ट्रायल्स ऍट बालासोर

दि. र. कोल्हटकर
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

बालासोरचा समुद्र ओहोटीच्या वेळी तीस-चाळीस किलोमीटर आत सरकतो आणि दारूगोळ्याच्या चाचण्या घेण्यासाठी मोठी रेंज उपलब्घ होते. ब्रिटिशांनी शोधलेली ही रेंज गेली शंभर वर्षे वापरात आहे.

बालासोरचा समुद्र ओहोटीच्या वेळी तीस-चाळीस किलोमीटर आत सरकतो आणि दारूगोळ्याच्या चाचण्या घेण्यासाठी मोठी रेंज उपलब्घ होते. ब्रिटिशांनी शोधलेली ही रेंज गेली शंभर वर्षे वापरात आहे.

आम्ही तिघे बालासोरला निघालो होतो. चाळीस मिलिमीटर विमानविरोधी गनच्या दारूगोळ्याची चाचणी घेण्यासाठी आम्ही चाललो होतो. त्या काळी कोणार्क एक्‍स्प्रेस ही गाडी रात्री अकरा वाजता मुंबईहून निघे आणि रात्री दोनच्या सुमारास पुण्यात पोचत असे. पुण्यातून तिला "पूना' बोगी लागे. आम्ही रात्री बारा वाजताच पुणे स्टेशनवर पोचलो. पुणे बोगी शोधून काढली व आपापल्या जागेवर पहुडलो. दिवसभराच्या कामामुळे आम्हा तिघांना गाढ झोप लागली. सकाळी सातच्या सुमारास मला जाग आली. खिडकीतून बाहेर पाहिले तर पुणे स्थानकाची पाटी दिसली. मी दचकलो. बाकी दोघांना उठवले. आमचा डबा पुण्यातच होता. म्हणजे रात्री चुकून आम्ही भलत्याच डब्यात बसलो की काय? चौकशी केली, तर मुंबईहून सुटणारी कोणार्क गाडी सहा तास उशिराने येत होती. ती पुण्यात आठच्या सुमारास आली. तिला आमची पूना बोगी जोडली गेली व आमचा प्रवास सुरू झाला.

या प्रकल्पात आम्ही तिघे जवळ जवळ तीन-चार महिने काम करीत होतो. इटली, फ्रान्स व जर्मनी या तीन देशांतून प्राक्‍झीमिरी फ्यूज बसविलेल्या गोळ्यांचे प्रत्येकी शंभर नग परीक्षणासाठी पाठविलेले होते. त्यातून परीक्षण व फायरिंग ट्रायल्स करून योग्य त्या दारूगोळ्याची निवड करण्याची कामगिरी आम्हा तिघांवर होती. प्राक्‍झीमिरी फ्यूजचे वैशिष्ट्य असे होते, की गोळी विमानाला न लागता तीन-चार मीटर अंतरावरून गेली तरी ती लक्ष्य ओळखून फुटत असे. या दारूगोळ्यावर हॉट व कोल्ड कंडिशनिंग, व्हायब्रेशन, शॉक व बंप टेस्ट एआरडीईच्या पर्यावर्णिक मूल्यांकन कक्षाद्वारे घेण्यात आल्या होत्या. हा दारूगोळा हाताळताना, दळणवळणात किंवा साठा केलेला असताना सुरक्षित आहे का नाही, याची खातरजमा या तपासणीत करण्यात आली होती.

तिन्ही देशाचे प्रतिनिधी विमानाने कोलकत्ता मार्गे बालासोरला पोचले होते.
या चाचण्या बालासोरलाच का? ओडिसामध्ये भुवनेश्वरपासून शंभर-सव्वाशे किलोमीटरवर समुद्रकिनारी ही फायरिंग रेंज आहे. अर्थातच ब्रिटिशांनी शोधून काढलेली. गेली शंभर वर्षे ही रेंज कार्यरत आहे. या समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत उथळ असा समुद्रकिनारा आहे. तिथे ओहोटीच्या वेळी समुद्र जवळपास तीस-चाळीस किलोमीटर आत जातो. त्यामुळे रिकव्हरी प्रकारच्या फायरिंगसाठी हे योग्य ठिकाण आहे. एवढी मोठी रेंज उघड्या मैदानावर कुठून मिळणार?

या दारूगोळ्याचे "क्‍लासिफिकेशन नंबरिंग' मी केलेले असल्यामुळे मला नकळत महत्त्व प्राप्त झाले होते. दुपारी हाय अल्टिट्यूड फायरिंगसाठी चाळी मीटर उंचीवर दोरीच्या साह्याने एक डोम बांधण्यात आला होता. त्यावर गनचा नेम धरला. त्या डोमपासून गोळी तीन-चार मीटर अंतराने निघून जाईल, अशी व्यवस्था केली आणि पहिली गोळी झाडली. अन्‌ नको तेव्हा नेम अचूक लागला. पहिलीच गोळी त्या डोमवर आदळली अन्‌ दोऱ्या तुटून तो डोम खाली आला. पहिल्या गोळीलाच चाचणी थांबली. आता पुन्हा डोम बांधायला किमान तीन-चार दिवस लागणार होते. साहजिकच ही चाचणी नंतर घ्यायचे ठरवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता लो-अल्टिट्यूड फायरिंगसाठी जमण्याचे ठरविले.

दुसऱ्या दिवशी दारूगोळा आणण्यासाठी बालासोरच्या कर्मचाऱ्यांबरोबर मीसुद्धा होतो. दारूगोळा ठेवला होता त्या ठिकाणी गेलो, तर कोणत्या चाचणीसाठी कोणता दारूगोळा लागणार, तो ओळखायचा कसा याबाबत त्यांचे आपापसांत उडिया भाषेत बोलणे सुरू झाले. मला थोडेसे ते कळले. मग मी त्यांना सर्व पॅकिंग डिटेल्स व कोणत्या फायरिंगसाठी कोणता दारूगोळा याच्या सीरियल नंबरची यादी त्यांच्या हातात ठेवली. मग मंडळी वेगाने कामाला लागली. पुढे डोम पुन्हा बांधून झाल्यावर उर्वरित चाचण्याही पार पडल्या.

चाचण्यांच्या दरम्यान आम्हाला लांगूलचालनाचेही प्रयत्न झाले. डॉलरच्या नोटा दाखविण्यात आल्या. आम्ही या प्रकाराची माहिती वरिष्ठांच्या कानावर घातल्यावर तिथल्या लोकांनी त्यांना तंबी दिली व सांगितले, की वुई आर ऑल सायंटिस्ट हिअर, व्हाटेवर रिझल्ट्‌स आर देअर दे विल बी फॉरवर्डेड टू दिल्ली. सो डोन्ट ट्राय टू प्रेशराईज अस. इट विल ऍडव्हर्सली इफेक्‍ट ऑन यू.'' मग हे प्रकार बंद झाले. त्यामुळे पुढे आठ दिवस फायरिंग ट्रायल घेताना विनोद झाले, गमतीजमती झाल्या, पण कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे योग्य त्या देशाच्या योग्य दारूगोळ्याची शिफारस आम्ही करू शकलो. त्या वेळच्या आमच्या शिफारशीने "त्या' देशाला दहा हजार गोळ्यांची "ऑर्डर' देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: d r kolhatkar write article in muktapeeth