मराठी सही

सुरेश पिंगळे
सोमवार, 16 मार्च 2020

मराठी दिन आला की मराठीतून स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले जाते; पण माझी सुरुवात तर पासष्ट वर्षांपूर्वी झाली. 

मी मॉडर्न हायस्कूलमध्ये असतानाची ही आठवण. कानिटकर सर यांनी स्थापिलेल्या या शाळेत प्रागतिक विचार व उदारमतवादी शिक्षणप्रणाली अवलंबलेली होती. केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता इतर कला, व्यायाम प्रकार, खेळ इत्यादीचे धडेदेखील दिले जात असत. भारताची प्रत्यक्षदर्शी माहिती व्हावी म्हणून दरवर्षी सहलींचेही आयोजन केले जाई. दक्षिण भारतातील सर्व महत्त्वाची कलात्मक ऐतिहासिक मंदिरे पाहण्यास गेल्याचे आठवते.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या सहलींपैकी श्रीलंकेची सहल खास स्मरणात घर करून राहिली आहे. त्याकाळी श्रीलंकेला `सिलोन’ म्हणत असत. श्रीलंकेला जायचे असल्याने आम्हा वीस विद्यार्थ्यांचे पासपोर्ट काढावे लागणार होते. पासपोर्टच्या अर्जावर सही करणे आवश्यक होते. तोपर्यंत सही करण्याचा प्रसंग कोणावरही न आल्याने आमच्या शिक्षकांनी आपापली सही तयार करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे मी मराठीमध्ये घोटून घोटून सही गिरविण्याचा सराव केला व सु. स. पिंगळे अशी मोठी लफ्फेदार सही मनाशी पक्की केली. सगळ्यांनी इंग्रजीमध्ये सह्या केल्या तर मी मात्र मराठीमध्ये अर्जावर सही केली. आमच्या शिक्षकांनी, चाफेकर सरांनी माझा अर्ज बाद केला आणि सही इंग्रजीमध्ये करण्यास सांगितले. मराठी सही चालणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले. मी हट्टाला पेटलो व मराठीमध्येच सही करणार असा आग्रह धरला. त्या पुष्ट्यर्थ मी असा दाखला दिला, की रशियन माणूस त्याच्या पासपोर्टवर रशियन भाषेतच सही करणार, इंग्रजीमध्ये नाही. त्यांना ते पटेना आणि मी त्यांचे ऐकेना. तेव्हा मग एका वकिलाला बोलावण्यात आले आणि त्याचा सल्ला घेण्यात आला. माझ्या सुदैवाने त्याला माझे म्हणणे पटले व त्याने पासपोर्ट खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून मराठी सही चालेल असा निकाल दिला. अशा प्रकारे माझा पासपोर्ट माझ्या मराठी सहीसह जेव्हा माझ्या हातात आला तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.

पासष्ट वर्षांपूर्वी शालेय जीवनात गिरवलेली मराठी सही आजदेखील मी माझ्या कागदपत्रांमध्ये, करारांमध्ये, बँकेच्या धनादेशांवर व इतरत्र मोठ्या अभिमानाने मिरवत असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article suresh pingale