अगाऽगं... विंचू चावला

अरविंद केमकर
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

विंचू चावला. जांघ धरली. शिरपतीने मंत्र म्हणत राखमाती चोळली. विंचू उतरला. पावरबाज राम्याने शिरपतीवर खुन्नस काढत त्याच्या कॅबिनमधूनच विंचू पुन्हा चढवला. दोघांच्या या खेळात मी विव्हळत राहिलो.

विंचू चावला. जांघ धरली. शिरपतीने मंत्र म्हणत राखमाती चोळली. विंचू उतरला. पावरबाज राम्याने शिरपतीवर खुन्नस काढत त्याच्या कॅबिनमधूनच विंचू पुन्हा चढवला. दोघांच्या या खेळात मी विव्हळत राहिलो.

सोगावला स्टेशनमास्तर म्हणून मी कामाला होतो. रात्रीचे अकरा वाजले होते. मी दूरध्वनीवर बोलत होतो. इतक्‍यात माझ्या उजव्या पायाला झटका बसला नि मी पाय जोरात आपटला. काहीच उमजेना. पाय आहे का नाही तेच कळेना. मांडी घट्ट आवळली गेली. डाव्या पायावरच उड्या मारायला लागलो. जोरात ओरडायला लागलो. तसे बाहेर बसलेला सदा पॉइन्टसमन बत्ती घेऊन आत धावला. माझ्या पायापाशी बत्ती धरुन म्हणाला, ""मास्तर! तुम्हाला विंचू चावला! हा काय मेलेला विंचू!'' आणि त्याने चटकन फोनवरुन "बी' कॅबिन लिवरमनला स्टेशनात बोलावून घेतले.

भयंकर वेदना. उजवी जांघ घट्ट धरलेली. लोहाराने भट्टीतून काढलेल्या सळईवर आपला पाय पडावा किंवा विसरतेपणी विजेचा शॉक बसावा तशी. पण त्या जखमा जागेवरच असतात. इथे जांघेपर्यंत पूर्ण पाय जखडलेला. काही सुचेना. त्या मेलेल्या विंचवाकडे मी अगतिकपणे पाहात होतो. केवढा लहान हा प्राणी आणि केवढी ही शक्ती!
पळत पळतच शिरपती स्टेशनात आला. कुठून तरी राख माती आणली. अस्पष्ट उलटसुलट शब्द उच्चारत काही मंत्र पुटपुटले. वरपासून खालपर्यंत पायाला राख माती चोळली. आणि काय आश्‍चर्य! त्या क्षणीच विंचू उतरला! आणि मी हसायला लागलो. जांघ मोकळी झाली. तळपायावर किंचित फुणफुण राहिली. धीर आला. मी शिरपतीचे अक्षरशः पाय धरले आणि पुढील कामकाज पाहू लागलो. मी सुट्टी देणारा मास्तर म्हणून बाकी शहरात गायब.

पुन्हा काहीतरी गडबड. पुन्हा जांघ धरली. तीच पूर्वीची बिकट अवस्था. शिरपती तिथें होताच. म्हणाला, ""मी पुन्हा प्रयत्न करतो. पण "अे' कॅबिन लिवरमन राम्याला ही गोष्ट मघाशी समजलीय. तो खोडी करतोय. तो लई पावरबाज आहे. तो माझ्या खुन्नसवर विंचू चढवतोय. परत तुम्ही जाण्यापूर्वी मी पुन्हा उतरवतो. एकदा तुम्ही सोगावच्या वेशीबाहेर गेला की कुणीबी चढवू शकणार नाही.'' तरीही तो राख, माती घेवून प्रयत्न करीत राहिला. कधी उतरला असे वाटायचे, कधी चढतोय असे वाटायचे. वित्रित्र अवस्था. कसा तरी काम करीत होतो. गाड्या येत-जात होत्याच. रात्री दीडची पॅसेंजर आली. माझ्या सहकाऱ्याने मला सोडवले. पुन्हा मंत्र प्रयोग झाला. बराचसा विंचू उतरला होता. अहंकार तर गेलाच होता. आणि पोमलवाडीला पोहोचलो. माझा उतरलेला चेहरा पाहून मंडळींनी प्रश्‍नार्थक नजेरेने माझ्याकडे पाहिले. कुणी ऐकणार नाही हे माहित असूनही हळू आवाजात सांगितले, ""विचू चावला होता, पण आता उतरलाय.'' तिने मला पहाटेच ग्लासभर चहा दिला नि मी विसावलो. पहाटेची वेळ अशी असते की, कितीही मानसिक, शारीरिक त्रास असला तरी पुढे अगदी शांत, गाढ झोप लागते. सकाळी दहा वाजता उठलो. त्या दिवशी माझी सुट्टीच होती. मनात विचार आला, िंवंचू चावणे, उतरविणे, पुन्हा चढणे, राख, माती, मंत्र, पुन्हा उतरणे यापेक्षा विंचू दंशावर औषध नसावे असे कसे?

एवढ्यात मालगाडी स्टेशनात पाण्याकरिता थांबलेली पाहिली. मालगाडी पकडली नि दौंडला पोचलो. उतरल्या उतरल्या माझे केमिस्ट स्नेही आगरवाल यांच्या दुकानी गेलो. नमस्कार झाले. कुणी ऐकत नाही हे पाहून त्यांना मी हळू आवाजात रात्रीचा विंचू दंशाचा चमत्कार सांगितला. तसे ते मोठ्यांदा म्हणाले, ""अहो, एवढे घाबरताय काय मास्तर?'' आणि त्यांनी मागल्या कपाटातल्या दोन पुड्या माझ्यापुढे ठेवल्या.
पोटॅशियम परमॅंगनेट ( गुलाबी) आणि सायटिक ऍसिड (लिंबू सत्वांश - पांढरी पावडर).

म्हणाले, ""जिथं विंचू चावतो तिथे घाम येतो. त्या घर्मबिंदूवर या पावडरी आलटून पालटून पेरुन किंचित शिग तयार करायची आणि त्यावर ताज्या लिंबाचे दोन-तीन थेंब पिळायचे. झटका बसेल. फसफसून येईल नि विंचू उतरेल. जागेवर थोडी फुणफुण राहील. फोड येऊ नये म्हणून डेऱ्यातले गार पाणी टाकावे. किंमत पंचवीस पैसे.''
मी आठ-आठ पुड्या घेतल्या. पुढे विचू चावलेल्यांवर प्रयोग केला. तो यशस्वी झाला. किंचाळत असलेली लहान मुले हसायला लागायची. दोन्ही स्टेशनांवर, ग्रामपंचायतीतही, सेक्‍शनमध्ये फोनवर सर्वांना हे औषध सांगितले. पण खेडेगावातल्या लोकांना वाटायचे औषध निमित्तमात्रच, मास्तर मंत्र म्हणतात. "हरि हरि' म्हणतात. मंत्रानेच विंचू उतरवतात. म्हणून मंडळी मी जखमेवर औषध पेरताना माझ्या ओठाकडेच टक लावून पाहात. रात्री-अपरात्री बैलगाडीतून लोक यायचे. दोन-तीन वर्षांत अनेक विंचूदंश पीडितांना दिलासा मिळाला.

मध्यंतरी विंचूदंश संशोधनाची बातमी वृत्तपत्रातून वाचली. हॉफकिन इन्स्टिट्युटला माझा अनुभव कळवला. त्यांनी एकाचा पत्ता कळवला. त्यांनाही मी पत्र लिहिले. पण पुढे कोणाकडूनही काही उत्तर आले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arvind kemkar write article in muktapeeth