कृतज्ञता पाषाण

अपर्णा मोहिले
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

आयुष्यातील वाईट क्षण दूर ठेवून चांगले तेच आठवायचे. मन आनंदाने, शांतीने भरून जाते.

आयुष्यातील वाईट क्षण दूर ठेवून चांगले तेच आठवायचे. मन आनंदाने, शांतीने भरून जाते.

आमचे मित्र त्यांच्या "आनंद केंद्रा'त साऱ्यांना एक गुळगुळीत छोटा पाषाण देतात, ज्याला ते "कृतज्ञता पाषाण' असे म्हणतात. ते सांगतात, "हा पाषाण हातात घेऊन, ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी चांगले केले असेल, त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करायचे. तुमच्या हाताला सहजपणे लागेल अशा ठिकाणी तो ठेवायचा.' तो हातात घेऊन विचार करायला लागल्याबरोबर विलक्षण अनुभव येतो आणि मन कृतज्ञतेने व आनंदाने भरून जाते. होते काय, की आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याशी कुणी थोडे जरी वाईट वागले असेल, तरी आपण तेच लक्षात ठेवतो. स्वतःला दुःखी करून घेतो. याउलट "कृतज्ञता पाषाण' हाती घेतला, की त्या व्यक्तीने एकंदरीत जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात तुमच्यासाठी काय काय भले केले याचा विशाल कॅनव्हासच जणू तुमच्यासमोर उभा ठाकतो. तुमच्या यशात नि जीवनात त्याचे किती योगदान आहे याची तुम्हाला जाणीव होऊन तुमचे मन कृतज्ञतेने भरून येते. "आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी तुमची अवस्था होते. त्याची क्षणिक कठोर वागणूक मनातून पुसली जाते.
एक छोटसे उदाहरण देऊन हे सांगते. सासू-सुनांचे नाते खूप मजेदार व गुंतागुंतीचे असते. सासू म्हणजे "सारख्या सूचना' व सून म्हणजे "सूचना नको', या पार्श्‍वभूमीवर साधारणपणे सुनेला सासूबाईंच्या नकारात्मक गोष्टीच आठवत असतात; पण याच सासूने तिच्या घराची व मुलांची काळजी ती कामाला गेलेली असताना घेतलेली असते. तिनेच बाळंतपणात व एरवीही आजारात सुनेची काळजी केलेली असते. कृतज्ञता पाषाण हाती घेतल्यावर सूनबाईला या साऱ्यांची जाणीव होते. आपले करिअर व यश सासूबाईंशिवाय शक्‍य झाले नसते, हेही तिला उमगते व तिचे मन सासूबाईंबद्दलच्या कृतज्ञतेने व प्रेमाने भरून जाते. कुठलेही नाते असो, साऱ्यांना हा सिद्धांत लागू पडतो. कृतज्ञता पाषाण तुमच्या मनात सकारात्मक विचार व प्रवृत्ती जागी करतो. तुमचे मन अनोख्या प्रेमाने, आनंदाने व शांतीने भरून टाकतो.

Web Title: aparna mohile write article in muktapeeth