मस्त मस्त उतार...

डॉ. धनश्री कोंढरे
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

तो उतार मस्त होता. पंचवीस किलोमीटर आता उतारच. कानांत गाणी आणि नयनांत हिमालय. मी मस्त निघाले होते सायकलवरून. तोच मी पडले आणि नंतर आपुलकीची धावपळ...

तो उतार मस्त होता. पंचवीस किलोमीटर आता उतारच. कानांत गाणी आणि नयनांत हिमालय. मी मस्त निघाले होते सायकलवरून. तोच मी पडले आणि नंतर आपुलकीची धावपळ...

आमचा पाच जणांचा "ग्रुप' आहे. सगळेच आपापल्या क्षेत्रात जम बसवून आहोत. व्यवसायासह कला, संगीत क्षेत्रातही सगळ्यांना रुची आहे. त्यात सगळेच निसर्गप्रेमी. त्यातूनच आम्ही ट्रेकिंग, सायकलिंग, सहलींचे वेड जपले आहे. आम्ही सायकलींवर लेह-लडाखला निघालो. गेल्या वर्षी मनालीपासून लेहपर्यंत सायकलिंग केले होते. तो अनुभव इतका भन्नाट होता, की या वर्षीही त्या हिमशिखरांनी पुन्हा बोलावले. या वर्षी आम्ही "लाइफ सायकल ग्रुप'सोबत जगातील सर्वांत उंच "पासेस्‌' व तीन "लेक्‍स' असा सायकल प्रवास करणार होतो. लेहपासून ही सायकल यात्रा सुरू होणार होती. सरावासाठी दूरवर सायकल फेऱ्या सुरू होत्या. सहलीला जाण्याचा दिवस जवळ येत असतानाच आजी गेली. व्यवसायाने डॉक्‍टर असल्याने आजीच्या जाण्याचे दुःख तिने केलेल्या नेत्रदानाने, समाजाला दिलेल्या नवविचारांच्या शिकवणीने हलके करू शकले. तिला आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्यासाठी तिची रक्षा सिंधू नदीत समर्पित करण्यासाठी घेतली अन्‌ तिच्या तेराव्यालाच प्रस्थान केले.

कोणत्याही अडथळ्याविना आम्ही जगातला तिसऱ्या क्रमांकाचा उंच पास (साडेसतरा हजार फूट उंचीवर) चढून गेलो. निसर्गाचे उत्तुंग विलोभनीय रूप भरभरून कॅमेऱ्यात पकडले. आमच्या एका सहचाऱ्याला अतिउंचीवर होणाऱ्या आजाराचा त्रास झाला. इतर सर्व ठणठणीत होतो. तिसऱ्या दिवशी पेंगॉग लेकच्या दिशेने जाताना प्रचंड उतार लागला. आदल्या दिवशीच्या चढाईनंतर उताराची मजा घेत शोलताक ओलांडले. पुढे पंचवीस किलोमीटर उतारच असल्यामुळे मी मस्त कानाला ब्लूटूथ लावून गाणी ऐकत वेग घेतला. समोर नवांग हा लेहचाच सायकलस्वार आणि मागे माझा मित्र राहुल असा आमचा मजेत प्रवास चालू होता. कानांत गुंजणारे गाणे आणि समोर उत्तुंग हिमालय यांमध्ये गुंग झाले आणि चुकून मागच्या ब्रेकवरचा हात काढला गेला. पुढचा ब्रेक दाबलेलाच असल्यामुळे त्या मस्त उतारावार सायकल थांबली अन्‌ क्षणार्धात मागचे चाक उचलले गेल्याने मी पुढे तोंडावर पडले. डोक्‍यावर हेल्मेट होते. जोरात आपटल्यामुळे हेल्मेटला तडा गेला; पण डोके सुरक्षित राहिले. हनुवटीला खूप मार लागला.

नुकताच अशाच अपघातात एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला होता, त्यामुळे सगळेच प्रचंड हादरले. राहुल आणि नवांगने मला रस्त्याच्या बाजूला घेतले. काही बाइकर्स तेथून जात होते. त्यांनी माझ्या चेहऱ्याच्या जखमांना मलम लावले. एका लष्करी अधिकाऱ्याची गाडी समोरून येत होती. त्यांनी माहिती दिली, की चार किलोमीटरवर लष्कराचे रुग्णालय आहे. तेथे ताबडतोब घेऊन जा. सगळे ब्रह्मांड गरगर फिरते आहे असे वाटत होते. आमच्या मागून तेजस हे सायकलिंग इंजिनिअर आपल्या कुटुंबाबरोबर गाडीतून येत होते. त्यांनी मला त्यांच्या गाडीत घेतले आणि रुग्णालयात आणले. तेथे पोचताच उपचारांसाठी आलेल्या एका सैनिकाने पटकन उठून मला जागा करून दिली. तिथले डॉक्‍टर पळतच आले. लगेचच उपचार सुरू केले. कसलीही चौकशी नाही, की कोणतीही औपचारिकता नाही. तेथील कॅप्टन तन्वर यांनी सगळी "हिस्टरी' घेतली. ताबडतोब डॉ. गंगॉय यांनी चेहऱ्याचे निरीक्षण करून हनुवटीखाली स्टिचेस घातले. लगेचच एक्‍सरेसाठी पाठवले. एवढ्या दुर्गम भागात अद्ययावत मशिन्स नसतानाही वाघचौरे यांनी निरनिराळ्या अँगल्सनी पाच-सहा एक्‍स रे काढले.

हनुवटीला दोन ठिकाणी फ्रॅक्‍चर आहे हे कळल्यावर त्यांनी मला डेन्टल डिपार्टमेंटला हलविले. तेथे पाच मिनिटेही न दवडता उपचार सुरू झाले. तेथील डॉ. चक्रवर्ती यांनी सांगितले, की कारूमध्ये डॉ. शकील हे मुखतज्ज्ञ शल्यविशारद आहेत, त्यांच्याकडे लगेच जा. इतकेच नव्हे, तर त्यांनी स्वतः दूरध्वनीवरून शकील यांना सर्व माहिती दिली. त्यादरम्यान त्यांनी दोन वेळा मला ऑरेंज ज्यूस प्यायला दिला. माझ्या सहकाऱ्यांना किशमिश खायला दिले. माझ्या पुढील उपचारांना वेळ लागू नये म्हणून संपूर्ण केस हिस्टरी रेडी ठेवली. "लाइफ सायकल'चे अप्पा आणि गायत्री जोशी पूर्णवेळ माझ्यासोबत होते. पण आम्हाला कारूला जाता आले नाही. कारण पुण्यास परतण्याची विमान तिकिटे लगेच उपलब्ध झाली. माझ्यावर ओढवलेल्या या प्रसंगात मला लष्कराची शिस्त, रुग्णाविषयी तेथील डॉक्‍टर्सनी दिलेली सेवा, तत्परता यांचा अनुभव आला.

मैत्रीच्या नात्याने बांधले गेलेलो आम्ही पाचही पुण्यास परत निघालो. इतर चौघे चांगले सायकलिंग करत असतानाही माझी अवस्था बघून माझ्यासोबत परत निघाले. काही ऋणे अशी असतात, की जी फिटूच नयेत असे वाटते. कारण ही मनात भरून राहिलेली कृतज्ञता त्या व्यक्तीच्या प्रति सदैव राहावी असे वाटते. मलाही देवासारखा भेटलेला तेजस, ते सैनिक, लष्कराचे डॉक्‍टर, "लाइफ सायकल'चे कार्यकर्ते आणि अर्थात माझे मित्र या सर्वांच्या ऋणात राहायला आवडेल.
आयुष्याच्या वळणावरती
असे भेटती माणिक मोती
स्नेहभावे भरून राहावी
कधी न व्हावी ओंजळ रिती।


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr dhanashri kondhre write article in muktapeeth