दुधावरची साय (अरुण सहस्रबुद्धे)

अरुण सहस्रबुद्धे
मंगळवार, 12 जून 2018

प्रत्येक आजी-आजोबांना नातवंडं म्हणजे दुधावरील सायच असते. आपलेपणाने खेळणारे आजी-आजोबाही नातवंडांना हवे असतात. कालानुरूप आता यामध्ये थोडा बदल होत आहे. नात्यातील जिव्हाळा मात्र कायम आहे.

प्रत्येक आजी-आजोबांना नातवंडं म्हणजे दुधावरील सायच असते. आपलेपणाने खेळणारे आजी-आजोबाही नातवंडांना हवे असतात. कालानुरूप आता यामध्ये थोडा बदल होत आहे. नात्यातील जिव्हाळा मात्र कायम आहे.

आमच्या गप्पा सुरू असताना घरातील बच्चे कंपनी आजोबा, आजी येणार म्हणून वाट पाहत होती. आजोबा, आजीचा सहवास लाभणारी लहान मुले खरीच भाग्यवान. टक्कल असलेले कोणीही घरी आले, की न शिकवता मुले "आबा' आले म्हणतात. नातवंडाबरोबर खेळ खेळणारे आजोबा, खोटा खोटा चहा बनवून देणारी नात व तो खूप छान झाला आहे, असे म्हणणारी आजी, काऊचा घास, हम्मा दाखवणारी आजी, गाणे शिकवताना नाचून दाखवणारी आजी, न कंटाळता राजा राणीच्या, इसापनितीची गोष्ट सांगणारे आजोबा, आजी असे नातवंडे आणि आजी-आजोबांचे आनंदाने न्हाऊन निघालेले विश्‍व अजबच. प्रत्येकाला या सुखाची गरज असताना काहींच्याच वाट्याला हे सुख येते.

सकाळी 9 वाजता नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडणारे आई-बाबा आणि पाळणाघरात वाट पाहणारी ही चिमणी पाखरे. संध्याकाळी आई बाबांची वाट पाहत खिडकी आणि दारावरील बेल वाजण्याची प्रतीक्षा करणारी ही पिले पाहिली, की काळजाचा ठोका चुकतो. डे केअर, पाळणाघरात त्यांची चांगली काळजी घेतली जाते; पण आजी-आजोबांना त्यांचे लाडक कोकरू घरी त्यांच्याजवळ असणे आनंददायी वाटते.
माझ्या नातीने दोन वर्षे मला व माझ्या बायकोला जो लळा लावला त्याने आम्ही आमचे जगच विसरून गेलो. दोन वर्षे वयाच्या गार्गीला जवळच्या राम लक्ष्मण बागेत घेऊन जायचो. संपूर्ण रस्ता तिच्या आगमनाने जागा होई. जाणारे येणारे, खाऊचे दुकान, हातगाडीवरील पेरू, डाळिंब विकणारे ओळखीचे झाले. घसरगुंडी, झोके खेळताना तिला होणारा आनंद व आम्हाला वय विसरायला लावत असे. आमचे न ऐकताना एखादे साहसी प्रकार केले, की आमच्या काळजाचा ठोका चुके. "आबा' हा एवढाच शब्द तिचा परवलीचा. आब्बाऽऽऽ असा हुकूम सोडत तिच्या बरोबरीने आम्हाला ती पळवत असे. मोबाईलवर सफाईदारपणे हात फिरवून फोटो दाखवत असे. मुलाच्या नोकरीनिमित्त सध्या माझी नात गार्गी आयर्लंड येथे आहे. प्रत्येक दिवस तिच्या आठवणी मनाला हळूवार फुंकर घालतात. राम-लक्ष्मण बागेत जाणारा रस्ता स्तब्ध होतो. नारळपाणी, पेरूची गाडी, खाऊचा दुकानदार मला एकट्याला पाहिले की उगाचच हाताचा चाळा करतात. बागेतील घसरगुंड्या, झोपाळे मला एकट्याला पाहून माना फिरवतात. आबाऽऽ म्हणून वारा शीळ घालतो. कानाला जरी नातीचा आवाज ऐकू येतो तरी हाताला स्पर्श जाणवत नाही. डोळे पाण्यात डबडबतात. दुधावरची साय काढल्यासारखे होते.

बहुतेक आजी-आजोबांची नातवंडं परदेशात, बाहेरगावी आहेत. स्काइपवर हेच आजी-आजोबा त्यांच्याशी संवाद साधतात. "पोयम' म्हणून दाखव, खेळणी दाखव असे सुरू असते. माझ्या नातीने खोटा खोटा चहाचा कप कॉम्प्युटरपाशी येऊन थांबतो. आपले आजोबा-आजी प्रत्यक्षात का दिसत नाहीत याचे प्रश्‍न बालमनाला पडत असतील. गार्गीच्या आजीने तिच्यासाठी कपडे, खाऊ असा एक बॉक्‍स पाठवला. हा बॉक्‍स आजीचा असे म्हटल्यावर तिने तो उघडण्याचा प्रयत्न केला. आईने तिला विचारले काय करतेस, तर गार्गी म्हणते, ""आजीला हुडकतेय.''

आजकाल बहुतेकांची मुले, मुली परदेशात, बाहेरगावी असतात. फोनवर किंवा स्काइपवर मुलांना आई जेवलास का रे बाळा म्हणून विचारते. तिचा जीव त्यांच्या घासासाठी तगमगत असतो. पोटासाठी दूरदेशी फिरेन हे म्हणणे ठीक आहे. मायेचे पाश असे दूर होणे शक्‍य नाही. लळा, जिव्हाळा हे शब्द खरेच म्हणावे लागतील. माझ्या मैत्रिणीला ऑस्ट्रेलियात दोन जुळ्या नाती झाल्या. दोन छोट्या बाहुल्याच. दोन तीन महिन्यांनी तेथे राहून आजी परत आली ती काळजावर दगड ठेवूनच. डोळ्यांच्या कडा या बाहुल्यांना आपले हात कधी स्पर्श करतील याचा विचार करतच.
प्रत्येक आजी-आजोबांना आपल्या नातवंडांची गरज असते. आयुष्यभर काबाडकष्ट करून बहरलेल्या या वृक्षावर येणारी ही नातवंडांची फळ डोळ्यांनी, स्पर्शांनी अनुभवण्याची सोनेरी संधी. आपल्या बालपणात प्रत्यक्ष सहभागी होण्याचा हा सोहळा नातवंडं घडवतात. शाळेत नेणारे आणणारे आजोबा, फुगे, कागदाची नाव, पक्षी करणारे आजोबा, आई-वडिलांपेक्षा आबा आजीकडे हट्ट करणारे, आता तरी शक्‍य नसले तरी नात, नातू येईल तेव्हा खूप मजा करू म्हणून वाट पाहणारे आजी-आजोबा या दुधावरची साय अशीच घट्ट राहो असेच वाटते ना? नातवंडांच्या बाललीला पाहताना आपण भोवतालचे फसवे जग विसरतो. निरागस असणारी ही फुले ओंजळीत साठवून ठेवावीशी वाटतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arun sahasrabuddhe write article in muktapeeth