली. "जे का रंजले, गांजले त्यासी म्हणे जो आपुले' या संत वचनाचे पालन केले. तेव्हा अक्षरशः विठ्ठल-रुक्‍मिनी म्हणजे बबनराव पाटील आणि लक्ष्मीबाई यांना गावचे भूषण म्हणूनच ओळखत. भजन सम्राट दादा आणि त्याची भाऊ, अण्णा, अप्पा, तात्या ही मुले पंचक्रोशीत भजन गायकीत अजोड आहेत.

या सावळ्या गोवितात गोवलेली आणखी एक संसारालाच पंढरी मानणारी, शेती शिवाराला पांडुरंग मानणारी व्यक्ती, माझ्या सासुबाई चंद्रभागा. पती स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण तुकाराम घुले पाटील हे बेचाळीसच्या लढ्यातील साहेबाला जेरीस आणणारे खंदे सैनिक. ते तुरुंगात असताना सासुबाईंनी एकटीने सारे सांभाळले. मुलें-बाळें, शेतीवाडी अमाप कष्टाने समृद्ध केली. कधीही आळंदी, पंढरी वारी केली नाही, पण वाटेच्या वाटसरुच्या लहान भुकेला हक्कांचे घर "बाईचे'. सासुबाईंना "बाई' म्हणत. सणावाराला पोळ्यापात्या करुन पाटी डोक्‍यावर घेऊन तुरुंगातल्या पतीला व इतर कैद्यांना पायवाट तुडवत जात असत. त्या वेळच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कधी अडविले नाही. डोक्‍यावरची पाटी तपासण्याआधीच "आधी तुम्ही दोन घास खा. मग तुमच्या बापाला जेऊ घालते' असे ठणकावल्यावर साहेबाची भंबेरी उडे. शिक्षा भोगल्यावरही भूमिगत राहून दादांच्या कारवाया चालूच होत्या. त्यांच्या कार्यात पत्नीने ना कधी आक्षेप घेतला, ना संसाराचे, परिस्थितीचे, मुलाबाळांचे रडगाणे गायले.
एक वडगाव गावची पद्मतळ्यातली लक्ष्मी तर, दुसरी मांजरी गावची सर्व क्‍लेश पोटी घेऊन नितळ झालेली चंद्रभागा. तयांपाशी आपोआप लपावे.
सावळे परब्रह्म आवडे या जीवा
मनोमन राणिवा घर केले
काय करु सये सावळे गोवित
आपोआप लपत मन तेथे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anjali ghule write article in muktapeeth