अजि म्या ब्रह्म पाहिले..!

मिलिंद पानसरे
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

पाण्याचा एक लोंढा येत होता आणि वाटेत जे काही येईल त्याला घेऊन जात होता. बघता बघता पाणी वाढले, पार्किंगमधल्या गाड्या तरंगू लागल्या आणि सर्व वाहने एकमेकांवर आपटू लागली. पाणी वेगाने वाढत होते. एव्हाना पहिला मजला पाण्याखाली गेला. मला काहीच सुचत नव्हते.
 

नेहमीप्रमाणे मी पेपर उघडला. पण नवीन काहीच नव्हते. खून,दरोडे, बलात्कार, अपघात अशा अनंत बातम्यांनी पेपर भरून गेला होता. माझे आई- बाबा अंथरुणाला खिळले होते. दोघांनाही शांत झोप लागली होती. मुलगी कॉलेजला गेली होती. बायको तिच्या मैत्रिणीबरोबर खरेदीसाठी मॉलमध्ये गेली होती. माझे बॉस अमेरिकेला गेले असल्याने मला काहीच काम नव्हते. "लिखाण करावे' तर काही सुचत नव्हते. पावसाने आता जोर धरला होता. तसा परवा रात्रीपासून पाऊस कोसळत होता. बाहेरही जाता येत नव्हते. इतक्‍यात राहुलने म्हणजे माझ्या मित्राने फोनवरून टीव्ही चालू करण्यास सांगितले आणि मुंबईला काही तरी घडले असल्याचे बघ असे म्हणाला.

टीव्ही लावता क्षणी डोळ्यावर विश्वास बसणार नाही, अशा अतर्क्‍य घटना डोळ्यासमोर दिसत होत्या. सतत दहा दिवस अखंड पाऊस पडल्यामुळे समुद्राच्या पाण्यात वाढ होत होती. जवळ जवळ 15 फुटी लाटा उसळत होत्या आणि अर्ध्यापेक्षा जास्त मुंबई पाण्याखाली गेली होती. मी ताबडतोब मुंबईच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यास सुरवात केली. पण एकाचाही फोन लागत नव्हता. माझ्या मनात नको नको ते विचार येत होते. इतक्‍यात वीज गेली आणि टीव्ही बंद पडला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन, घरी निघून येण्यास सांगावे तर बायको आणि मुलीचे फोन लागतच नव्हते. इतक्‍यात आमच्या 11 मजली इमारतीच्या खाली गलका ऐकू आला.

बघतो तर काय.. पाण्याचा एक लोंढा येत होता आणि वाटेत जे काही येईल त्याला घेऊन जात होता. बघता बघता पाणी वाढले, पार्किंगमधल्या गाड्या तरंगू लागल्या आणि सर्व वाहने एकमेकांवर आपटू लागली. पाणी वेगाने वाढत होते. एव्हाना पहिला मजला पाण्याखाली गेला. मला काहीच सुचत नव्हते. मी गच्चीवर जात असल्याची चिठ्ठी खरडून नेहमीच्या जागी अडकवली. पाणी आता दुसरा मजला पार करत होते. आई आणि बाबा शांत झोपले होते. मला हाताला लागेल ते खाण्याचे पदार्थ, पाण्याची बाटली , गाडगीळा सराफांकडून वेळो वेळी घेतलेले सोने आणि बॅंकेच्या मुदत ठेवीच्या पावत्या घेवून मी गच्चीवर पोहोचलो. मला आश्‍यर्याचा धक्का बसला.

गच्चीवर पाय ठेवण्यास जागा नव्हती. सगळीकडे रडारड, गलका,आरडाओरडा ऐकू येत होता. सगळ्यांचे चेहरे दुःखी आणि भेदरलेले होते. कोणीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मला आई-बाबांची आठवण झाली. केवढा मूर्ख ,नालायक मी! सोनं नाणं घेऊन आलो वर आणि आई-बाबा खालीच ठेवले. आता पाणी सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले. मी चौथ्या मजल्यावर राहतो. 'आई-बाबांचे काय झाले असेल' या विचाराने माझा श्वासच अडकला. गच्चीवरून दिसणारे दृश्‍य फारच विदारक होते. पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात गाई, म्हशी, डुकरे, साप, वाहने वाहून चालली होती. अनेक फर्निचरदेखील वाहत चालले होते. आता मात्र माझ्या 11 मजली इमारतीचा 'अभिमान" गळून पडला आणि अशा वेगाने पाणी वाढले तर आपणही काही वाचत नाही, हे कळून चुकले. इतक्‍यात माझ्यासमोरून, मागच्या महिन्यातच लोन फेडून माझ्या नावावर झालेली माझी लाडकी 'आय ट्‌वेंटी' ही पाण्यात तरंगत तरंगत निघून गेली. रडावसं, ओरडावंसं वाटलं, पण हुंदकाच फुटेना..!

तेवढ्यात आमच्यासमोर राहणाऱ्या सोनावण्यांचा मुलगा विनित दिसला. तो आई-बाबांच्या नावाने हाका मारत होता आणि 'आतापर्यंत दिलेल्या सर्व परीक्षांमध्ये कॉपी करून पास झाल्याबद्दल माफ करा' म्हणून ओरडत होता. नवव्या मजल्यावरच्या एका खिडकीच्या ग्रीलला सोसायटीच्या दुकानातला मारवाडी लटकला होता. मला पाहताक्षणी 'वाचवा, वाचवा' म्हणून ओरडू लागला आणि 'गेल्या महिन्यात मला फसवून माझ्याकडून आणि बायकोकडून दोनदा पैसे घेतले, त्याबद्दल माफ करा' म्हणत श्रीकृष्णाचा जप करू लागला. तिकडे 'पार्किंगच्या जागेवरून उगाचच सगळ्यांशी भांडल्याबद्दल जोसेफ ज्याची त्याची माफी मागत येशूचा धावा करत होता. एकूणच, ही गच्ची म्हणजे एक 'कन्फेशन बॉक्‍स' झाला होता. मीदेखील 'आपटेंच्या बायकोकडे वाईट नजरेने पाहत असल्याबद्दल' त्यांची माफी मागितली.

आता माझ्या छातीपर्यंत पाणी आले होते. माझे लक्ष आकाशाकडे गेले आणि साक्षात परमेश्‍वरच हे दृष्य पाहत आहे, असे जाणवले. आपणच बनविलेल्या सृष्टीचा विध्वंस पाहताना त्याच्या चेहऱ्यावर उद्वेग स्पष्ट दिसत होता. पण कलियुगाचा शेवट असाच होणार होता. आता माझ्या नाका-तोंडात पाणी जाऊ लागले. मी खोल बुडू लागलो.. खोल.. आणखी खोल.. आणि माझे डोळे खाडकन उघडले..!

बापरे! हे काय असावं?

ते मला पडलेलं एक भयानक स्वप्न होतं. दोनच दिवसांनी उत्तरांचलमध्ये झालेल्या निसर्गाच्या कोपाची भयंकर दृष्ये टीव्हीवर पाहिली. हे काय असावं? अजूनही मी मला पडलेल्या स्वप्नाचा आणि उत्तरांचलमध्ये घडलेल्या घटनांचा काही संबंध आहे का, हे ताडून पाहत आहे.. असेलही.. नसेलही..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blog by Milind Pansare