सलाम मुंबईकर!

दिलीप मा. देशमुख
मंगळवार, 26 जून 2018

अजून ती आठवण मनातून जात नाही. मुंबईची तुंबई कधीही होऊ शकते पावसात. माणसे कोंडली जातात घरातली घरात, ऑफिसातील ऑफिसात. तरीही जिवाच्या कराराने मुंबईचे जीवनगाणे सुरूच असते.

अजून ती आठवण मनातून जात नाही. मुंबईची तुंबई कधीही होऊ शकते पावसात. माणसे कोंडली जातात घरातली घरात, ऑफिसातील ऑफिसात. तरीही जिवाच्या कराराने मुंबईचे जीवनगाणे सुरूच असते.

"हतबलता' म्हणजे काय हा अनुभव मला मुंबई येथे सर्वप्रथम गेल्या वर्षी 26 जुलैला आला. मुंबईचा पाऊस, मुंबईची वाहतूक व मुंबईचे रस्ते याविषयी मला कसलीच माहिती नव्हती. मुंबईत मी आदल्या महिन्यातच बदली होऊन गेलो होतो. त्या दिवशी नेहमीप्रमाणे शासकीय वाहनाने बांद्रा येथील कार्यालयात गेलो. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती, परंतु पाऊस एवढे रौद्र रूप धारण करेल याची कल्पना नव्हती. माझा मुलगा चेंबूर येथील संस्थेत संगणकाचे प्रशिक्षण घेत होता. माझी पत्नी त्याला सकाळी दहा वाजता त्या संस्थेत सोडून माझगाव येथे घरी परत आली होती.
साधारणतः दुपारी दोन वाजता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले, की अतिवृष्टीमुळे मुंबईतील काही भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. चेंबूरला गेलेल्या मुलाला बांद्रा येथून आणायला जाण्याऐवजी माझगाव येथून चेंबूरला जाणे सोयीचे होईल, असे सहकाऱ्यांनी सांगितले. मी लगेच पत्नीला दूरध्वनी केला व मुलाला घेऊन येण्यासाठी चेंबूरला जाण्यास सांगितले. ती तत्काळ माझगाव येथून निघाली. तोपर्यंत हार्बर लाइनवरील वाहतूक बंद झाली होती. सुदैवाने तिला चेंबूरकडे जाणारी शहर वाहतुकीची बस मिळाली. ती बस काही अंतरापर्यंत गेली. परंतु पुढील रस्ता संपूर्ण जलमय झाल्यामुळे बस तेथेच थांबविण्यात आली. तोपर्यंत माझ्या पत्नीच्या भ्रमणध्वनीवर संस्थेतून "मुलाला घेऊन जा' असा निरोप आला. संस्थेपर्यंत पोचण्यासाठी कोणतेही वाहन नव्हते. सर्व वाहतूक ठप्प झाली होती. लोक कमरेपर्यंतच्या पाण्यातून मार्गक्रमण करीत होते. माझ्या पत्नीला रस्ताही माहिती नव्हता. अनेक लोकांना विचारत ती चेंबूरला सदर संस्थेत पोचली. तोपर्यंत सर्व पालक आपापल्या मुलांना घेऊन गेले होते. संस्थेतील जबाबदार अधिकारी जावेद सर माझ्या मुलासाठी थांबले होते. माझी पत्नी संस्थेत पोचल्यानंतर जावेद सरांनी तिला वाहतूक सुरू होईपर्यंत तेथेच थांबण्याची विनंती केली. परंतु मुंबईचा पाऊस, वाहतूक, पाण्याचा विसर्ग होण्यास लागणारा कालावधी याची माहिती नसल्यामुळे तिने मुलाला ताब्यात घेतले व माझगावकडे येण्यास निघाली. तोपर्यंत दुपारचे चार वाजले होते. संपूर्ण वाहतूकच थांबली होती.

दरम्यान, बातमी आली की, सुरक्षेसाठी वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वांद्रे येथून माझगाव येथे जाण्यासाठी तोच योग्य मार्ग असल्यामुले मी लगेच निघालो. माझे सर्व सहकारीही घरी जाण्यासाठी निघाले. माझे वाहन टोलनाका ओलांडून पुढे आल्यानंतर लगेच वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे माझ्या सहकाऱ्यांना परत वांद्रे येथे कार्यालयात परतावे लागले. वांद्रे-वरळी सागरी सेतू ते माझगाव हे केवळ अर्ध्या-पाऊण तासाचे अंतर पार करण्यास मला चार तास लागले. रात्री आठ वाजता मी माझगावला घरी पोचलो. परंतु चार वाजता चेंबूरहून निघालेली पत्नी व मुलगा अजून परतले नव्हते. सुदैवाने भ्रमणध्वनी सेवा सुरळीत होती. पावसाने भिजून किंवा बॅटरी संपल्यामुळे पत्नीचा मोबाईल बंद पडला नव्हता. चेंबूर येथून माझगावला येण्यासाठी कोणतेही वाहन नसल्यामुळे पत्नी व मुलगा पायी चालत येत होते. त्यांना रस्त्याची माहिती नव्हती, "मॅनहोल'ची तर अजिबात नव्हती. त्यांच्यासोबत इतरही लोक एकमेकांना धीर देत, मदत करत मार्गक्रमण करीत होते. मी घरी सुरक्षित पोचलो होतो. परंतु पत्नी व मुलाला धीर देण्याव्यतिरिक्त कोणतीही मदत करू शकत नव्हतो. हतबलता म्हणजे काय, याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. वाहन आहे, वेळ आहे, इच्छा आहे, पत्नी व मुलगा अडचणीत आहेत, तरीही त्यांना मदत करता येत नाही, ही वेदना किती तीव्र असू शकते, याची प्रचिती घेत होतो. पत्नी व मुलगा घरी सुखरूप पोचावेत यासाठी परमेश्‍वराकडे प्रार्थना करीत होतो.
मुंबईत नुकताच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये, असा इशारा देण्यात आला आणि मला हे पुन्हा आठवले. गेल्या 26 जुलैला मुंबईतील शल्यविशारद दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून झालेला मृत्यू, त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी शासकीय यंत्रणेसह इतरांनाही करावी लागलेली धावपळ हे सर्व काही आठवले. मुंबईकरांसाठी हे नित्याचेच आहे. जीवन जगण्यासाठी करावी लागणारी धावपळ, जून ते सप्टेंबरपर्यंत निसर्गाशी करावा लागणारा सामना, न थांबता करावे लागणारे काम, "मुंबई स्पिरीट'च्या नावावर होणारे कौतुक, प्रतिकूल परिस्थितीतही इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती व आनंदी राहून काम करण्याची जिद्द.

खरोखर मुंबईकर तुम्हाला सलाम! या वर्षीचा पावसाळा मुंबईकरांसाठी आनंदाचा जावो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip deshmukh write article in muktapeeth