वळवाचा पाऊस

अरुणा नगरकर
सोमवार, 23 एप्रिल 2018

मळभ दाटून आलं. अंधारून आलं. अर्धवट उन्हात आकाशातून थंडगार, पाणीदार अक्षता धरणीवर पडायला लागल्या आणि अत्यानंदानं बाळगोपाळांच्या ललकाऱ्या सुरू झाल्या.. ‘आला, आला...’

गेला आठवडाभर प्रचंड उकडत होतं. तापमानानं  चाळीस अंशांचा भोज्जा शिवला होता. ऊन अगदी ‘मी, मी’ म्हणत होतं. लोकांना उन्हानं नको नको केलं होतं. एरवी पावसाळ्यात पावसाला कंटाळणारे लोक उन्हाळ्यात मात्र पावसाची आतुरतेनं वाट पहात होते. पावसानं जणू सगळ्यांची मनधरणी ऐकली आणि सगळ्यांना खूष करायचं ठरवलं. आकाशात काळे ढग जमायला लागले. बेभान वारं सुटलं. झाडांची वाळकी पानं हवेत गोल गोल फेर धरायला लागली. घरांची दारं-खिडक्‍या जोरजोरात आपटायला लागली आणि पावसाला ‘लवकर ये’ म्हणायला लागली.

मळभ दाटून आलं. अंधारून आलं. अर्धवट उन्हात आकाशातून थंडगार, पाणीदार अक्षता धरणीवर पडायला लागल्या आणि अत्यानंदानं बाळगोपाळांच्या ललकाऱ्या सुरू झाल्या.. ‘आला, आला, वळवाचा पाऊस आला.’

उन्हानं तापून तापून लाल पडलेली माती पाण्याचे थेंब आधाशासारखी घ्यायला लागली. ध्यानीमनी नसताना, अचानकपणे दणाणत आलेला हा खास पाहुणा, हा वळवाचा पाऊस जणू सगळ्यांसाठी नजराणाच घेऊन आला. हिरव्यागार पानांवर टपोरे मोती झुलायला लागले. उन्हाळी फुलांनी ‘शॉवर बाथ’ घेतला. सुकलेली माती सुखावली, गंधवती झाली. सगळा आसमंत मृद्‌गंधानं भरून गेला. गडद आकाशात ढगांची टकराटकरी सुरू झाली. जणू भले मोठे काळेकभिन्न गजराज एकमेकाला टकरा देऊ लागले. ढगांनी गडगडाट करून लहानग्यांना घाबरवूनच टाकलं. अशातच आभाळात क्षणात इकडे, तर क्षणात तिकडे अशा विजा चमकायला लागल्या. आभाळाच्या अंगणावर सौदामिनीनं रांगोळीच रेखाटली. गारांचा पाऊस सुरू झाला. लख्खकन्‌ चमकणाऱ्या विजेचा तोरा जास्त की एवढ्या गारांचा मारा जास्त, हा प्रश्‍न पडायला लागला. वारा तर भान विसरून वळवाच्या पावसाबरोबर अंगणभर नाचायला लागला.

घराच्या छतावर वळवाच्या पावसानं ताशा वाजवायला सुरवात केली. पावसानं सुरेख ठेका धरला, लय पकडली. मध्येच कमी, मध्येच जास्त, असे लयींचे प्रकार ऐकू यायला लागले. दूरवर चिंब भिजलेल्या रानातून, टेकडीवरल्या झाडीतून मोरांच्या केका सुरू झाल्या. लयीला सुरांची साथ मिळाली आणि जोडीला पाचूचा पिसारा फुलवून मयूरनृत्यही सुरू झालं. गायन, वादन आणि नृत्य असा जणू निसर्गाचा स्वर्गीय- संगीत- जलसाच सुरू झाला म्हणा ना!

प्रेमी युगुलांना तर वळवाचा पाऊस ही पर्वणीच वाटली. कुठंतरी वळचणीला, पावसाला चुकवत, खरं म्हणजे मुद्दाम वळवाच्या पावसात अर्धवट भिजत हळव्या आणाभाका घेतल्या गेल्या. ए रवी शपथा घेताना चंद्र, सूर्य, तारे यांना साक्षीदार करणाऱ्या प्रेमी जोड्यांनी चक्क वळवाच्या पावसाला साक्षीदार केलं! साक्षीला भिजवणारा खोडकर पाऊस असल्यावर मग काय! पाण्याच्या गारगार माऱ्यानं तनं थरारली, मनं शहारली आणि तिकडे रानंही तरारली आणि ही सगळी गंमत तो खट्याळ, हवाहवासा वाटणारा वळवाचा पाऊस बघतच राहिला.

निवाऱ्याला उभे राहणाऱ्यांपेक्षा वळवाचा पाऊस अंगावर झेलणारेच जास्त दिसले. आनंदानं त्याच्याशी हस्तांदोलन करणारे, ओंजळीत गारा वेचून मध्येच तोंडात टाकणारे लहानमोठे आणि चक्क छत्री उघडून पावसातून चाललेले आजोबा, सगळ्यांनी पाऊस खूप ‘एंजॉय’ केला.

तळपत्या उन्हानंतर सुखाचा सुगंध फवारणारा, आगामी पावसाची वर्दी देणारा, ‘सुगी येणार, नक्की येणार’ असं आश्‍वास देणारा असा वळवाचा पाऊस, अजून हवा, अजून हवा’ असं म्हणेपर्यंत गेलासुद्धा!

जाता जाता इंद्रधनुष्याचं तोरण बांधून गेला!

मळभ सरलं, आकाश लख्ख प्रकाशानं भरून गेलं. खरंच, वळवाचा पाऊस अचानक भरभरून आनंदाचा नजराणा देऊन गेला आणि ताप ताप तापलेलं तन आणि मन शांत करून गेला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aruna nagarkar article