टोळी सापडली

muktapeeth
muktapeeth

आपण थोडे सजग राहिल्यावर फसवणुकीपासून वाचू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. थोडे चौकस राहणे क्रमप्राप्त आहे.

27 फेब्रुवारी 2018. 11.30 ची वेळ. दूरध्वनी वाजला. "क्‍या आप ज्योत्स्ना महाजन बात कर रही है? केशवजी घरपर है? मै पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अँड ऑथॉरिटीसे बात कर रहा हूँ। आपके पती नेव्ही से रिटायर्ड हो चुके हैं न उनको सरकार पेन्शन फंडसे ऍरिअर्स देना चाहती है। क्‍या आपको वह लेना है?
यांना नेव्हीमधून रिटायर्ड होऊन 42 वर्षे झाली आणि देवाज्ञा होऊन नऊ वर्षे. मी त्यांची वारस म्हणून फोनवर त्या बाईने कृतिका आगरवाल नाव सांगितले व एक फोन नंबर सांगितला व नंतर दुसऱ्याच फोनवरून बोलली. दिलेल्या पत्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक अकाउंट नंबर, कॅन्सल केलेला चेक हे सर्व एका तासाच्या आत स्पीड पोस्टाने पाठविण्यास सांगितले. डेथ सर्टिफिकेटची तसेच वरील सर्व बाबींचे झेरॉक्‍स पाठवा असे सांगितले. पाठविताना पाकिटावर फाइल नंबर BPL 7984-p व पिन IT 83939 घालावा असेही सांगितले आणि ट्रॅकिंग नंबर पाठवा असे सांगितले. खाली नमूद केलेला पत्ताही लिहून घ्या असे सांगितले. pension fund regulatary and development autority govt. h.o. central govr 87/d 1st floor rohini sector 15 new delhi - 110089
हा तो पत्ता आहे.

माझा मुलगा सचिन आणि पेन्शनचे अकाउंट असलेल्या सेंट्रल बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलताना काही गोष्टी अधिक स्पष्ट होत गेल्या की हा फोन फ्रॉड आहे. माझी वैयक्तिक माहिती काढून त्याचा गैरवापर करणारी ही टोळी व यंत्रणा काय आहे असा विचार करून दुसऱ्या दिवशीच सायबर क्राइम ब्रॅंचमध्ये मी तक्रारवजा अर्ज दाखल केला. त्याची दखल घेऊन स्वारगेट पोलिस स्टेशनवरून मला पीएसआय साबळे यांनी पोलिस स्टेशनला बोलावून घेतले.
मनात अतिशय धाकधूक की काय असेल पोलिस स्टेशनवर वाढून ठेवलेलं? कोण बोलेल कशा प्रकारची वागणूक मिळेल आणि सरतेशेवटी तक्रार केल्यामुळे आपल्या पदरात काय पडले, अशा विचित्र अवस्थेत पोलिस स्टेशनवर पहिले अधिकारी भेटले त्यांनाच विचारले पीएसआय साबळे कुठे असतील? मी महाजन त्यांनी भेटायला बोलावलं आहे. आश्‍चर्य असे की तेच साबळे साहेब होते. मनातली अर्धी भीती पळून गेली.

खरंतर वर लिहिलेल्या माहितीचा पडताळा घेण्यासाठीच मला बोलावलं होतं. माझा तक्रार अर्ज काढून त्यांनी बोलायला सुरवात केली. शाबासकी देत सांगितलं, की कोणतेही कागदपत्र न देता त्या कृतिका अगरवालचा नंबर घेऊन तुम्ही पोलिसांना मदतच केली आहे. मनातील पोलिसाविषयीची भीती पार पळून गेली होती. "बरं का मॅडम, आम्ही तुमचे मित्रच आहोत. सदैव तुम्हाला मदत करायला उत्सुक व तत्पर आहोत. अशा प्रकारचे सायबर क्राइम म्हणजे तुमची माहिती विशिष्ट संकेत स्थळावरून "चोरून' त्याचा गैरवापर करणारी टोळी सध्या कार्यरत आहे. वैयक्तिक माहिती तर कुणाला देऊ नकाच आणि खुबीने त्या व्यक्तींचा फोन नंबर घेतला आणि बिनदिक्कत पोलिसांबरोबर शक्‍य तितक्‍या लवकर ही माहिती लेखी स्वरूपात दिली, तर अशा व्यक्तीचं सापडणं आणि यापुढे होणारे गुन्हे टाळणं शक्‍य आहे. तुम्ही दिलेला नंबर दिल्लीचा आहे. अशा वेळेस हा फोन ब्लॉक करून किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवून सापळा रचून या व्यक्ती पकडल्या जातात. फोन करून मागणी केल्यामुळे पैसे पण देणारे महाभाग आहेत. अगदी थोडेसुद्धा पैसे देणं म्हणजे अशा व्यक्तींना गुन्हे करण्यास प्रवृत्त करण्यासारखं आहे. जर असं झालंच तर लवकरात लवकर गुन्ह्यांच स्वरूप पोलिसापर्यंत पोचणं गजरेचं आहे. बॅंकेचं कार्डही आपल्याला ब्लॉक करता येतं आणि भरलेले पैसेही परत मिळू शकतात.''

साबळे साहेब बोलत होते मी मात्र अवाक होऊन ऐकत होते. सतर्कता, सुरक्षितता, सावधानता या त्रिसूत्रीचा वापर करून आपण आपल्याला वाचवू शकतो.
या वेळेस सेवानिवृत्ती धारकांनो आपण लक्ष्य आहोत या टोळीचं. लक्षात ठेवा आपली वैयक्तिक माहिती चोरून त्याचा आपल्याविरुद्ध वापर करण या गुन्ह्यापासूनसुद्धा आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे.
पोलिस - 100 पुणे सायबर सेल - 020-26123346

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com