सी.एम. साहेबांचे बोलावणे

डॉ. अशोक नाईक
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

मोठी माणसे मोठ्या मनाची असतात असा अनुभव आपल्याला येत असतो. तो अनुभव आपण आठवत राहतो.

मोठी माणसे मोठ्या मनाची असतात असा अनुभव आपल्याला येत असतो. तो अनुभव आपण आठवत राहतो.

माझी बेळगावच्या मध्यवर्ती कारागृहात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली झाली. आमच्या चमूकडून कैद्यांना व्यवस्थित तपासणी, उपचार सुरू असायचे. 1975 मध्ये अचानक राजकीय परिस्थिती बदलली. आणीबाणी लागू झाली. अनेक राजकीय पक्षांचे मोठे नेते, कार्यकर्ते, डॉक्‍टर, वकील असे समाजातले सर्व थरांतले मान्यवर कारागृहात स्थानबद्ध म्हणून आले. आम्ही डॉक्‍टर मंडळी रोज त्यांच्या बराकीत जाऊन आजारी असणाऱ्यांना व्यवस्थित तपासून उपचार करू लागलो. ही पाहुणेमंडळी समाधानी होती. या मंडळींत कर्नाटकमधले नेते रामकृष्ण हेगडे होते. आम्ही त्यांना व्यवस्थित तपासल्यावर त्यांनी म्हटले, ""डॉक्‍टर, काही काळजी करू नका. माझा पूर्वी डिटेल्स चेकअप झाला आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे माझी औषधे वेळेवर मिळतील याची व्यवस्था करा. मला काही त्रास झालाच तर मी तुम्हाला बोलावीन, तेव्हा माझ्या बाबतीत निश्‍चिंत राहा.'' बडी नेते मंडळी किती मोठ्या मनाची असतात हे त्यांच्या वागण्यावरून आम्हाला कळले. पुढे आणीबाणी मागे घेण्यात आली. सगळे सुटले. त्यानंतर रामकृष्ण हेगडे कर्नाटकाचे मुख्यमंत्री झाले. काही महिन्यांनंतर ते बेळगावच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी अचानक आमच्या कारागृहाला भेट दिली. संध्याकाळचे सहा वाजले होते. एका अधिकाऱ्याने धावत येऊन सांगितले, की ""डॉक्‍टरसाहेब, सी.एम. साहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलावले आहे.'' माझ्या मनात विचार आला, आणीबाणीच्या काळात माझ्याकडून चुकून काही वावगे तर घडले नसेल ना? सी.एम. साहेबांना अभिवादन करत आदराने दूर उभा राहिलो. सी.एम. साहेब म्हणाले, ""या या डॉ. नाईक. तुम्ही इथेच आहात हे कळल्यावर तुम्हाला खास बोलावले आहे. आणीबाणीच्या काळात तुम्ही आम्हा सर्वांची चांगली काळजी घेतलीत. आम्हा सर्वांतर्फे तुमचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे.'' नंतर ते जेल सुपरिंटेंडेंटना म्हणाले, ""यू आर लकी टू हॅव सच ए ड्युटीफुल अँड सिन्सियर मेडिकल ऑफिसर.'' मग माझ्याबरोबर त्यांनी बराक पाहिली. चहा घेतला. निघताना माझ्याशी हस्तांदोलन करून व पाठीवर शाबासकी देऊन त्यांनी आम्हा सर्वांचा निरोप घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr ashok naik write article in muktapeeth