डिलीट कर ना फोटो!

चंद्रशेखर टिळक
सोमवार, 12 डिसेंबर 2016

परस्परांच्या सहवासातील क्षणांचे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथीसारखे असतात. नाकाचा शेंडा पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडणारा. नथीचा हेवा वाटतो असं मोकळेपणाने सांगत राहतात हे फोटो.

परस्परांच्या सहवासातील क्षणांचे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथीसारखे असतात. नाकाचा शेंडा पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडणारा. नथीचा हेवा वाटतो असं मोकळेपणाने सांगत राहतात हे फोटो.

ए, ऐक ना. मी एक फोटो पाठवलाय व्हॉट्‌सऍपवर. बघ आणि लगेचच डीलिट करून टाक.
बघितलास का रे? डीलिट केलास ना?
अगं, फोटो आवडला का, ते तरी निदान आधी विचारायचं?
प्लीज, सांग ना, डीलिट केलास?
खरं म्हणजे अतिशय जिवावर आलं होतं; पण केला. काय अप्रतिम फोटो आहे गं! ज्याचा आहे आणि ज्यानं काढला आहे, त्या दोघांनाही फुल मार्क्‍स.
खरंच आवडला?
अगदी मनापासून. म्हणून तर डीलिट करायचं अगदी जिवावर आलं होतं. याआधीही एक सेल्फी डीलिट करायला सांगितली होतीस.
हो. कारण ती सेल्फी फक्त तुझ्यासाठी होती. तू पाहिल्यावर आणखी कोणी पाहिलेली मला आवडलं नसतं, चाललंही नसतं.
अगं, ती सेल्फी काही व्हल्गर नव्हती.
चावटपणा नको. तसा हा फोटोही काही व्हल्गर नाहीये; आणि तसे फोटो पाठवायला आपलं वय तरी आहे का ते!
पण हा फोटो झकास. अगदी सालंकृत. छान भरजरी साडी आणि मोजकेच पण ठसठशीत दागिने.
तुला पाठवायलाच नको होता फोटो. कुठचाच.
अगं मस्करी नाही करत. पण खरंच सुंदर. मान अजून जरा इकडे केली असतीस, तर कानातले आणखी छान आले असते फोटोत.
अजून नाही का काही?
रागावणार नसशील तर सांगतो.
सांगा महाराज. आता तुमची सक्ती.
स्वतःचं कौतुक ऐकायचं असलं तर तसं मोकळेपणानं सांगावं माणसानं.
तू म्हणजे ना....
साडीला मॅचिंग लाल चंद्रकोर. मग त्या लाल चंद्रकोरीत काळा छोटा टिळा. खरं म्हणजे काळी चंद्रकोर आणि त्यात लाल कुंकवाचा ठिपका. आणि त्या चंद्रकोरीची रेषा ठसठशीत नको; पण ठळक हवी. ती रेषा जाडी नको; पण भरदार हवी. नजरेत पटकन भरेल अशी.
अजून काही प्रिस्क्रिप्शन?
चंद्रकोरीची रेषा भुवई खाली वळते तिथपासून दुसरी भुवई खाली वळते तिथपर्यंत बेससारखी हवी. दोन भुवयांच्या बरोबर मध्ये लाल कुंकवाचा ठिपका. दोन भुवयांच्या मध्ये नाकाचं वरचं टोक संपतं तिथे हा ठिपका हवा. परातीत चंद्राचं प्रतिबिंब पडावं तसा, नाहीतर करवा चौथला चाळणीत चंद्र दिसावा तसा. ही चंद्रकोर माझा पती किती प्रेमानं मला साथ देतो याचं प्रतीक. त्याच्या भावविश्वाच्या मध्यभागी मी आहे म्हणून तो लाल कुंकवाचा ठिपका. अगदी लांबूनसुद्धा लक्ष वेधून घेईल असा. आणि चंद्रकोर म्हणजे माझ्या भावविश्वाला त्याची साथ पुरवते ते कोंदण. चंद्रकोर आणि हा टिळा म्हणजे परस्पर प्रीतीचा कळस आणि ध्वज असतो गं.
सॉलिड आहे हे.
तसं नाही गं. हे संकेत समजून घेणं फार छान असतं. काय आहे ना, आपण एकमेकांवर प्रेम करतो हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं असतंच; पण ते कसं करतो, कशासाठी करतो, हे नाजूकपणे सूचित करता येणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
आपल्या पिढीची प्रेमाची तऱ्हा जरा भिडस्तच आहे नं! परत नाही म्हणणार उगीच पाठवले फोटो म्हणून.
ती चंद्रकोर, तो ठिपका, तो नाकाच्या शेंड्यावर बसलेला लटका राग हे वैवाहिक आयुष्याचे फार छान फोटो आहेत. सहवासाच्या कॅमेऱ्यानं काढलेले. फक्त एकमेकांनाच दिसणारे.
क्‍या बात हैं?
अजून एक सांगू?
विचारू नकोस, सांगत राहा.
असे फोटो हे नृत्यांगनेच्या घुंगरासारखे असतात. ते घालताना आणि काढताना घुंगरू आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील, की तू आहेस म्हणून मी आहे. प्रेम असतं म्हणून असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असतं म्हणून तर रूकार असतो ना गं!
तुला फोटो डीलिट करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचं साठवून ठेवीन.
आणखी एक. या फोटोच्या रंगीत प्रती काढल्या जातीलच; पण या फोटोची निदान एक तरी कृष्णधवल प्रत काढ. रंगीत फोटोत सौंदर्याचं सौष्ठव आलं तरी भावनेचं मार्दव येत नाही, त्यासाठी कृष्ण- धवलच फोटो हवा.
आय सी! आता लक्षात येतंय. सोनचाफ्याचा, बकुळीचा सुवास आवडता असूनही तू प्राजक्त आणि मोगरा निवडायचास. मी एकदा तुला वेड्यासारखं म्हटलं होतं, की प्राजक्ताच्या ओलसर फुलांचा डाग पडतो.
ओल्या प्राजक्ताचा डाग नाही पडत. भावविभोर मनानं त्या क्षणांचा, त्या सहवासाचा तो काढलेला फोटो असतो. प्राजक्ताचा देठ म्हणून लाल असतो. हिरवा रंग असोशीचा, लाल संतृप्तीचा. ज्या व्यक्तीच्या सहवासानं आपण तृप्त होतो, त्याच्या आठवणीनं गालावर, मनावर लाली येते. त्या स्मरणीचा फोटो म्हणजे तो प्राजक्त. दिवसाची खरी यथार्थता तिन्हीसांजेलाच कळते. आकाशात मावळतीचे रंग पखरलेले असतानाच मनाच्या कॅमेऱ्यात गवसलेल्या आणि निसटलेल्या क्षणांची सरमिसळ सुरू असते. म्हणून तर त्याला कातरवेळ म्हणतात.
हा फोटो नाही विसरू शकणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrashekhar Tilak's Muktapeeth Article