तूच हवी आई!

दत्ता श्री. टोळ
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

गणपतीच्या मातृत्वप्रेमाच्या गोष्टी मागोमाग मला आठवले ते माझ्या नातवाचे आईवेडेपण.

गणपतीच्या मातृत्वप्रेमाच्या गोष्टी मागोमाग मला आठवले ते माझ्या नातवाचे आईवेडेपण.

गणपती हे पार्वतीचे गुणी बाळ. आज्ञाधारी. पार्वतीसाठी काहीही करू धजावणारे. म्हणूनच ते सर्वांना प्रिय असावे. मांगल्याची देवता वाटत असावे. गणपतीचा हा गुण आठवताना मला काही वर्षांपूर्वीची माझ्या नातवाची मातृत्वप्रेमाची गोष्ट आठवली. ती सांगतो -
आमचं शेंडेफळ श्रीविद्या सेठ व तिचा किशोरवयीन मुलगा नीहार यांच्या जीवनात घडलेली सत्यकथा. नीहार आईवेडा पोर आहे हे आवर्जून नमूद करतो. वटपौर्णिमेचा दिवस. श्रीविद्या जरीचे नऊवारी साडी, नाकात नथ, अंगावर दागिने अशी गौर सजवावी अशा वेषात वडाची पूजा करायला निघाली. शाळेचा वर्धापन दिवस असल्याने नीहारला सुटी होती. तोदेखील आईबरोबर निघाला. त्याच्या आईने वडाची पूजा केली अन तबकातील दोराचे बंडल काढले. वडाला फेऱ्या मारत ती वडाला धाग्यानें गुंडाळू लागली. जरुर तेवढे फेरे झाले. ती तबक हाती घेणार तोच नीहारने विचारले, 'आई, वडाला दोरा का गुंडाळायचा?'' श्रीविद्याने नीहारला वटसावित्रीची कहाणी सांगितली. नंतर मी त्याला त्यामागील विज्ञान कहाणी सांगितली.

नीहारने प्रश्‍न केला, 'वडाला मनोभावे सांगितले तर तो ऐकतो? आपली इच्छा पुरी करतो ना!''
'हो'' श्रीविद्याने उत्तर दिले.
'म्हणजे माझे बाबा तुझा पुढच्या जन्मातही नवरा होणार, हो की नाही? तर मग मला ते धाग्याचे बंडल दे. मी देखील फेरे घालतो वडाला.''
'तुला कशाला ते दोऱ्याचे बंडल? हा बायकांचा सण आहे.''
'तू दे तर खरे. मीही माझी इच्छा वडाला सांगतो.'' 'काय?'' 'सात जन्म तूच माझी आई व्हावीस, असे मागणे मागेन.''
श्रीविद्यानं त्याला घट्ट कवेत घेत म्हटले, 'गुणी माझे बाळ.'' बालात अपि सुभाषतम्‌ न्यायाने नीहारचे बोलणे सुभाषित नसले तरी काळजाला हात घालणारे होते. आता तो मोठा झाला, तरी त्याचे आईवेडेपण अजूनही आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: datta tol write article in muktapeeth