जैविक हिऱ्यांची खाण

अंजली रा. काळे
गुरुवार, 22 जून 2017

भूगोलाच्या पुस्तकात पन्ना माहीत असते, ते हिऱ्यांच्या खाणीसाठी; पण येथील जंगलात जिवंत "हिऱ्यां'चा अधिवास आहे. हिऱ्यांपेक्षाही अतिमोलाचे हे "जैविक हिरे' जपले पाहिजेत.

नुकतीच "पन्ना'ला भेट दिली. मध्य प्रदेशातील "पन्ना व्याघ्र प्रकल्प!' "जीविधा'च्या राजीव पंडित यांनी मांडलेली पन्ना जंगल कॅंपची कल्पना आम्ही ताबडतोब उचलून धरली आणि बघता-बघता छोटासा ग्रुपही जमला.

भूगोलाच्या पुस्तकात पन्ना माहीत असते, ते हिऱ्यांच्या खाणीसाठी; पण येथील जंगलात जिवंत "हिऱ्यां'चा अधिवास आहे. हिऱ्यांपेक्षाही अतिमोलाचे हे "जैविक हिरे' जपले पाहिजेत.

नुकतीच "पन्ना'ला भेट दिली. मध्य प्रदेशातील "पन्ना व्याघ्र प्रकल्प!' "जीविधा'च्या राजीव पंडित यांनी मांडलेली पन्ना जंगल कॅंपची कल्पना आम्ही ताबडतोब उचलून धरली आणि बघता-बघता छोटासा ग्रुपही जमला.

पन्नाचे नाव भूगोलात हिऱ्यांच्या खाणींसंदर्भात वाचलेले असते; पण याच खाणींमुळे पन्नाच्या जंगलाला व त्यातल्या जिवांना धोका झाला ना निर्माण! 1981 मध्ये सरकारने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले खरे; पण इथे वाढते प्रदूषण, तस्करी आणि चोरट्या शिकारीला अगदी ऊत आला, तरी वनखाते झोपलेलेच; मात्र जेव्हा वाघांची संख्या शून्यावर आली, तेव्हा निसर्गप्रेमी संतापले व वनखात्याला जागे व्हावेच लागले. मग मात्र युद्धपातळीवर काम चालू झाले. पेंच, बांधवगड इथून वाघ आणून संवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले. आता चाळीसवर गेलीय वाघांची संख्या!
हे जंगल इतर जंगलांपेक्षा एकदम हटके आहे. काही जंगलं कशी आर्द्र पानझडीची असतात, काही सदाहरित, काही गवताळ कुरणं असतात; पण इथे मात्र एका छताखाली सगळे प्रकार सुखाने नांदतायत. साग, साल, कात, काटेसावर सगळी पाने गाळून सुटसुटीतपणे उभे होते. पांढरेधोप करू ऊर्फ घोस्ट ट्री नावाप्रमाणेच दिसत होते. पळसाची झाडे खूपच होती. पळस वसंतातला पुष्पोत्सव आटोपून हिरवीगार त्रिपदी आळवत होता. धाबडा, आइन, अर्जुन, मोह, तेंदू, कवठ, बहावा, बिजा, शिसम, आंबा, चिंच यांचा दाट पर्णसंभार ऐन उन्हाळ्यातले 46-47 अंश सेल्सिअस तापमान जाणवू देत नव्हता. मधूनच काही ठिकाणी गवताळ भाग होता. गवताचे अनेक प्रकार होते. वेणूबनही होते. तिथे इंदिराबाईंची "कुब्जा' कविता हलकीच मनात रुंजी घालून गेली. या व्याघ्र प्रकल्पात फिरण्यासाठी उघड्या जीप आहेत व वनखात्याने सकाळी पाच ते अकरा व दुपारी चार ते सात अशा वेळा ठरवून दिल्या आहेत. बोटसफारीही आहेत. बरोबर वनखात्याचा गाइड असतोच. आमचे गाइड आर. पी. ओमरे यांनी जास्तीत जास्त जंगल दाखवण्यासाठी फार प्रयत्न केले.

या जंगलात पक्षिवैविध्यही खूप आहे. आमची राहण्याची जागा नदीकिनारीच होती. पहाटे उठून आले की समोर रमणीय "नजारा' असायचा. नदीचा नितळ प्रवाह, प्रसन्न हिरवाई! समोरच वावळाचे डेरेदार झाड होते. त्यावर पिवळ्या पायांचे हरियाल, शिंजीर, राखी वटवटे, पीतकंठी चिमणी यांचे संमेलन भरलेले असायचे. हळद्याच्या जिवाला मात्र अजिबात स्वस्थता नसायची. सतत या झाडावरून त्या झाडावर फेऱ्या मारत राहायचे. जंगलात काही पाणथळ जागा नैसर्गिक वा काही मुद्दाम केलेल्या होत्या. तिथे पक्ष्यांची वर्दळ असायची. स्वर्गीय नर्तक, नीलपंख, नवरंग यांनी डोळ्यांतचे पारणे फेडले. तसेच मातीच्या रंगाशी एकरूप झालेला रातवा, तसेच पांढऱ्या पाठीचे घुबड, शाही घुबड, पावशा, तांबट, चंडोल, भारीट, नीलिमा, तित्तर, रानलावे, खाटिक अनेक प्रकारचे वटवटे, सारस क्रेन, कवड्या खंड्या, कवडी मैना अशा कितीक चिमण्या पाखरांनी अतीव आनंद दिला.

मिश्र प्रकारचे जंगल असल्याने भक्ष्य व भक्षक दोन्ही संख्येने भरपूर आहेत. चितळ, सांबर, चिंकारा, चौशिंगा, नीलगाय, कोल्हा, मुंगूस, हनुमान वानर, रानडुक्कर, रानमांजर यांचा सहजसुंदर आढळ आहे. बहुतांशी वाघ, बिबटे जंगलाच्या अंतर्भागात असतात, तिथे जायला परवानगी नसते; पण इथे एक वाघीण "टी-वन' तिच्या पाच-सहा महिन्यांच्या बच्च्यांसह नदीकाठच्या भागात फिरत असल्याचे समजले. बोटीतून जाऊन जरा शोधाशोध केल्यावर किनाऱ्यावर आराम फर्मावणाऱ्या मॅडम आणि त्यांचे हुंदडणारे दोन बच्चे दृष्टीस पडले. तिचा डौल पाहून मन स्तिमित झाले. पुढे ओमरेंच्या तेज निरीक्षण व अचूक अंदाजामुळे बिबट्या व झिपऱ्या अस्वलाच्या दर्शनाचा लाभ झाला.

हे जंगल इतके समृद्ध असण्याचे कारण आहे, त्याच्यामधून वाहणारी कर्णावती ऊर्फ केन नदी! या नदीचे सौंदर्य काही औरच आहे. अतिस्वच्छ, शांत, नितळ प्रवाह, हिरवाईने नटलेले दोन्ही काठ, पक्ष्यांच्या किलबिलीखेरीज अन्य आवाज नाहीत. आपण तत्क्षणी तिच्या प्रेमातच पडतो. ती या प्रकल्पातील सुमारे पंचावन्न किलोमीटर क्षेत्रातून वाहते. सध्या उन्हाळ्यामुळे पाणी कमी असले व काठाजवळचे काळे खडक उघडे पडले असले, तरी सुंदरतेत थोडीही उणीव नाही. ही जंगले, नद्या, डोंगर हेच आपले खरे धन आहे. ते आपण जपले, तरच आपण टिकणार आहोत. निसर्ग हेच अखेर शाश्‍वत सत्य आहे. पन्नाच्या या बहारदार, अनेक पशु-पक्षी, वृक्षांचा अधिवास असलेल्या जंगलावर खाणींमुळे अशुभाचे सावट आहे; पण एका गोष्टीची पक्की जाणीव असून द्यावी, की हिरे कितीही किंमती असले, तरी ही निसर्गसंपदा केवळ अमूल्य आहे, तिचे कशानेच मोल होऊ शकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anjali kale wirte article in muktapeeth