चोर परतुनि आले!

डॉ. अंकुश लवांडे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

उपचार करून घ्यायला एक तरुण अपरात्री एका रुग्णालयात आला. डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचारही केले; पण जाण्याआधी त्याच्या साथीदारांनी चोरी केली.

साधारण रात्रीची पावणे तीनची वेळ. तीन तरुण एका युवकाला घेऊन रुग्णालयात आले. डॉक्‍टर तात्काळ रुग्णाला उपचारासाठी दुसऱ्या खोलीत घेऊन जातात. त्या रुग्णावर योग्य उपचार करतात. उपचारानंतर रुग्ण सोबतच्या तीन युवकांबरोबर निघून गेला. डॉक्‍टर पुन्हा आपल्या खोलीमध्ये परतले. खोलीत आल्यावर लगेच त्यांच्या लक्षात आले की, आपला लॅपटॉप जागेवर नाही. या तरुणांखेरीज एवढ्यात कोणीच आले नव्हते. त्यांनीच केली असेल चोरी.

पुणे-नगर महामार्ग वर्दळीचा. शिवाय, रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीमुळे रात्री-अपरात्री रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत असतात. रांजणगावमध्ये रस्त्यावरच असलेल्या या रुग्णालयात रुग्णांची वर्दळ नेहमीची असते. रुग्णालय चौवीस तास सुरू असते. रुग्ण रात्री-अपरात्री येतात. अनेक वेळा वेगवेगळे अनुभव येत असतात. त्यामुळेच रात्री पावणेतीन वाजता आलेला रुग्ण तेथील डॉक्‍टरांसाठी विशेष नव्हता; पण उपचार घेऊन परतण्याआधी त्या सोबतच्या युवकांनी डॉक्‍टरांचाच लॅपटॉप पळवला होता. रुग्णालयामध्ये सीसीटीव्हीची सुविधा आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर तीन युवक बॅगमध्ये लॅपटॉप टाकून निघून गेल्याचे स्पष्टपणे दिसले.

दरम्यान, लॅपटॉप चोरीबाबत घडलेला प्रकार पोलिसांना कळवण्यात आला. रुग्णालयामध्ये झालेल्या चोरीच्या घटनेची दखल पोलिसांनी लगेच घेतली. चोर फार दूर गेले नसतील. फक्त कोणत्या दिशेने ते गेले, हे कोणी पाहिले नव्हते. ते कसे गेले हेही पाहिले नव्हते. पोलिस काही वेळातच रुग्णालयात आले. मात्र, मध्यंतरीच्या काळात थोडे विपरीत घडले होते. उपचार करून गेलेला युवक व त्याचे साथीदार रुग्णालयात परत आले. "एवढ्या रात्री तुम्ही आमच्यावर उपचार केले. म्हणून रुग्णालयात चोरी करणे आमच्या मनाला पटले नाही. महागणपतीच्या मंदिरापर्यंत गेलो होतो, तेथून आम्ही लॅपटॉप परत करायला आलो आहोत.' लॅपटॉप परत करून त्या चौघांनी तात्काळ पळ काढला आणि पोलिस तेथे आले. घटनाक्रम ऐकून पोलिसही अवाक्‌ झाले. त्यांनाही हसू आवरले नाही. पोलिस अधिकारी म्हणाले, ""चोर बराच माणुसकीबाज होता वाटतं.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr ankush lawande write article in muktapeeth