इमिग्रेशन

deepa jawlekar's muktapeeth article
deepa jawlekar's muktapeeth article

तिकडे अमेरिकेत असूनसुद्धा मला मात्र भारताचं आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडत होतं, कारण या मंडळींची आपल्या संस्कृतीशी जोडलेली नाळ अजून तुटली नव्हती. हजारो मैल दूर मी भारताला सोडून आले खरी, पण इथे अमेरिकेत मात्र "तो' माझं बोट धरून माझ्या अवतीभवती फिरत होता.

मी इमिग्रेशनसाठी उभी राहिले. "Any food items'? इमिग्रेशन ऑफिसरने जरब असलेल्या स्वरात विचारले. त्याचे घारे, बिलंदर डोळे आमच्यावर रोखले होते. खरं तर एक आख्खी बॅगच थेपले, बाकरवड्या आणि इतर फराळाने भरलेली असल्यामुळे भेदरलेल्या नजरेने मी यांच्याकडे पाहिले. "just some snacks!' यांनी उत्तर दिले. यांच्या न घाबरता चाणाक्षपणे दिलेल्या उत्तरामुळे की काय, पण त्या ऑफिसरचे समाधान झाल्यासारखे वाटते. "Enjoy your Holyday' असे म्हणून त्याने पासपोर्टवर शिक्का मारला आणि माझा जीव भांड्यात पडला. मला न सुचलेले उत्तर यांनी दिल्यामुळे यांच्या हुशारीचे कौतुक करतच मी बॅगेज क्‍लेमकरिता चालू लागले आणि डोळ्यासमोर आठवणींचा पट नाचू लागला.

अमेरिकेचा व्हिसा मिळणे हे तसे बेभरवशाचे काम, त्यातून त्यांचे सिक्‍युरिटीबाबतचे जाचक नियम आणि अमेरिकेला जाण्यासाठी करावा लागणारा प्रदीर्घ आणि कंटाळवाणा विमानप्रवास, यामुळे सगळे जग फिरू, पण अमेरिकेच्या वाट्याला जायचे नाही, असेच आम्ही ठरविले होतं. पण मुलगी कॅनडाला शिकायला गेल्यामुळे कॅनडाबरोबरच अमेरिकेचाही व्हिसा काढायचा असे ठरले. नशिबाने दोन्ही व्हिसा मिलाले आणि यावर्षी ईस्ट अमेरिकेची टूर करताना बोस्टनला नणंदेकडे म्हणजेच कांचनआक्काकडेही जाण्याचे ठरविले.

आमचे दाजी डॉ. पाटील आम्हाला न्यायला एअरपोर्टवर आले होते. अर्ध्या पाऊण तासातच आम्ही त्यांच्या "साउथ बरो'मधील निवासस्थानी पोचलो. आत जाऊन पाहिले तर किचनमध्ये आक्का ताकडी रोरयाने चकल्या करण्यात मग्न होत्या, तेव्हा मी म्हटले, "आता कुणी लाकडी सोरया वापरत नाही आक्का, मी येताना स्टीलचा सोरया आणला असता ना !' तर आक्‍का म्हणाल्या, "अगं हा सोरया माझ्या लग्नामधला आहे, जवळजवळ अडतीस वर्षांपूर्वीचा, माहेरची आठवण, असे म्हणून त्या सोरयाकडे प्रेमाने पाहू लागल्या आणि मी मात्र आचंबित नजरेने त्या दोघांकडे पहात राहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिले तर दाजी ई-सकाळ वाचत होते. "रोज आपल्याकडची बातमी आधी वाचतो, मग इकडची !' असे म्हणून ते देवघराकडे वळले. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्‍नचिन्ह पाहून हसत म्हणाले, "कामाच्या व्यापामुळे रोज देवपूजा करणे मला जमत नाही, पण सुटीच्या दिवशी मात्र देवपूजा आवर्जून करतो !' मला एक एक धक्के बसत होते. कॅन्सरवरील औषधांवर रिसर्च करणारा अमेरिकेतील एक सायंटिस्ट देवासमोर हात जोडून उभा होता.

संध्याकाळी गप्पा मारता मारता दाजींच्या तोंडी तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ऐकल्या आणि विज्ञान व अध्यात्म एकत्र नांदू शकतं याची खात्री पटली.
दुसऱ्या दिवशी भाचीने आणि जावयाने म्हणजेच गौरी आणि योगेशने आम्हाला जेवायला बोलाविले होते. अमेरिकेतच जन्मलेली आणि वाढलेली ही नवीन पिढी, पुन्हा एकदा माझ्या मनात उत्सुकता आणि कुतूहल दाटून आले. त्यांच्या घरी गेल्या गेल्या गौरीने अमेरिकन ऍकसेंटमधील मराठीमध्ये बोलायला चालू केले. दोघांनी त्यांचे नवीन घर मोठ्या आत्मियतेने दाखविले. घर बघता बघता छोट्याशा देवघरातल्या गणपतीकडे माझी नजर गेली आणि आपली संस्कृती अमेरिकन मातीमध्ये छान रुजल्याचे जाणवले.

बोस्टनहून निघताना यांचा आतेभाऊ चेतन याचा पिटसबर्गवरून फोन आला. तोसुद्धा तिकडे येण्याबद्दल आग्रह करू लागला, पण वेळेअभावी ते शक्‍य नव्हते, म्हणून त्याच्याशी फोनवरच बोललो. पिटसबर्गमधील महाराष्ट्र मंडळामध्ये साजऱ्या होणाऱ्या सण, उत्सवांबद्दल चेतन उत्साहाने बोलला. यावर्षी गणेशोत्सवामध्ये असलेली कांजीवरम साड्यांची थीम आणि तो मंडळाचा अध्यक्ष असताना त्याने पुण्याहून मागवलेल्या नऊवारी साड्या, फेटे आणि बाराबंदी याबद्दलही त्याने आवर्जून सांगितले.

तिकडे अमेरिकेत असूनसुद्धा मला मात्र भारताचं आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडत होतं, कारण या मंडळींची आपल्या संस्कृतीशी जोडलेली नाळ अजून तुटली नव्हती.

आयुष्याची संध्याकाळ माझ्या मातीमध्ये जगायची असे ठरवून आज अडतीस वर्षांनंतरही समृद्ध अमेरिकेचे नागरिकत्व न स्वीकारणारे आमचे दाजी, लाकडी सोरयामध्ये माहेर शोधणाऱ्या आक्का, तिथल्या नव्या पिढीच्या मनातदेखील सजलेला कौटुंबिक जिव्हाळा आणि पिटसबर्गमध्ये दर रविवारी भरणाऱ्या मराठी शाळेत आवर्जून मुलाला पाठविणारा चेतन खरोखरच ही सर्व मंडळी मला "भारत कधी कधी माझा देश आहे' अशा तऱ्हेने वागणाऱ्या आमच्यासारख्या लोकांपेक्षाही अस्सल भारतीय वाटली.
हजारो मैल दूर मी भारताला सोडून आले खरी, पण इथे अमेरिकेत मात्र "तो' माझं बोट धरून माझ्या अवतीभवती फिरत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com