अस्‍पष्‍ट व्‍यवस्‍थेतील जखम

अस्‍पष्‍ट व्‍यवस्‍थेतील जखम

उंच डोंगरावर उभं राहिलं म्‍हणजे, आपल्‍या नजरेत सारा आसमंत भरतो. आपली नजर जिथपर्यंत पोहचते, तिथपर्यंतचा आवाक डोळ्यांत साठवता येतो. ठिपक्‍यांसारखी दिसणारी माणसं, नखावर बसवता येईल इतकं छोटं गाव, बोटभर दिसणारं क्षितिज सारं काही आपल्‍या पापण्‍यांच्‍या कवेत सामावून घेता येतं. पण, डोळे बंद करून आपल्‍या अंतरंगात डोकावून बघितले की; खोल आठवणींचा डोह, दुःखाची नदी आपल्‍या रक्‍तातून वाहताना दिसते. आतील काळेकभिन्‍न प्रतिमा, डोळ्याने न्‍याहाळलेल्‍या सौंदर्याला काळीमा फासून जाते. जगण्‍याच्‍या व्‍यवहारात आपण कितीही हसत-खेळत जगलो तरी, दुःखाचा पक्षी कधीना कधी मनात डोकावत असतो. त्‍याचे आपल्‍या जीवन व्‍यवहाराशी नाते आहे. म्‍हणूनच आपली नाळ सुख दुःखाशी जोडल्‍या गेली आहे.

सायंकाळ झाली की, पथदिव्‍यांनी कच्‍चे रस्‍ते उजळून निघायचे. ज्‍यांच्‍या घरी विजेची सोय होती, अशांच्‍या घरी उजेडाचे साम्राज्‍य असायचे. ज्‍यांचे घर अंधाराने माखलेले होते, अशांच्‍या भिंती मिणमिणत्‍या दिव्‍यांनी उजळून निघायच्‍या. दिवे आपला सभोवताल जिवाच्‍या आकांताने प्रकाशमान करायचे. अंधार गर्भार व्‍हायला लागला म्‍हणजे, पुस्‍तकांची फडफड दिव्‍यांच्‍या सोबतीने बंद व्‍हायची. आजूबाजूला सर्व शांत व्‍हायचं. केव्‍हातरी एखाद्या पक्ष्‍याचा आवाज रात्रीचे शांतपण भंगवून टाकायचा. जाईबाई विकल आवाजात वया गाऊ गाऊ रडायची. वया गाणे म्‍हणजे आपल्‍यातून दूर निघून गेलेल्‍या माणसांच्‍या आठवणींचा धागा पकडून लांब स्‍वरात रडणे. तिचा परिवार अत्यंत छोटा. मुलीचा विवाह एका पोलिसाशी झाला. घरगुती वादातून तिने आत्‍महत्‍या केली.

तिची आठवण जाईबाई काढायची आणि सारखी रडायची. येटारातले सारे जमा व्‍हायचे तिला समजवायचे. मग ती शांत व्‍हायची. तिच्‍या रडण्‍याने मी प्रचंड अस्‍वस्‍थ व्‍हायचो. जन्‍माचं दुःख तिच्‍या आर्ततेतून पाझरताना, रात्र दिव्‍याच्‍या पणतीतून अलगद निघून जायची. जाईबाईचा हा रात्री रडण्‍याचा आवाज आजचा नव्‍हता. आई सांगायची, माझ्या जन्‍माआधी ती नव-याच्‍या आठवणी काढून रडायची. नव-याचे नाव तुकाराम होते. त्‍याला पान लागले आणि तो मरण पावला. ग्रामीण भागात एखाद्याला साप चावला की, पान लागला म्‍हणतात. तारुण्‍यात आलेल्‍या वैधव्‍याने ती खचली. जंगलातून मोळ्या आणून दिवस ढकलणे सुरू होते. तिचा नवरा तुकाराम खूप कर्तृत्‍ववान होता, त्‍याच्‍या कथा लहानपणी ऐकत आलो होतो. येटारात हक्‍काने मदत मागावी असा तो माणूस. इतरांच्‍या वाईटकाळात त्‍याचा आश्‍वासक हात अनेकांनी अनुभवला होता. जाईबाईच्‍या भाळावर अश्‍वत्‍थामासारखी दुःखाची ओली जखम होती. मी तिच्‍या घराजवळून जाणे टाळायचो. मला तिच्‍या चेह-याकडे बघितले तरी रात्रीचे विकल सूर आठवायचे. तिच्‍या वाट्याला बाजाराच्‍या दिवशी मोळ्या विकण्‍यापलीकडे फारसं काही उरलं नव्‍हतं. पण, जगण्‍याची अपरिहार्यता तिला गवसली होती. वडीलधारी मंडळी सासरी जाणा-या मुलींना, जाईबाईचे उदाहरण द्यायचे. काही माणसं जन्‍मतः कर्णासारखी दुःखाची कवचकुंडलं घेऊन जन्‍माला येतात. ज्‍यांच्‍या भोवती काटेरी सौंदर्य असते. त्‍याग आणि समर्पणाचं दान नशिबाने ओंजळीत टाकलेलं असते.

काळ जसा पुढे सरकू लागला तसा मला अनुभवातील, वाचनातील ‘तुकाराम’ नावाच्‍या पुरुषांची अफाट व्‍याप्‍ती कळायला लागली. संत तुकोबांना जनतेचा कळवळा होता, म्‍हणून त्‍यांनी शब्‍दांचे शस्‍त्र करून कर्मकांड, धर्मांधता आणि मानवी भेदात गुरफटलेल्‍या समाजाला बाहेर काढले. दुष्‍काळाच्‍या काळात स्‍वतःची धान्‍य कोठारे रिकामी करून, समाजाला अर्पण केले. लॉकडाऊनचा अद्भुत काळ अजस्र सापासारखा पुढ्यात पसरलेला असताना, कुणालाही तुकारामासारखं सर्वस्‍व अर्पण करून दानत्‍व सिद्ध करता आले नाही. पण, तुकोबांच्‍या विचारांचे अणू-रेणू होण्‍याचे भाग्‍य अनेकांनी कमावले. माझ्या घरापासून हाकेच्‍या अंतरावर असलेली सातपुतेंची चक्‍की तब्‍बल तीन महिने गरिबांचे धान्‍य मोफत दळत राहिली. एका व्‍यक्‍तीने नावाचा गवगवा न करता एक कुटुंब सतत दोन महिने जगवले. यांच्‍या रुपात मला तुकाराम दिसला.

प्रत्‍येक काळ स्‍वतःचा विचार घेऊन जन्‍माला येतो. त्‍या त्‍या काळाची स्‍वतंत्र विचारधाराही. माणूस आणि त्‍याची जीवन मूल्‍ये कायम त्‍याच्‍या सभोताल असतात. माणूस छोटी-छोटी स्‍वप्‍ने उराशी बाळगून जगत असतो. स्‍वप्‍न आहेत म्‍हणून जीवन सुंदर आहे. काही स्‍वप्‍न अपेक्षांच्‍या पलीकडली असतात. स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी माणसांची धडपड शेवटच्‍या श्‍वासांपर्यंत कायम असते. इतरांच्‍या आयुष्‍यात रंग भरण्‍याचे सौभाग्‍य काहीच तुकारामांसारख्‍या माणसाला लाभत असते.

तुकाराम नावाच्‍या माणसाला काळाच्‍या सारीपाटानुसार सोंगट्या तपासून पट मांडावा लागतो. काळाच्‍या ओघात अनेक सनदी अधिकारी येतात आणि जातात. पण, काहींच्‍या कार्याचा ठसा समाजाच्‍या मनावर गोंदवला जातो. तुकाराम मुंढे भारतातल्‍या अनेकांना परिचित असलेले सनदी अधिकारी. नोकरीच्‍या पंधरा वर्षात चौदा बदल्‍या एखाद्या कर्तृत्‍ववान माणसाच्‍या वाट्याला याव्‍यात, हे आमच्‍या व्‍यवस्‍थेचं दुर्भाग्‍य. जे अधिकारी व्‍यवस्‍थेशी जुळवून घेतात, मुजरा करतात, पॉवर आणि सत्‍तेच्‍या चौकटीत आपलं वलय तयार करतात. त्‍यांचं नेहमी चांगभलं होते. मात्र तुकाराम मुंढेंसारख्‍या सामाजिक अधिका-याला उत्‍तम कामासाठी काटेरी पिंज-यात उभे केले जाते.

सत्‍तेपुढं शहाणपणाला किंमत नसते असे म्‍हणतात. पण, सत्‍ता चालवायलाही शहाणपण लागते, याचा विसर राजसत्‍तेला पडला आहे. समकाळ कितीही तुकारामांचे अस्तित्‍व पुसण्‍याचा किंबहुना आयुष्‍यावर फुली मारण्‍याचा प्रयत्‍न करत असला तरी समूह समाजाचा विवेक आणि विज्ञाननिष्‍ठा संपवता येत नाही. गाव, माणसं, माती बदलन्‍याच्‍या जखमा स्‍वतःपुरत्‍या मर्यादित राहत नाही. त्‍याचा कुटुंबालाही हकनाक त्रास सहन करावा लागतो. सत्‍तेचा माज, पैशाची खाज फार काळ टिकत नसते. वाडे बदलतात, वाड्यातील माणसंही... आणि शेवटी उरते स्‍मशान शांतता. चिरशांतीचे सौंदर्य उमजूनही माणसांनी व्‍यवस्‍था विरुपाच्‍या अभेद्य भिंती उभ्‍या केल्‍या आहेत. निर्व्‍याज्‍य प्रेम विसरत चाललो आहे. मानवी नात्‍यांना व्यावहारिकतेचा मुलामा कायम चढत चालला आहे. अशाही काळात अनेक तुकारामांनी आपल्‍या तत्‍त्‍वांशी तडजोड न करता समूह कल्‍याणास्‍तव देह झिजवला.

कुणासाठी गाऊ, रोज नवे गाणे
काळीज सोलणे, कुणासाठी?
जिथे आता होते, तुका रोज मुका
मंबाजी बोलका, सदोदित
जखमेची ओल, राहिली रे जीती
कळली न नीती, खपलांची

आता कुणी कुणासाठी वया गावून रडण्‍याचा काळ राहिला नाही. काळाच्‍या ओघात नदीचे पाणी आटले आणि डोळ्यांतीलही. सेलिब्रिटी येथील व्‍यवस्‍थेचे प्रमुख घटक झाले आहेत. त्‍यांच्‍या जगण्‍या-मरण्‍याचा विषय आपल्‍या रोजमर्रा जिंदगीचा भाग बनला. कुणी कुणाशी लग्‍न करावे?, हनीमूनला कुठे जावे?, आत्‍महत्‍या कुणी केली? , गर्भारपणाचे विषय सामाजिक कसे करावे? याविषयांची मीडिया चर्चा समाजाचे भले करणार आहे का?. आम्‍हासाठी मंदिर, मशीद, विहार, चर्च आणि विविध रंगाचे झेंडे महत्‍त्‍वाचे. समाजाच्‍या संवेदनेचा कळवळा कुणालाही दिसत नाही. खपलांनी आतील जखम दुरुस्‍त करावी, तर खपलाच अस्‍वस्‍थ वर्तमानात चिघळत चालल्‍या आहे. अशाही तापलेल्‍या वर्तमानात आमचा बाप शेताच्‍या धु-यावर दोन बैलांसह हिरव्‍या स्‍वप्‍नात रंगून जातो आणि आशावादी दिवसाच्‍या प्रतिक्षेत आयुष्‍य पुढे ढकलतो. तेव्‍हा, मला आजूबाजूचा काळही हिरवा हिरवा दिसायला लागतो. ज्‍याची जखम अनादी काळापासून ओली आहे. त्‍यानेच तर मातीची उब आणि ओल हृदयात भरण्‍याचे बळ दिले आहे. म्‍हणूनच, आयुष्‍याच्‍या प्रत्‍येक काळोखी अस्‍वस्‍थ थांब्‍यावर सूर्योदयाची प्रतिक्षा कायम राहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com