आसवांचे आवर्तन चालूच राहणार?

अस्मिता पगडे
गुरुवार, 29 मार्च 2018

"माझा वाढदिवस कशी विसरलीस गं? शुभेच्छा देणारा पहिला फोन तुझाच असतो,'' खूप नाराजीच्या स्वरात कुलकर्णी काका बोलत होते. सॉरी म्हणाले नि मनापासून शुभेच्छा दिल्या. या महिन्यात अनुश्रीचेदेखील लग्न; पण दिवस कोणता? कॅलेंडरकडे पाहिले. खरं तर नवीन वर्षाचं कॅलेंडर लावण्यापूर्वी प्रत्येक महिन्याच्या पानावर नोंदी करण्याची सवय. राहून गेलेलं ते काम उरकण्यासाठी जुनं कलेंडर हाती घेतलं. एकेक पान उलटत गेले नि मन त्या तारखांच्या जाळ्यात गुंतायला लागलं. कित्येक चांगले- वाईट अनुभव, आठवणी पानांपानावर विखुरलेल्या होत्या. प्रत्येक सुख-दुःखाचे संदर्भ अवघ्या 12 पानांत सामावलेले होते.

"माझा वाढदिवस कशी विसरलीस गं? शुभेच्छा देणारा पहिला फोन तुझाच असतो,'' खूप नाराजीच्या स्वरात कुलकर्णी काका बोलत होते. सॉरी म्हणाले नि मनापासून शुभेच्छा दिल्या. या महिन्यात अनुश्रीचेदेखील लग्न; पण दिवस कोणता? कॅलेंडरकडे पाहिले. खरं तर नवीन वर्षाचं कॅलेंडर लावण्यापूर्वी प्रत्येक महिन्याच्या पानावर नोंदी करण्याची सवय. राहून गेलेलं ते काम उरकण्यासाठी जुनं कलेंडर हाती घेतलं. एकेक पान उलटत गेले नि मन त्या तारखांच्या जाळ्यात गुंतायला लागलं. कित्येक चांगले- वाईट अनुभव, आठवणी पानांपानावर विखुरलेल्या होत्या. प्रत्येक सुख-दुःखाचे संदर्भ अवघ्या 12 पानांत सामावलेले होते. त्यावरील केलेल्या खुणांमध्ये अर्थ दडलेला, काही खुणांत मोरपिसाची मृदू भावना, तर काहींची मनावर ओरखडे उमटल्याची वेदना, काही त्या प्रसंगांना माणसांना नव्याने भेटण्याचे चैतन्य जागविणाऱ्याही होत्या.
डिसेंबर... शेवटच्या त्या पानाकडे येताना मन सुन्न झाले. आज दोन- तीन महिने उलटले. काळच औषध सगळ्या जखमा बुजवेल ही आशा फोल ठरली. 18 डिसेंबर नि 24 डिसेंबर... त्याभोवती रेखाटलेल्या लालबुंद वर्तुळाकडे लक्ष जाताच हातातलं पेनचं गळालं. त्या दोन तारखांनी सारा भूतकाळ उलगडून ठेवला. 18 डिसेंबर अबोलीचा वाढदिवस नि 24 डिसेंबरला लग्नाचा. चार वर्षांपूर्वीचा तो आनंदाचा सोहळा आठवला; पण क्रूर नियतीने विचित्र फासे टाकले नि देवाब्राह्मणाच्या साक्षीने मारलेली गाठ त्याच दिवशी सोडवली... कायमचीच.

या चार वर्षांत त्यांनी किती काळ एकत्र घालवला? त्यामुळे पती-पत्नीपेक्षा मैत्रीचा धागाच जास्त अतूट होता. अबोलीची गिर्यारोहणाची आवड लक्षात घेऊन प्रफुल्लने तिला ऍडव्हॉन्स कोर्स करायला लावला. त्यानंतर तिने जिद्दीने भागिरथी शिखर सर करून एक उत्तम गिर्यारोहक असल्याचे दाखवून दिले. प्रफुल्लच्या सर्पोटमुळेच आज तिची स्ट्रॉंग वुमन म्हणून ओळख झाली. त्या दिवशी ती दुष्ट बातमी कळाल्यावर अभिषेकसह ती जम्मूला रवाना झाली. अंतर्यामीची वेदना लपवत नुकत्याच डोकावू पाहणाऱ्या स्वप्नांची कवाडं बंद करून अभिसह सारे सोपस्कार तिने पार पाडले. मित्र, भाऊ नि लष्करी अधिकारी (मेजर) या तिहेरी भूमिका बजावणाऱ्या अभिषेकचेही कौतुक करावे तितके कमीच.

जवळच डायरी पडली होती. मनातलं सारं सांगण्यासाठी ती जिवाभावाची सखी होती. पान चाळता चाळता काश्‍मीरहून आणलेले चिनारचं पान दिसलं. हिरवी ओलाई केव्हाच लुप्त होऊन सुंदर जाळीदार नक्षी तयार झाली होती. ती नक्षी न्याहाळताना मनात आठवणींची नक्षीही उमटत गेली. सांबाला त्यांच्या घरी राहून लष्करी कार्यशैली, राहणीमान पाहायला मिळाले. त्या वेळी खट्याळ, मस्तीखोर प्रफुल्लमधला अधिकारी जाणवला. नंतर जम्मू-काश्‍मीर, लेह-लडाखच्या प्रवासात त्याने घेतलेली काळजी सारं काही नजरेसमोरून तरळून गेलं. धम्माल मस्ती आठवली. आज जरी तो आमच्यात नसला तरी अभिमानाने ऊर भरून यावा, अशा मनमिळाऊ, अत्यंत प्रेमळ, नावाप्रमाणे प्रफुल्ल ही छबी कायम स्मरणात राहील. त्या दरम्यानच आमच्यात नात्याची वीण घट्ट होत गेली. अबोलीची ही "म' मावशी त्याचीही "म' मावशी झाली नि आता लक्षात येते, मनात तर त्याच्याविषयीची मायेची, आपुलकीची ओल संजीवनी होऊन घट्ट रुजली आहे, नि तेच संजीवक सत्त्व आमच्या अंतःकरणात एक नवी ऊर्मी जागवते, प्रेरणा देतेच; पण मनाला सावरतेही.

कारगिलला प्रफुल्लच्या समवेत आम्ही धारातीर्थी पडलेल्या जवानांना तेथील धूळ माथी लावून मनोमन श्रद्धांजली वाहिली. त्या पावन भूमीवर अनेक भारतीय जवान जखमी व जवळपास 490 जवान शहीद झाले. अशा पावन भूमीवर पाऊल ठेवण्याचे भाग्य आम्हाला प्रफुल्लमुळे मिळाले नि तोच देशासाठी शहीद झाला. किती विचित्र योगायोग ! कीर्तिरूपाने तो सदैव अमर राहील. त्यामुळे डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूत त्याला गमावल्याचे दुःखही आहे नि अभिमानही. शोकाकुल परिस्थितीत खूप लोकांनी आमचे सांत्वन केले. आमच्या दुःखात सहभागी झाले, त्यासाठी आम्ही सदैव ऋणी राहूच; पण अशाच आसवांच्या कहाण्यांचे आवर्तन चालूच राहणार? हा प्रश्‍न मनाला छेद देऊन जातो.

सीमेवर लढणारे जवान एकदिलाने धर्म-जात विसरून थंडी, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता देशाचे रक्षण करतात नि इकडे मात्र पेपरमध्ये चॅनेल्सवर अनेक विचार व्यक्त होतात. दोनच्या बदली चार, सूडभावना... नि पुन्हा तेच ते. काही जण जवानांच्या बलिदानाला धार्मिक रंग देतात. सत्ताधारी वीरश्रीयुक्त भाषणे देत एकमेकांवर टीका करतात; पण सीमेवर शहीद झालेले मग ते पाकिस्तानी असो वा भारतीय, त्यांचे कुटुंबीय या साऱ्या विचारांच्या किती पलीकडे गेले असतील? त्यांच्या मनातील टाहो तर एकच प्रश्‍न विचारेल, अजून असे किती लेकरांचे अस्तित्व छायांकित होऊन राहणार?
संघर्षाने, राजकारणाने हा प्रश्‍न सुटणार? शांतीचा काहीच मार्ग नाही का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asmita pagde write article in muktapeeth