तीस पैसे अन्‌ जाधव

दिलीप बर्वे
बुधवार, 3 एप्रिल 2019

मी पैसे आणून देईन म्हणून एकाने विश्‍वास ठेवला. तर दुसऱ्याने बोलावून आणून बाकी रक्कम दिली.

मी पैसे आणून देईन म्हणून एकाने विश्‍वास ठेवला. तर दुसऱ्याने बोलावून आणून बाकी रक्कम दिली.

पिंपरीतील एका ऑटोमोबाईल कंपनीत होतो. अनेक सुट्या भागांची निर्मिती ठाणे, मुंबईतील छोट्या मोठ्या वर्कशॉप्सकडून होत होती. या सगळ्यात सुसूत्रतता आणण्यासाठी आणि सुट्या भागाची तपासणी करण्यासाठी कंपनीने मला काही महिन्यांकरिता पाठवले होते. दर शनिवारी दुपारी मुंबईहून निघून पुण्याला येत असे. एका शनिवारी भांडूपमधल्या कंपनीतले काम आटोपून बेस्ट बस पकडली. दुपारी बाराची वेळ. भांडूप-घाटकोपरचे तिकीट तीस पैसे होते. कंडक्‍टरने तिकीट दिले. मी पाच रुपयाची नोट पुढे केली. कंडक्‍टर म्हणाले, ""साहेब, सुटे पैसे द्या.'' घाटकोपर जवळ आले. शेवटी मी म्हटले, ""गाडी घाटकोपर डेपोची आहे ना. तुम्ही परत जायच्या आत मी जवळच्या हॉटेलमधून सुटे करून आपले तीस पैसे देतो. आपले आडनाव काय?'' ""जाधव,'' त्यांनी सांगितले.

जवळच्या हॉटेलात गेलो. थोडे खाल्ले. सुटे पैसे मिळवले. पळतच बेस्टच्या केबिनपाशी पोचलो. ""स्टार्टरसाहेब, मुलुंडची बस गेली का? मला कंडक्‍टर जाधवांना तीस पैसे द्यायचे होते.'' ""जाधव नुकतेच गाडी घेऊन गेले. म्हणाले, एक तरुण मुलगा तिकिटाचे तीस पैसे आणून देईल.'' मी त्यांच्याकडे तीस पैसे दिले. ""जाधवांना आणि तुम्हालाही थॅक्‍स.'' ते म्हणाले, ""तुम्ही आठवणीने तिकिटाचे पैसे आणून दिलेत याबद्दल तुमचेच आभार मानले पाहिजेत.'' दादरला जाऊन गाडी पकडली. पुण्यात उतरल्यावर रिक्षा केली. वाड्यासमोर रिक्षा थांबवली. मीटरने सत्तर पैसे झाले होते. एक रुपयाची नोट ऐटीत दिली आणि घरी आलो. सामान ठेवत असतानाच वाड्यातील दोन-तीन छोटी मुले हाका मारत आली, ""काका, रिक्षावाला तुम्हाला बोलावतोय.'' रिक्षावाले पन्नाशीचे होते. म्हणाले, ""साहेब तुमचे तीस पैसे द्यायचे राहिले. मीटरने सत्तर पैसेच झालेत. मी सुटे पैसे काढेपर्यंत तुम्ही वाड्यात शिरलात.'' मी म्हटले, ""दादा, असू दे.'' ""नाही साहेब, हे घ्या तुम्ही तीस पैसे.' मी नाइलाजाने हात पुढे केला. विचारले, ""दादा, तुमचे नाव काय?'' समोरून उत्तर आले, "जाधव.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip barve write article in muktapeeth