विठ्ठल पावला

अरुण देव
शनिवार, 23 मार्च 2019

तो शेतकरी होता. तो लष्कराच्या डेपोत कामगार होता. तो वारकरी होता. त्याच्या प्रामाणिकपणात मला विठ्ठल पावला.

तो शेतकरी होता. तो लष्कराच्या डेपोत कामगार होता. तो वारकरी होता. त्याच्या प्रामाणिकपणात मला विठ्ठल पावला.

तळेगाव (देहूरोड) येथे बदली झाली होती. लष्कराचा तळेगाव डेपो खूपच मोठा आहे. लष्करातील भंगार वस्तू येथे गोळा करून त्याचा जाहीर लिलाव केला जातो. एके दिवशी एक मजूर डोक्‍यावर आडवी टोपी, दाढीचे खुंट वाढलेले, अंगात बाराबंदी, गुडघ्यापर्यंत ओढलेले काचा घातलेले धोतर असा माझ्या टेबलाजवळ आला. टेबलावर बिल ठेवत नुसता उभा राहिला. मी बिल नीट पाहिले. त्याला म्हटले, ""हे बिल पास होणार नाही.'' पैशासाठी जे कारण लिहिले आहे ते योग्य नाही. तो तसाच आशाळभूतासारखा उभा. त्याला बरेच काही सांगायचे होते. पण नुसताच उभा. मग मी त्याला सल्ला दिला, "वाढदिवस, पूजा, मुंज असे काहीही कारण दाखवा. मी बिल पास करतो. पण पंढरपूरची वारी नाही.' पाय ओढत तो बिल घेऊन गेला. दोन-एक तासाने तो बदललेले बिल घेऊन परत आला. मी त्याला विचारले, "दरवर्षी वारी करता?' "हो. बापाच्या खांद्यावर बसून पहिल्यांदा गेलो होतो. एकलाच चाललोय. दिंडीबरोबर जातो.' "इतकी वर्षे जाताय. पांडुरंग काही बोलतो का?' तो माझ्याकडे नुसता पाहत राहिला. बिल पास केले. कॅशिअरकडून पैसे घेऊन जाताना क्षणभर माझ्यासमोर थांबला. दहाच्या दोन नोटा मी त्याच्या हातात ठेवल्या. "दहा रुपये तुझ्या मुलांच्या खाऊसाठी. दहा विठ्ठलाच्या चरणी ठेव.' देहू गावातून पालखीच्या प्रस्थानाच्या दिवशी डेपोतले सर्व वातावरण विठुमय. मीही सामील झालो.

आषाढी एकादशी झाल्यावर तो आला प्रसाद देण्यासाठी. साखर, फुटाणे, मुरमुरे. पायातल्या वहाणा पुढे सरकावल्या. नामस्मरण करून त्याच्या हाताला हात लावून प्रसाद स्वीकारला. तो म्हणाला, ""विठुराया बोलला. या वर्षी सोळा आणे पीक. भाताची खाचरे तुडुंब भरतील. भुईमूग डवरलाय. सारे कसे हिरवे.'' त्याच्या चेहऱ्यावरील आनंद विठ्ठल भेटल्याचा. थोडसे थांबत त्याने चंचीतून एक कागद काढला. मी उलगडला. ती पंढरपूर देवस्थानची वीस रुपयांची अन्नदान केल्याची पावती होती. त्याच्या प्रामाणिकपणात मला विठ्ठल पावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arun deo write article in muktapeeth