ब्रॅडमन आणि मी

कर्नल वाय. जे. बळीद
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेलो आणि ध्यानीमनी नसता ब्रॅडमन भेटले. त्यांची भेट केवळ अविस्मरणीय.

प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेलो आणि ध्यानीमनी नसता ब्रॅडमन भेटले. त्यांची भेट केवळ अविस्मरणीय.

मी कोलकोता येथे सामाजिक संस्थेत कार्यरत होतो. संस्थेच्या विशेष अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे जाण्याकरिता माझी निवड झाली. त्यासाठी मेलबर्न येथे चार महिन्यांचे वास्तव्य होते. या काळात आम्ही ऑस्ट्रेलियातील बऱ्याच शहरांना भेटी दिल्या. या चार महिन्यांत ऑस्ट्रेलियन लोकांच्या उदारतेचे दर्शन घडले. पूर्वी महाराष्ट्रात कार्य केलेले एक जोडपे ऍडलेड येथे राहात होते. त्यांनी मला ऍडलेड येथे त्यांच्या घरी बोलावून आठवडाभर पाहुणचार केला. सर डॉन ब्रॅडमन यांचेही घर याच शहरात आहे. आठवड्यातून एकदा ऍडलेडच्या क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेटसंबंधी मेळावा भरत असे. मी त्या आठवड्यात ऍडलेडला असल्याने त्या मेळाव्याला हजर राहण्यासाठी संयोजकांनी मलाही आमंत्रित केले. त्या दिवशी ऑस्ट्रेलियातील सारे आजी-माजी क्रिकेटपटू मेळाव्याला हजर होते. क्रिकेट हा ऑस्ट्रेलियाचा आत्मा आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सर डॉन ब्रॅडमन होते.
संयोजकांनी सर डॉन ब्रॅडमन यांना दोन शब्द बोलण्याची विनंती केली. ते उभे राहिले, सर्वांच्या उपस्थितीबद्दल त्यांनी आभार मानले. क्रिकेटसंबंधी थोडे मार्गदर्शन केले. त्यानंतर म्हणाले, ""या मेळाव्यात भारतातून आलेले एक पाहुणे आहेत.'' पुढे माझे नाव घेऊन म्हणाले, ""हे भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांचे प्रतिनिधी म्हणून येथे या मेळाव्याला उपस्थित आहेत. ऍडलेड तुमचे स्वागत करीत आहे.'' सर्वांनी टाळ्या वाजविल्या. त्यांनी मला जवळ बोलावून माझ्याशी हस्तांदोलन केले. जगविख्यात क्रिकेटपटू ब्रॅडमन यांनी लक्षात ठेवून माझा जाहीर उल्लेख करावा! मला तर त्यांचे शब्द ऐकून आकाश ठेंगणे वाटू लागले. अनपेक्षित केलेल्या स्वागताने मी भारावून गेलो. माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा प्रसंग होता. त्याचे मला शेवटपर्यंत विस्मरण होणारच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crol y j balid write article in muktapeeth