काळानुसार बदललेला हिंदी सिनेमातला खलनायक

villain
villain

खलनायक हा सावकारी प्रवृत्तीचा होता. कारण स्वातंत्र्यानंतर सावकार गावोगावी होते आणि सावकारीतून गरजूंना लुबाडणे सुरू होते. गावागावांत सावकारांची आर्थिक सत्ता होती. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज हेही एक खलनायक होते. पण, त्यांच्याविरुद्ध उघडपणे फार क्वचित चित्रपटांत कणखर भूमिका दिसली. स्वातंत्र्यानंतर चित्रपट प्रेमप्रकरणात अडकले. म्हणजे कथा त्याभोवती होत्या. त्या काळात प्रेमविवाह मोठी घाडसाची गोष्ट होती आणि प्रेमकथेत व्हिलन हा सावकारच जास्त असायचा. नंतर हळूहळू खलनायकाचा चेहरा बदलू लागला. मग खलनायक एखाद्या मोठ्या कारखान्याचा मालक झाला. कामगारांवर अत्याचार करणारा खलनायक होता तेव्हा रशियाच्या जास्त जवळ होतो. तिथे कम्युनिझम हा प्रकार होता. त्यात मालक कामगार संघर्ष होता. आपण त्यांचा साम्यवाद काही अंशी स्वीकारला. साम्यवादाला लोकशाहीत मिसळवले.
फॅक्‍टरी मालकरूपी खलनायकाचे चार अजून साथीदार चित्रपटांत दिसले. एक राजकीय पुढारी किंवा मंत्री कारण परमिट राज मध्ये कारखाना उभा करायचा, तर मंत्री वा राजकीय नेता सोबत लागायचा. दुसरा होता सरकारी बाबू ज्याच्या हातात बऱ्यापैकी सत्ता असायची. मंत्री आणि मालकरूपी खलनायक यांची सरकार दरबारी काम करणारा एक हवा म्हणून हा दुसरा साथीदार. तिसरा असायचा पोलिसवाला. कारण फॅक्‍टरी चालवायची, पैसा कमवायचा तर बऱ्यांच भानगडी कराव्या लागतात. मग, ते सगळे निस्तरायला पोलिसवाला सोबत ठेवायची गरज होती. भ्रष्टाचारानेही यात उडी घेतली. चौथा माणूस असायचा तो म्हणजे मुख्य खलनायकाचा उजवा हात ज्याला आपण Right hand म्हणतो. तो या वरच्या तिघांना सांभाळायचा आणि पडेल ते काम करायचा. अशी ही साम, दाम, दंड, भेदवाली चांडाळ चौकडी असायची मुख्य खलनायकासोबत. अशाप्रकारे व्हिलन बदलला. सावकार खलनायक फॅक्‍टरीचा मालक बनला आणि त्याच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणारा नायकपण निर्माण झाला. आपण नायकाचा बदलला चेहरा पुढच्या भागामध्ये बघूया. सध्या खलनायकाचा प्रवास बघूया.
या खलनायकाला खूप चांगल्या कलाकारांनी अभिनयाने मोठे केले. प्राणनंतर प्रेम चोपडा, प्रेमनाथ, जीवनअजित, डॅनी, मदन पुरी, अमरीश पुरी, रजा मुराद, कादरखान, अनुपम खेर, सदाशिव अमरापूरकर, परेश रावल अशी बरीच मोठी यादी आहे. या कसलेल्या कलाकारांनी खलनायक रंगवून स्वत:ची इमेज, स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग निर्माण केला. आजही त्यांचे चाहते त्यांना बघायला गर्दी करतात. भलेही ते खलनायक रंगवत असले तरीही.
असा खलनायकाचा चेहरा साधारण 1990 पर्यंत होता. नंतर भारताने उदार आर्थिक धोरणांचा अवलंब केला जगभरातल्या भांडवलदारांसाठी भारताचे दरवाजे खुले झाले. भारताची आर्थिक गणित बदलले तसा समाजातही बदल झाला. आधीच्या खलनायकाची जागा राजकारणी, पुढारी, मंत्री यांनी घेतली. भ्रष्ट मंत्री हा खलनायकाचा मुख्य चेहरा झाला. फॅक्‍टरी मालक हा त्या मंत्र्याच्या हाताखाली आला. बाकीचे दोघे जिथे होते तिथेच अजूनही आहेत. याचे कारण आपल्या देशातली लोकशाहीचा उत्सव असणारी दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक व त्यासाठी लागणारा मतदार... निवडणूक कशीही करून जिंकायची, हे राजकारणातले मुख्य अस्त्र झाले. आणि त्यासाठी मग साम, दाम, दंड, भेद आलेच. आता प्रत्येकाच्या हातात पैसा आला होता. भ्रष्टाचार तर आपल्या समाजाचा सहजभाव झाला होता. प्रत्येकाला पटकन श्रीमंत व्हायचे आहे आणि मग त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी प्रत्येकाची आहे. मग अशावेळी राजकीय खलनायक या संधीचा वापर करून स्वत:चे साम्राज्य उभे करतो आणि आपण त्याला देव समजतो.
या रचनेत आजही प्रत्येक क्षेत्रात दबावगट आहेत. कुठलाच समाज यातून सुटला नाही. हॉलीवूड चित्रपटात असा खलनायक कधी दिसणार नाही. त्यांच्या चित्रपटातील खलनायक राजकारणी फारच कमी दिसतील. याला कारण तेच जसा समाज तसा चित्रपट. आपल्या इथे राजकारणी हाच खलनायक म्हणून रंगवला जातो. पण, अलीकडे चित्रपटाची एकूणच व्याख्या बदलली आहे. 1991 नंतर चित्रपटाचा अजून एक व्हिलन दिसू लागला तो म्हणजे बिल्डर. जो छोट्या झोपड्या पाडून मोठ्या इमारती उभारतो. भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाला आणि काळा पैसा या लोकांच्या हाती खेळू लागला. या काळ्या पैशाने सत्ता आणि सत्तेतून काळा पैसा असे चक्र सुरू झाले. मग चित्रपटाचा व्हिलन बदलला. मधल्या काळात जे. पी.च्या आंदोलनातून समाजवादाचा उगम झाला म्हणता येईल; पण त्यातूनही आज खलनायक तयार झाला आहे.
त्या आंदोलनाने काही प्रमुख चेहरे आज भ्रष्टाचारामुळे एवढे श्रीमंत झाले की, समाजवाद सध्या व्हेंटिलेटरवर गेलाय. मग एक शहरी खलनायक आणि ग्रामीण खलनायक असा एक वेगळा प्रवास सुरू झाला. ज्याला आपण दबंग किंवा बाहुबली राजकारणी मानतो तो खलनायक पिस्तुलवाला तर ग्रामीण खलनायक देशी कट्टावाला झाला. समाजात डान्सबार प्रवृत्ती वाढू लागली आणि खलनायक डान्सबारमध्ये दिसू लागले. असा हा खलनायकाचा प्रवास अजून थांबला नाही; पण काही प्रमाणात बदलला आहे. या मधल्या काळात चंबळ, डाकू, तस्करीवाले खलनायकपण झाले. डाकू खलनायक अजरामर केला अमजद खान यांनी. गब्बरसिंग हा एक मैलाचा दगड ठरला. त्यांच्या खलनायकी जीवनात अत्याचार एका गावावर असायचा... त्याची दहशत असायची. खलनायकाला स्वतःचे साम्राज्यच उभे करायचे आहे तेही राजकीय वरदहस्ताने. म्हणून समाज जसा असतो तसा खलनायक असतो. आपल्या समाजात राजकीय दबंगपणा जास्त असल्यामुळे चित्रपटाची कथा अशाच खलनायकाभोवती फिरते. त्यामुळे आपले चित्रपट एकाच पठडीतले वाटतात.
येथील चित्रपट ऑस्करसाठी निवडले जात नाहीत याचे हे प्रमुख कारण आहे. आपण जोपर्यंत राजकीय सुधारणा घडवून चांगली चित्रपट कथा निर्माण करत नाही तोपर्यंत ऑस्कर हे एक स्वप्नच राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com