मैत्रीची एकसष्टी

शैला पंडित
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

नौसेनेतील दोन अधिकाऱ्यांची मैत्री झाली आणि त्यांच्या पत्नीही मैत्रिणी बनल्या. या मैत्रीची एकसष्टी नुकतीच झाली.

नौसेनेतील दोन अधिकाऱ्यांची मैत्री झाली आणि त्यांच्या पत्नीही मैत्रिणी बनल्या. या मैत्रीची एकसष्टी नुकतीच झाली.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

मला मार्गारेटची तीव्रतेने आठवण झाली. कारण, ती मला पहिल्यांदा भेटली त्याला एकसष्ट वर्षे झाली व ती मैत्री आजही तितकीच सुंदर आहे. जीवाभावाचे प्रेम ते! मार्गारेट भेटली ती मिसेस वाडदेकर होऊन. वाडदेकर आणि माझे पती, दोघेही भारतीय नौसेनेत कार्यरत होते. कामाच्या निमित्ताने दोघेही एक वर्षासाठी इंग्लंडला गेले असताना तेथे त्यांची ओळख झाली. १९५८ मध्ये मैत्री झाली. नंतर पुन्हा भेट झाली ‘आयएनए म्हैसूर’वर. वाडदेकरांचा इंग्लंडचा कार्यकाल संपल्यावर मार्गारेटही भारतात आली. तेव्हा आमची पहिली भेट झाली. मला जाणवते तो तिचा प्रथमपासूनचा आपलेपणा, वक्तशीरपणा, अगत्य, काटकसरीची राहणी, वडील मंडळींना मान देण्याची वृत्ती, स्वच्छता इत्यादी बाबतीतील तिची कार्यक्षमता. आता आम्ही दोघीही नव्वदीच्या उंबरठ्यावर आहोत. इतक्या वर्षांच्या मैत्रीपूर्ण सहवासामुळे आमच्या घरातील प्रत्येक कार्यास तिची औत्सुक्‍यपूर्ण उपस्थिती असते. आम्हा दोघींचेही यजमान निवृत्त होऊन बराच काळ लोटला तरी भेट होत असतेच. 

मार्गारेटचे आईवडील काही वर्षांपूर्वी इथे आले असताना आमच्या घरी आवर्जून आले होते. त्या भेटीत तिच्या वडिलांनी आमच्या मुलांबरोबर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. आमचा बंगला, बागेतील आंबे, चिकू, नारळ व इतर हरतऱ्हेची बहरलेली रंगीत फुलझाडे पाहून त्यांनी खूप आनंद, समाधान व्यक्त केले. मार्गारेटच्या इथल्या आगमनानंतर तिची मुले व आमची मुले लहान असताना बंगळुरू, म्हैसूर, उटी, कन्याकुमारी इत्यादी ठिकाणी सहली केल्या. त्यामुळे जवळीक अधिकच झाली. ख्रिसमस कार्ड, आमच्या लग्नदिनाच्या शुभेच्छा इतक्या वर्षात एकदाही चुकले नाही. आम्ही दोघांनीही निवृत्तीनंतर पुण्यातच स्थायिक व्हायचे ठरवले. त्यामुळे दोन्ही कुटुंबांची मैत्री, प्रेम अखंड राहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shaila pandit