अनुभवाचं हस्तांतर

भाग्यश्री चौथाई
मंगळवार, 23 मे 2017

प्रसंग साधेसेच असतात; पण आपण त्याकडे संवेदनशीलतेने पाहणार की नाही, हे महत्त्वाचे. रस्त्यावर घडणाऱ्या प्रसंगातूनही सजग पालक आपल्या मुलांपर्यंत सामाजिक जाणिवा पोचवू शकतात. अनुभवाच्या हस्तांतरातून मुलांना घडवू शकतात.

प्रसंग साधेसेच असतात; पण आपण त्याकडे संवेदनशीलतेने पाहणार की नाही, हे महत्त्वाचे. रस्त्यावर घडणाऱ्या प्रसंगातूनही सजग पालक आपल्या मुलांपर्यंत सामाजिक जाणिवा पोचवू शकतात. अनुभवाच्या हस्तांतरातून मुलांना घडवू शकतात.

भर दुपारची वेळ. डोक्‍यावर बाराचं रणरणतं ऊन. सिग्नलला माझी गाडी थांबली. शेजारीच आणखी एक गाडी येऊन थांबली. आई आणि तिची दोन लहानगी मुलं... कुठंतरी पोहण्याचा क्‍लास करून आलेली. सुटीचा उपक्रम असावा. डोक्‍यावर टोपी, सनकोट, गॉगल, गळ्यात वॉटर बॉटल असा सगळा जामानिमा.
तेवढ्यात त्याच मुलांच्या वयाची मुलं. काळी-सावळी, बनियन तोही फाटका, जीर्ण झालेला, अनवाणी पाय भाजतात; पण त्याची काही फिकीर नाही. इवलासा हात पुढं करत मदतीसाठी याचना करत माझ्या गाडीजवळ आली.
गाडीवरच्या मुलांचं लक्ष आता रस्त्यावरच्या या मुलांकडे.

तेवढ्यात त्या आईचा आवाज आला, "बघा, आईचं ऐकलं नाही, सारखा हट्ट केला, की मग देवबाप्पा अशी शिक्षा देतो. कळलं का?'... तेवढ्यात सिग्नल सुटला.
बाप रे! काय हे? माझ्या मनात विचार आला, म्हटलं तर आईची ही यादी कितीतरी वाढत जाईल, अगदी सकाळी लवकर उठायचं यापासून ते कटकट न करता दूध प्यायचं, सगळ्या भाज्या खायच्या, वेळच्या वेळी होमवर्क करायचा, सारखं कार्टून बघायचं नाही, उलटं बोलायचं नाही, अशा कित्येक गोष्टी चुकल्या की त्यासाठी देवबाप्पा सिग्नलवर हात पसरण्याची शिक्षा करीत असणार. या आणि अशा कित्येक गोष्टी आपल्या मुलांनी बिनबोभाट कराव्यात व आपलं सर्व काही ऐकावं यासाठी पालक वाट्टेल ते करतात. आता हेच पाहा ना, त्या प्रसंगी ती आई नक्कीच काहीतरी वेगळं बोलू शकली असती. रस्त्यावर हात पसरण्याची वेळ कुणावरच येऊ नये, लहान मुलांवर तर अजिबात येऊ नये. समाजातील अशा गरिबांविषयी मनात दयाबुद्धी जागृत व्हायला हवी. अशा संवेदना सहज जागृत करता येतात. "जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा' असा संस्कार मुलांना संध्याकाळच्या संस्कारवर्गात घालून शिकविता येत नाही, तो येथे प्रत्यक्ष करता आला असता.

आजूबाजूला अनेक घटना घडत असतात आणि मुलं पालकांकडे रोल मॉडेल म्हणून बघत असतात. पालक काय बोलतात? कसं वागतात? त्यांची प्रतिक्रिया काय असते? कळत-नकळत त्या घटनांमधून ती शिकत असतात. खरं तर हेच शिक्षण असतं. कायमस्वरूपी टिकणारं, शाश्वत असं.

मला माझ्या लहानपणाची एक घटना अजूनही आठवते आहे. आमच्या घरासमोरून दोन्ही पाय नसलेला एक भिकारी जायचा. त्या वेळी वडील एक गोष्ट सांगायचे, "सायकल चालविण्याऱ्यानं नेहमी पायी चालणाऱ्याकडे पाहावं, पायी चालणाऱ्यानं ज्याला पायच नाहीत अशा व्यक्तीकडे पहावं व समाधानी राहावं.' आम्ही मुलं सतत काहीतरी हट्ट करायचो, त्या संदर्भात ही गोष्ट ते आम्हा मुलांना सांगायचे. आज मी चारचाकीत बसले तरी ती गोष्ट व तो पाय नसलेला भिकारी कायम आठवत राहतो.
उन्हाळ्याच्या सुटीत गच्चीवर धान्य वाळत घातलेलं असायचं व संध्याकाळ झाली की ते गोळा करून ठेवायची जबाबदारी आम्हा मुलांवर असायची. खेळायला जाण्याच्या धांदलीत धान्य भरताना काही दाणे खाली सांडलेले असायचे. हे खाली पडलेले दाणे तसेच टाकून आम्ही मुलं खेळायला पळायचो. तेव्हा काका ज्वारीचा एक एक दाणा उचलून सांगायचे, की या एका दाण्यातून नवीन रोप येतं अन्‌ त्याचे अनेक दाणे तयार होतात. त्यामुळे धान्य असं वाया घालविता कामा नये. आजही काकांचं वाक्‍य मनात घुमत असतं. कुकर लावताना तांदूळ, डाळ धुवायच्या वेळी आजही एखादा दाणाही वाया जाणार नाही, याची दक्षता घेण्याची सवय झाली आहे. अशी सवय होणं हा संस्कार.

अशा अनुभवातूनच जीवन समृद्ध होत असतं. आज भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या पिढीला कदाचित हे पटणार नाही; पण हीच अनुभवांची शिदोरी पुढे आयुष्यात उपयोगी पडते, हे मात्र नक्की.

सिग्नलपाशी भेटलेली आई तिच्या मुलांना कित्येक गोष्टी नक्कीच सांगू शकली असती. तुमच्या पुढ्यात आज एवढ्या सुखसोयी लोळण घेत असताना समाजातील एक वर्ग उपेक्षित आहे. समाजातील ही विषमता, गरिबी, तुमच्याच वयाच्या असलेल्या या मुलांना करावे लागणारे कष्ट, साध्या साध्या वाटणाऱ्या पण न मिळणाऱ्या गोष्टी व त्यासाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष, त्याचबरोबरीनं या वयात शिक्षण, प्रेम, माया, आपुलकी यांना कसं पारखं व्हावं लागतं, अशा अनेक गोष्टींकडे मुलांचं लक्ष वेधता आलं असतं.

जे शिक्षण शाळेत मिळत नाही, ते अनौपचारिक शिक्षण अशा अनुभवातून मिळतं; पण त्यासाठी थोडीशी डोळस वृत्ती व घटनेकडे पाहण्याची संवेदनशीलता हवी. अशा गोष्टींतूनच पालक म्हणून आपणही घडत असतो व भावी पिढीला समृद्धीचा शाश्वत वारसा देत असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhagyashree chauthai write article in muktapeeth