गाडीचे रुतले चाक...

सी. एस. पाटील
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

गाडी समुद्रकाठी रेतीत रुतली. बाहेर काढायचा प्रयत्न करू तेवढी ती आणखी रुतत होती. समुद्राला भरती होती. गाडी निम्मी पाण्यात. तेवढ्यात ते फळी घेऊन आले.

गाडी समुद्रकाठी रेतीत रुतली. बाहेर काढायचा प्रयत्न करू तेवढी ती आणखी रुतत होती. समुद्राला भरती होती. गाडी निम्मी पाण्यात. तेवढ्यात ते फळी घेऊन आले.

किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात इंजिनिअर होतो. कारखान्यात काम एवढे असे की, सुटीच्या दिवशीही कामावर जावे लागायचे. आपल्याला कुठे फिरायला जायला मिळत नाही, याची खंत वाटे. काही कार्यक्रमानिमित्त सासुरवाडीला गेलो होतो. तिथे साडू आणि मेहुणाही सहकुटुंब आले होते. बोलता बोलता गप्पात सहलीचा विषय निघाला. गोव्याला जायचे ठरले. साडूने तांदूळवाडीला मित्राचे घर गाठले. त्याची जीप ठरवली. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता नव्या कोऱ्या जीपमधून निघालो. मेहुण्याचे अडीच महिन्यांचे बाळही आमच्याबरोबर होते.

सावंतवाडीमार्गे गोव्यात पोचलो. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर भटकलो. सायंकाळी समुद्रातील जहाजावर नृत्याचा कार्यक्रम पाहिला. रात्री एका ओळखीच्या ठिकाणी मुक्काम केला. मासे भरपूर खाल्ले. प्रवासाला आलो याचा खूप आनंद झाला.
दुसऱ्या दिवशी एक जरा दूरचा किनारा गाठला. दुपारनंतर किरकोळ खरेदी करून निघायचे असे ठरले. सर्वजण आवरून सकाळी नऊ वाजता जीपमध्ये बसलो. जीप कुठे थांबवावी, याचा अंदाज घेत घेत समुद्राच्या किनाऱ्यावरून जात होतो. हवा मस्त होती. समुद्राच्या काठावर बारीक वाळू होती; पण कठीण होती. त्यामुळे जीप मजेत चालली होती. साधारणपणे दोन किलोमीटर पुढे गेल्यावर मी म्हटले, ""पुरे, चला आता परत.'' त्याप्रमाणे परत फिरत असताना माझा मेहुणा ड्रायव्हरला म्हणाला, ""जरा समुद्रातून फिरव, मंजी मजा इल.'' तो ड्रायव्हर नवीन होता. त्याला इकडचा काहीच अंदाज नव्हता. त्याने पांडू सांगतो, तशी गाडी वळवली. गाडी कशी बशी टर्न झाली अन्‌ रुतली. खाली उतरून बघतो तो काय डाव्या बाजूचे चाक वाळूत रुतलेले. आम्ही पुरुष मंडळींनी गाडी ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण गाडी पुढे जात नव्हती. उलट चाके फिरल्यामुळे वाळू बाजूला सरकत होती. आता डाव्या बाजूची दोन्ही चाके, पुढचे आणि मागचे, जास्तच रुतून बसली. कुणीतरी ड्रायव्हरला सांगितले की, गाडी बंद करू नको म्हणजे पाणी इंजिनात जाणार नाही. म्हणून ते चालूच होते. बराच प्रयत्न केला तरी काहीही होत नव्हते. गाडीतले पेट्रोल संपत आले होते. नुकतीच नवीन जीप मालकाने घेऊन दिली होती आणि त्याची ही पहिलीच खेप होती. त्यामुळे ड्रायव्हरचा चेहरा रडवेला झाला होता. समुद्राचे पाणी वाढत होते आणि आता पाणी जीपमध्ये यायला सुरवात झाली होती. भरतीची वेळ होती. साधारणपणे बारा वाजेपर्यंत अर्ध्याला अधिक जीप पाण्यामध्ये जाणार, याचा अंदाज यायला लागला होता. बरे कुणाला मदतीला बोलवावे तर आसपास कोणीही दिसत नव्हते. सगळेजण त्या ड्रायव्हरलाच दोष देत होते. तशातच लहान बाळाला, कालच्या प्रवासाने की हवा बदलल्यामुळे, ताप आला होता. सर्वजण निराश होऊन इकडे तिकडे हिंडत होते. तेवढ्यात दहा-बारा माणसे हातात हत्यारे घेऊन ओरडत पळत आमच्या दिशेने येताना दिसली. आम्हाला वाटले, बरे झाले. परमेश्‍वर पावला अन्‌ मदतीला धावला; पण तसे होणार नव्हते, ती माणसे आमच्या जवळ आली अन्‌ आम्हाला ओलांडून पुढे निघून गेली. नंतर कळाले की, त्यांचे कुठले तरी जहाज आले, त्याकरिता ते तिकडे पळाले.
मधल्या वेळात मी जीपपासून बरेच अंतर चालून आलो तर तिथे एक टपरी दिसत होती. तिथे एक दोघेजण नारळ सोलत बसले होते. त्यांना मी अडचण सांगितली. त्यांनी शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, ""ठीक आहे.'' त्यांच्या दृष्टीने बहुतेक ही नेहमीचीच समस्या असावी. ते म्हणाले, ""आम्ही तुम्हाला मदत करू; पण काय देणार बोला?''

मी म्हणालो, ""पाचशे रुपये देईन.'' ते जणू ऐकू न आल्यासारखे पुन्हा त्यांच्या कामाला लागले. मी परत त्यांना गयावया केली आणि म्हणालो, ""अहो, आम्ही लांबवरून आलो आहोत. जरा मदत करा, वाटले तुमचे तर पाय धरतो.'' अखेर पंधराशे रुपये कबूल केल्यावर ते दोघे उठले. एक फळी घेतली अन्‌ माझ्याबरोबर जीपकडे आले. तोपर्यंत जीप बरीच पाण्यात बुडाली होती; पण इंजिन चालू होते. त्या लोकांनी जीपच्या भोवती एक फेरी मारली. फळी डाव्या बाजूच्या पुढच्या चाकाखाली घातली. ड्रायव्हरला सीटवर बसायला सांगत आम्हाला सर्वांना गाडी ढकलण्यासाठी उभे केले. एक-दोन- तीन म्हटल्याबरोबर सगळ्यांनी जोर करून गाडी ढकलली. ड्रायव्हरने गाडी रेस केली, त्याबरोबर सरकत गाडीने जागा सोडली अन्‌ काठावर आली. आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. शेवटी त्या लोकांना पैसे दिले व आभार मानून जीपमध्ये बसलो. कुठेही न थांबता घर गाठले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: c s patil write article in muktapeeth