भूतदयेचे भूत

डॉ. अतुल राक्षे
शुक्रवार, 23 मार्च 2018

पक्ष्यांना खाण्यासाठी धान्य थेट रस्त्यावर टाकण्यापेक्षा छोट्या पक्ष्यांसाठी "बर्ड फीडर्स' मिळतात, ते वापरता येतील. पण भूतदयेचे भूत मानगुटीवर बसलेल्यांना सांगणार कोण?

काही दिवसांपासून आपल्या शहरांत भटक्‍या कुत्र्यांचा त्रास खूपच वाढला आहे. ही कुत्री रस्त्यांवर घोळक्‍यांनी फिरतात. रस्ते, पदपथावर घाण करून ठेवतात. सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये, मोकळ्या जागांवर ठाण मांडून बसतात. रस्त्यात होणाऱ्या अनेक अपघातांना ही कुत्री जबाबदार असतात. थंडीच्या दिवसांत दुचाक्‍यांचा पाठलाग करतात. रात्रभर भीषण आवाजात ओरडत राहतात.

पक्ष्यांना खाण्यासाठी धान्य थेट रस्त्यावर टाकण्यापेक्षा छोट्या पक्ष्यांसाठी "बर्ड फीडर्स' मिळतात, ते वापरता येतील. पण भूतदयेचे भूत मानगुटीवर बसलेल्यांना सांगणार कोण?

काही दिवसांपासून आपल्या शहरांत भटक्‍या कुत्र्यांचा त्रास खूपच वाढला आहे. ही कुत्री रस्त्यांवर घोळक्‍यांनी फिरतात. रस्ते, पदपथावर घाण करून ठेवतात. सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये, मोकळ्या जागांवर ठाण मांडून बसतात. रस्त्यात होणाऱ्या अनेक अपघातांना ही कुत्री जबाबदार असतात. थंडीच्या दिवसांत दुचाक्‍यांचा पाठलाग करतात. रात्रभर भीषण आवाजात ओरडत राहतात.

मध्यंतरी नेहमीप्रमाणे तळजाईच्या टेकडीवर फिरायला गेलो होतो. अचानक समोरच्या झाडीतून एक भेदरलेला राखाडी ससा पळत आला. वाटेच्या पलीकडे झाडीत शिरला. क्षणात त्याच्या मागावर असलेली आठ-दहा कुत्री झाडीतून त्याच्या मागोमाग धावत गेली. तिथल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार तर ही कुत्री टेकडीवरचे मोर आणि मोरांच्या पिलांनाही मारून खातात. काही महिन्यांपूर्वी मी स्वत: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्यविभाग, पालिकेचे संकेतस्थळ या ठिकाणी यासंदर्भात संपर्क केला. भटक्‍या कुत्र्यांना पकडण्यासाठी जी गाडी येते, तिचे कर्मचारी आणि पालिकेचे अधिकारी यांनी स्वत:हून मला फोन केला, तेव्हा खरेतर मी सुखावलो. पण त्यांनी मला एकाहून एक सुरस माहिती दिली. "कुत्री पकडण्याची गाडी येणार असते तेव्हा या भटक्‍या कुत्र्यांना तिचा "वास' लागतो. त्या परिसरातली कुत्री पटापट लपून बसतात. आणि जरी अशी कुत्री पकडली गेली, तरी त्यांची "नसबंदी' करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडले जाते.'

भटक्‍या कुत्र्यांना खायला घालून पुण्य आणि आत्मिक समाधान मिळवण्याची हल्ली "फॅशन' आली आहे. आमच्या गल्लीत रोज दुपारी एक पांढरी गाडी थांबे. मिनिटभरात दहा-बारा कुत्री जमा होत. गाडीची काच खाली जाई आणि पटापट पन्नासएक ग्लुकोज्‌ बिस्किटे रस्त्यावर टाकून गाडी निघून जाई. एकदा मी ही गाडी थांबवली. गाडीतला माणूस चांगला उच्च शिक्षित वाटत होता. पन्नाशीतला. हातात सिगारेट. मी त्याला बिस्किटांबद्दल विचारले. तो म्हणाला, ""होय. आम्हीच टाकतो.''

त्याला बहुधा मी त्याचे कौतुक करीन अशी अपेक्षा होती. पण मी त्याला या कुत्र्यांच्या त्रासाबद्दल सांगितले. तशी तो एकदम उखडलाच. ""आम्ही बिस्किटे टाकणारच! काय करायचे ते करून घे!'' म्हणाला. मी म्हटले, ""या कुत्र्यांची इतकी काळजी असेल, तर त्यांना घरी घेऊन जा आणि काय सेवा करायची ती करा!'' पुढे काही दिवस ती गाडी दिसली नाही. पण अजूनही अनेकदा रस्त्यावर टाकलेली बिस्किटे दिसतातच. वास्तविक ही बिस्किटे खाल्ल्याने कुत्र्यांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. लठ्ठपणा, मधुमेह, दात किडणे असे माणसांमधले विकार त्यांना होण्याची शक्‍यता असते. पाळलेल्या कुत्र्यांची तीच गोष्ट! आपली पाळीव कुत्री आपण रोज दोन-तीन वेळा फूटपाथवर, भर रस्त्यात, इतरांच्या दारात "शी' करायला नेतो, याची यांना लाजही वाटत नाही. कुत्र्यांची विष्ठा, त्यांचे केस, लाळ यांतून होणारे जंतुसंसर्ग, चाव्यांमुळे होणारे घातक आजार, त्यांची दहशत, गोंगाट यांबाबत आपल्याकडे नीट माहिती नाही. दरवर्षी जगभरात चाळीस ते सत्तर हजार लोक रेबीजमुळे दगावतात. यांपैकी सुमारे तीस हजार एकट्या भारतात मृत्युमुखी पडतात. ही आकडेवारी भयावह आहे.

तीच गोष्ट कबुतरांची! जुन्या वाड्यांच्या खिंडारांत पूर्वी वटवाघळे आणि कबुतरे राहात. पण आता मात्र घराच्या गच्चीवर, माळ्यावर, पार्किंगमध्ये, दुकानांच्या शटरवर, पाइपांच्या खोबण्यांत अशी कुठेही ती राहतात. इतकी की घराघरांत खिडक्‍या आणि बाल्कन्यांना जाळ्या लावण्याची वेळ आली आहे. तरीही अनेक दुकानांसमोर या कबुतरांसाठी धान्य फेकले जाते. या कबुतरांचे माणसाच्या आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात. त्यांच्या पिसांमुळे, शरिरावरील विषाणूंमुळे "हायपरसेन्सिटीव्हिटी न्यूमोनिया' हा आजार होतो. सतत सर्दी, ब्रॉंकायटीस्‌, दमा यांसोबतच फुफ्फुसांना सूज येते आणि काही दिवसांत ती निकामी होऊ शकतात! त्यांच्या विष्ठेत "टॉक्‍सोप्लास्मा' या अतिशय घातक घटकासह विविध बुरश्‍या आणि इतर विषारी घटक असतात. "पर्यावरणा'साठी कबुतरांना खायला घालणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही, की यामुळे उलट पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. चिमण्या, कावळे, मुनिया, बुलबुल अशा छोट्या पक्ष्यांचे अन्न ही कबुतरेच फस्त करून टाकतात! एकदा कबुतरांचा सुळसुळाट झाला की, त्यांची संख्या काही केल्या कमी होत नाही. त्यांची विष्ठा, घरटी, पिसे यांच्यातून विषारी घटक पसरतच राहतात. त्यांनी केलेली घाण काही केल्या स्वच्छ होत नाही.
स्वत:च्या दुकानासमोर कबुतरांना रोज नियमाने खायला घालणाऱ्या एका व्यापारी मित्राला मी याबाबत विचारले, तर त्याने मला दुकानात चिकटवलेले एक स्टिकर दाखवले. त्यावर "पक्षी को दाना देने से व्यापार की वृद्धी होती है'. यातला "भूतदये'चा उद्देश उत्तम असला, तरी त्या कृतीतला विवेक मात्र नाहीसा झाला आहे.
पर्यावरण आणि भूतदया यांच्या नावाखाली आरोग्याच्या व समाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr atul rakshe write article in muktapeeth