सुदूर सुंदर बर्फ

अपर्णा दळवी-माने
शुक्रवार, 26 मे 2017

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात एक छोटासा "ब्रेक' घेऊन निसर्गात रमायला हवे. पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी. अशा छोट्याशा "ब्रेक'मुळे शरीराबरोबर मनाचाही थकवा दूर होतो.

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात एक छोटासा "ब्रेक' घेऊन निसर्गात रमायला हवे. पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी. अशा छोट्याशा "ब्रेक'मुळे शरीराबरोबर मनाचाही थकवा दूर होतो.

या वर्षी पुण्यातील उन्हाळा जरा जास्तच वाढला आहे, असे वाटू लागले. उकाडा वाढल्याने आणि लागोपाठ सुट्ट्याही मिळाल्याने आम्ही मित्र मैत्रिणींनी शिमला मनालीच्या सहलीचा बेत आखला. पुण्याहून विमानाने दिल्ली गाठली. दिल्ली ते शिमला हा खरा प्रवास सुरू झाला. दिल्लीत उन्हाळा बऱ्यापैकी दाहकच होता. दिल्ली, हरियाना पार करत गाडीने हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश केला. हिमाचल प्रदेश म्हणजे सुंदर डोंगररांगा, उंच उंच झाडे, प्रचंड खोल दऱ्या आणि डोंगरात वसलेली छोटी छोटी टुमदार गावं. डोंगराच्या कुशीतून रस्ता निघाला होता. अरुंद आणि वळणावळणाचा रस्ता डोंगररांग चढून जात होता. एक डोंगर संपला की दुसरा, नंतर पुन्हा एक. या प्रवासात चालकावरच सगळी भिस्त ठेवून बसावे लागते. सुरवातीला जरा भीती वाटली. पण नंतर मजा येऊ लागली. जवळ जवळ सात तासांचा प्रवास होता हा. शिमल्याला पोचण्यास रात्र झाली. पूर्ण दिवस प्रवासातच गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी शिमल्यापासून तेरा किलोमीटरवर असलेल्या कुफरी या गिरिस्थानी जाण्याचा बेत होता. कुफरी हे उंच डोंगरावर वसलेले ठिकाण. वरती जाण्यासाठी एकच सोय ती म्हणजे घोडेस्वारी. पायथ्याला घोड्यावर स्वार झालो आणि कुफरीचा डोंगर चढून गेलो. कुफरीतून सुदूर बर्फाळ पर्वतरांगा आणि झाडांनी आच्छादलेली गिरीशिखरे दिसत होती. नजरेत साठवून घेत होतो. भूतलावरील हा स्वर्ग आहे असे वाटावे, असेच हे दृश्‍य होते. कितीही वेळ पाहतच राहावे, पण मन भरू नये असा हा स्वर्ग होता. कुफरी हे एक सुखद धक्का देणारे अप्रतिम आणि अतुलनीय ठिकाण आहे. कुफरीतून पाय निघत नव्हते. बराच वेळ घालविल्यानंतर आम्ही शिमलातील प्रसिद्ध "जखू' मंदिराकडे निघालो. जखू हे हनुमान मंदिर आहे. भारतात कुठेही फिरा, रामायणाचा संदर्भ हा येतोच. हनुमान संजीवनीच्या शोधात असताना या मंदिराच्या ठिकाणी विश्रांतीस आले होते, अशी एक दंतकथा सांगितली जाते. या मंदिराच्या परिसरात सर्वांत उंच अशी हनुमान मूर्ती आहे. शिमल्यातील हे एक प्रेक्षणीय असे मंदिर आहे. हे मंदिर खूप उंचावर असल्याने रोप वेची सोय उपलब्ध आहे.

संध्याकाळी शिमल्याच्या प्रसिद्ध "मॉल रोड'कडे पाय वळले. स्वच्छ, सुंदर, आल्हाददायी वातावरण असलेला हा मॉल रोड अन्य कुठे अनुभवता येणार नाही. प्रचंड गर्दी असूनही वातावरणात एक प्रकारची शांतता आणि प्रसन्नता मनाला भावत होती. संपूर्ण रस्ता लोकांनी व्यापला होता. हा एक वेगळाच अनुभव होता. मॉल रोडवरती अनेक हॉटेल्स आणि विविध वस्तूंची दुकाने थाटली आहेत. या रस्त्यावर वाहनांना प्रतिबंध असल्याने सगळा रस्ता हा पादचाऱ्यांसाठीच आहे, हे एक मॉल रोडचे वैशिष्ट्य आहे. मॉल रोडवर आनंद लुटताना रात्र कधी झाली याचे भानही नव्हते. हा दिवस बऱ्याच आठवणी मनात ठेवून मावळला.

दुसऱ्या दिवशीचा प्रवास हा शिमला ते मनाली होता. शिमल्यातील आठवणीत रमलेलं मन आता मनालीमध्ये काय काय असेल याचाही विचार करू लागले. शिमला-मनाली प्रवासात कुलू या ठिकाणी रिव्हर राफ्टिंगची मजा लुटली. बर्फाचे पाणी घेऊन वाहणारी व्यास नदी नितळ आणि स्वच्छ होती. व्यास नदीतील रिव्हर राफिंटगचा अनुभव सुखद आणि अविस्मरणीय ठरला. मनालीतील बर्फाळ पर्वतरांगा पाहताना असे वाटले, की निसर्गाने भरभरून दिलेल्या या सौंदर्याला खरेच तोड नाही. या बर्फात मनसोक्त खेळण्याचा मोह काही मनाला आवरला नाही. मनालीतील "हडिंबा' मंदिर एक प्राचिन वास्तुशैलीचे दर्शन घडवते. हे मंदिर वास्तुशैलीचा अप्रतिम नमुना आहे. हे मंदिर उंच झाडांत लपलेले आहे. निसर्गरम्य, सुंदर वातावरण मनाला सुखद अनुभव देऊन जाते. वेळ कसा जात होता हे कळत नव्हते.

शेवटी परतीचा दिवस उजाडला. मनात अनेक आठवणी आणि सुखद अनुभव घेऊन जड मनाने आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. खरे तर अजून काही दिवस भटकण्यासाठी मिळायला हवे होते. शरीर गाडीसोबत धावत होते आणि मन मात्र बर्फाळ पर्वतरांगातच रमले होते. थोड्या वेळाने शिमला-मनालीच्या अनुभवाच्या गप्पा सुरू झाल्या. दिल्ली गाठली. काही वेळात पुणे आलेही. आता उद्यापासून रोज ऑफिस, काम आणि धावपळ सुरू होणार, या विचाराने मन जरा दुखावले. पण गेल्या पाच दिवसांतील आठवणींनी पुन्हा ताजे झाले.

खरेच, रोजच्या धावपळीतून काही निवांत क्षण काढून एक "ब्रेक' घ्यायलाच हवा. म्हणजे मन पुन्हा जोमाने काम करू लागते. मग तुम्ही कधी घेत आहात एक "ब्रेक' रोजच्या धावपळीतून?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aparna dalvi-mane write article in muktapeeth