तू फक्त सही कर..!

डॉ. ज्योती गोडबोले
बुधवार, 6 जून 2018

आता परिस्थिती बदलली आहे. महिला आर्थिक क्षेत्रातही स्वावलंबी झाल्या आहेत. अशावेळी सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती महिलांना असणे आवश्‍यकच आहे.

मैत्रीण अमेरिकेला चालली होती. चार-पाच महिने भेट होणार नसल्याने तिने आम्हाला जेवायला बोलावले होते. गप्पा मारताना सुनीताने विचारले, निर्मला, तुला डॉलरचा भाव काय मिळाला गं? कुठून घेतलेत तुम्ही एक्‍स्चेंज? निर्मला म्हणाली, 'मला माहीत नाही बाई ! ते सगळं आमचे हे बघतात. मी फक्त ते सांगतील त्या फॉर्मवर सही करते.''

आता परिस्थिती बदलली आहे. महिला आर्थिक क्षेत्रातही स्वावलंबी झाल्या आहेत. अशावेळी सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती महिलांना असणे आवश्‍यकच आहे.

मैत्रीण अमेरिकेला चालली होती. चार-पाच महिने भेट होणार नसल्याने तिने आम्हाला जेवायला बोलावले होते. गप्पा मारताना सुनीताने विचारले, निर्मला, तुला डॉलरचा भाव काय मिळाला गं? कुठून घेतलेत तुम्ही एक्‍स्चेंज? निर्मला म्हणाली, 'मला माहीत नाही बाई ! ते सगळं आमचे हे बघतात. मी फक्त ते सांगतील त्या फॉर्मवर सही करते.''

आम्ही हे ऐकून चकितच झालो. एका कंपनीत ऑफिसर असलेल्या निर्मलाकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. आपल्याला हे अनेक ठिकाणी बघायला मिळते. संसार दोघांचा. मिळवते दोघेही. असे असतानाही घराची सूत्रे बाईकडे आणि बरेचसे व्यवहार पुरुष जोडीदाराकडे असेच चित्र बऱ्याचदा दिसते. निर्मलाही याला अपवाद नव्हती. असे करणे बरोबर नाही.

पूर्वीच्या काळी गोष्ट वेगळी होती. बायका घरातील रामरगड्यात गुंतलेल्या असायच्या. पुरुषांनी त्यांना विश्‍वासात घेऊन आपल्या गुंतवणूक, पगार, खर्च, उत्पन्न याबद्दल सांगणे संभवतच नव्हते. शिवाय आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत बाईचे काम चुलीपुरते हे ब्रीदवाक्‍य होतेच.

दुर्दैवाने एकत्र कुटुंबातील त्या पुरुषाचे निधन झाले, तर त्या बाईला बाहेरच्या व्यवहाराची काहीच माहिती नसायची. आपल्या घरात पैसा येतो कुठून, उत्पन्न किती, खर्च किती, शेत विकले आहे का गहाण टाकले आहे, तिला काहीच माहीत नसायचे. आणि मग एकेकाळी सोन्याने लगडलेल्या त्या बाईचे दागिने हळूहळू सराफाची वाट धरायचे. आजचा जमाना किती वेगळा आहे. आताची पिढी सुशिक्षित, उच्चशिक्षित आहे. बायका स्वतः पैसा कमवतात. पण काही थोड्या बायका तो कसा, कुठे गुंतवायचा हे निर्णय स्वतः घेतात.

आमची पिढी आता साठीच्या पुढे गेली आहे. आमची पिढीही सुशिक्षित आहे. माझ्या तर सर्वच मैत्रिणी नोकरदार होत्या. तरीसुद्धा आमच्या निर्मलासारखे तू फक्त सही कर बाकीचे मी बघतो, असे का? अशी कोणतीही आर्थिक गोष्ट नाही की जी पुरुष करतो आणि बाई करू शकत नाही. मग तिने तरी आपल्या जोडीदारावर इतके अवलंबून का राहावे? का हे सर्व शिकण्याची मनापासून इच्छाच नसते?
वैद्यकीय शास्त्राच्या अनुमानाप्रमाणे बाईला पुरुषांपेक्षा जास्त आयुष्य लाभते. ही बाब जर लक्षात घेतली तर बाईने सर्व आर्थिक व्यवहार स्वतः समजून घेणे अत्यावश्‍यकच आहे. त्यात कठीण काय आहे?
मध्यंतरी आमच्या मंडळात इच्छापत्राचा विषय निघाला. कधीतरी त्यावर गंभीरपणे चर्चा होतेच. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आम्हा 60-65 मैत्रिणीपैकी फक्त 8 ते 10 जोडप्यांनी आपले मृत्युपत्र आपल्या वकिलामार्फत उत्तम तऱ्हेने करून घेतले होते. या वेळी अश्‍विनी म्हणाली, ""अगं, मला खूप वाटते की आपले इच्छापत्र करून ठेवावे. आमची स्थावर जंगम प्रॉपर्टी खूप आहे. मुलांमध्ये नंतर कटकटी नकोत. पण मिस्टरांना विचारले तर ते म्हणतात बघू. आता नको, करू वेळ येईल तेव्हा !'' पुन्हा आम्ही अवाक झालो. कोणत्या वेळेची माणसे वाट पाहतात? ती वेळ सांगून येते का? उलट ती वेळ येण्याआधीच तुम्ही स्वतः आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात.
आताची स्त्री स्वतंत्र आहे असे नुसते तोडी म्हणून कसे चालेल? अशी एक वृत्ती आहे का, की इतकी वर्षे मी घरदार, पै पाहुणा, मुलांची शिक्षणे, नोकरी या सर्व आघाड्या सांभाळल्या. तर या बाहरेच्या जबाबदाऱ्या तुम्हीच सांभाळा. मला त्यात लक्ष घालायला लावू नका. असे असेल तर ते सर्वस्वी चूक आहे. सर्वस्वी जोडीदारावर अवलंबून असलेल्या तसेच त्याच्या व आपल्या आर्थिक व्यवहाराबद्दल पूर्ण अनभिज्ञ असलेल्या स्त्रीचा जोडीदार दुर्दैवाने गेला, तर ती स्त्री हताश होते. तिने आजपर्यंत तो सांगेल तेथे सही याशिवाय काहीच जाणून घेतलेले नसते. पण आता एकाच दिवसात हे सर्व तिच्या अंगावर येऊन कोसळते.

कॉर्पोरेशन टॅक्‍स, इन्कमटॅक्‍स, ऑनलाइन बिले कशी भरायची, ऑनलाइन बॅंकिंग कसे करायचे हे शिकणे अत्यावश्‍यक आहे. एका क्‍लिकवर हे सर्व सहज करता येते. बाईने शिकायची इच्छा व तयारी दाखवली तर तिचा जोडीदार तिला आनंदाने शिकवायला तयार असतो. यात पुरुषाची सर्वस्वी चूक नाहीये. बाईनेच त्याच्यावर सर्व गोष्टी ढकलल्या, तर तो ते करतोच. मग तो म्हणणारच की तुला त्यातले काही समजत नाही. तू फक्त मी सांगतो तिथे सही कर. तर मैत्रिणींनो हा लेखन प्रपंच एवढ्याचसाठी की जोडीदाराचे, स्वतःचे सर्व व्यवहार नीट माहिती करून घ्या. फुली मारलीय तिथे तू सही कर या गोष्टी आता थांबवू या.

Web Title: dr jyoti godbole write article in muktapeeth