सहज थोडा विचार

वसुधा जोशी 
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

केवळ रीतभात सांभाळण्यासाठी काही कृती केल्या जातात. त्यात दोन्ही बाजूंना त्रासच होतो. नव्या जुन्याचा मेळ घालत पुढे गेलो तर कदाचित यातून चांगले घडेल.

केवळ रीतभात सांभाळण्यासाठी काही कृती केल्या जातात. त्यात दोन्ही बाजूंना त्रासच होतो. नव्या जुन्याचा मेळ घालत पुढे गेलो तर कदाचित यातून चांगले घडेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डोहाळे जेवणाचे वातावरण छान प्रसन्न होते. प्रत्येक जण डोहाळतुलीची ओटी भरत होते. गंमत अशी की, येणाऱ्या प्रत्येकीने मुलीला साडी देण्याचा चंगच बांधला होता. तिच्या शेजारी साड्यांची एवढी भली थप्पी लागलेली. माझ्या मनात आले की, त्या मुलीला या एवढ्या साड्यांपेक्षा रोख रकमेचा जास्त उपयोग झाला असता, नाही का?

बरे आजकाल या मुली साड्या फारच क्वचित वापरतात. तेव्हा सर्व रोख एकत्र करून तिला तिच्या आवडीची चांगली संसारोपयोगी वस्तू घेणे सहज शक्‍य झाले असते. पण देणाराला असे वाटते, ‘रोख पैशात माझी किंमत केली गेली’, असे कोणाच्याही मनात येऊ नये. तेव्हा आहेर देणारा केवळ लोकलज्जेस्तव साडी देण्याची रीत चालू ठेवतो.

आपल्याकडे असे कितीतरी रितीरिवाज आहेत की, आपण ते केवळ लोकांसाठी पाळतो. मी काही वेगळा वागलो तर लोक मला नावे ठेवतील या भीतीने आपण त्यात फेरफार करायला तयार नसतो. हेच पाहा ना, मंगलप्रसंगी एखादी विधवा स्त्री औक्षण करायला किंवा तिची ओटी भरायला कचरते. एखाद्या नातेवाइकाचे निधन झाल्यावर त्याच्या दहाव्याला नदीवर जायचे असते. समजा, एखाद्या व्यक्तीला काही कारणामुळे तसे करणे जमले नाही तर जाता न आल्यामुळे त्या व्यक्तीला एक अपराधी भावना निर्माण होते.  तशीच गोष्ट आजारी नातेवाइकाला रुग्णालयात भेटायला जाण्याबाबतीत घडते.

खरे पाहिले तर आपल्या जाण्याने त्या रुग्णाला त्रासच होत असतो. पण मी जर गेलो नाही तर माझ्या मित्राला काय वाटेल या भीतीने आपण जातो. दहावी किंवा इतर महत्त्वाच्या परीक्षेला बसलेल्या मुलांना ‘बेस्ट लक’ देण्याचा केवळ उपचार म्हणून ऐन परीक्षेच्या वेळेसच फोन करण्याची आठवण होते आणि त्या दिलेल्या शुभेच्छा त्या विद्यार्थ्याला डोकेदुखीच होऊन बसते. काही सामाजिक कर्तव्ये आपल्या हातून होत नाहीत ही बोचणी वागवतच लोकांना तोंड द्यावे लागते. एकमेकांना समजून घेतल्यास समाजाच्या दडपणाच्या ओझ्याखाली कोणालाच वावरावे लागणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article vasudha joshi