शाश्‍वत आनंद

दत्ता टोळ
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

थंडी-तापाचे कौतुक करीत घरात बसण्याऐवजी मी नाटिका पाहायला गेलो अन्‌ आनंदात परतलो.

थंडी-तापाचे कौतुक करीत घरात बसण्याऐवजी मी नाटिका पाहायला गेलो अन्‌ आनंदात परतलो.

काही वर्षांपूर्वीची हकीकत. माझी नात, मोठ्या मुलीची मुलगी दहा-बारा वर्षांची असतानाची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. औंधला राहणाऱ्या ऋचाच्या सोसायटीने रंजन कार्यक्रमात "वयम्‌ मोठम्‌ खोटम्‌' हे बालनाट्य सादर करण्याचे ठरवले. नाटकाबद्दल थोडे सांगणे औचित्यपूर्ण होईल. पु. ल. देशपांडे मुंबईला पार्ल्यात राहत होते तेव्हाची ही गोष्ट. परिसरातील मुलांनी बालनाट्य करावे, असे ठरवले. बालचमू पु.लं.कडे गेले. बालनाट्य मागितले. पु. ल. म्हणाले, ""मी मुलांसाठी नाटक लिहिले नाही.'' ""मग तुम्ही कसले नाटककार?'' म्हणत बालगोपाळ निघाले. मुलांचे ते उद्‌गार पु. ल. देशपांडे यांनी मनावर घेतले आणि त्यांनी "वयम्‌ मोठम्‌ खोटम्‌' हे बालनाट्य लिहिले. मुलांनी सत्याग्रह, उपोषण केले तरी खाऊ म्हटला, की त्यांचे सर्व निश्‍चय विरघळतात, हे सांगणारे बालनाट्य कुठल्याही भाषेत, काळात सादर करावे असे आहे.
तर, ऋचा नाटकात सावंतकाकांची म्हणजे प्रौढ माणसाची भूमिका करणार होती. त्या दिवशी मी तापाने फणफणलो होतो. थंडी भरून आली होती. ऋचाचा आग्रह, "आबा, तुम्ही नाटक पाहायला याच'. मांडवासमोर मंच उभारला होता. म्हणजे माझ्यासाठी ते "ओपन थिएटर'. नकार द्यावा तर त्या चिमुरडीचा हिरमोड होणार होता. "टू बी ऑर नॉट टू बी' विचार करण्याची गरज नव्हती. मी होकार दिला. रात्री नऊ वाजता अंगात स्वेटर, ओव्हरकोट, डोक्‍याला थंडी वाजू नये म्हणून कानटोपी अशा पुऱ्या बंदोबस्तात गेलो, तरी अंग कुडकुडत होते. ताप वाढत होता.

ऋचाने "एंट्री' घेतली. शिवलेले धोतर, कोट, काळी टोपी, रंगवलेल्या काळ्या मिशा - ती प्रौढ वाटत होती. संपूर्ण नाटकभर तिची भिरभिरती नजर प्रेक्षकांत मला पाहत होती. नाटक छानच झाले.

मी ऋचाला नकार देऊन घरी शाल पांघरून बसलो असतो तर...? स्वतःच्या आनंदाचा त्याग करून मी तिचे प्रेम मिळवले. शाश्‍वत आनंद त्यातच आहे हेच खरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: datta tol write article in muktapeeth