खेळ आवरायला हवा!

डॉ. ज्योती गोडबोले
गुरुवार, 10 जानेवारी 2019

छोट्या मुली किती सहज त्यांचा खेळ आवरतात आणि आपण मोठी माणसे वर्षांनुवर्षे पसारा मांडून बसतो आपल्या भातुकलीचा!

आद्या आणि डॉली भातुकली खेळत होत्या. खेळून झाल्यावर त्यांनी सगळा खेळ खोक्‍यात नीट भरून ठेवला. प्लेरूम स्वच्छ केली आणि दोघी आपला अभ्यास करायला लागल्या.

छोट्या मुली किती सहज त्यांचा खेळ आवरतात आणि आपण मोठी माणसे वर्षांनुवर्षे पसारा मांडून बसतो आपल्या भातुकलीचा!

आद्या आणि डॉली भातुकली खेळत होत्या. खेळून झाल्यावर त्यांनी सगळा खेळ खोक्‍यात नीट भरून ठेवला. प्लेरूम स्वच्छ केली आणि दोघी आपला अभ्यास करायला लागल्या.

मी, लांबूनच त्यांचा खेळ बघत होते. मनात विचार आला, किती रंगून या मुली भातुकली खेळत होत्या आणि क्षणात कंटाळा आल्यावर तो खेळ त्यांनी आवरून टाकला... आपण कधी शिकणार खेळ आवरायला?... चार बुडकुली आणि तीन खोल्यांत सुरू केलेली ही भातुकली मोठ्या बंगल्यात आली तरी आपले अजूनही खेळ खेळणे सुरूच आहे! आमची पिढी, आता साठी ओलांडून पुढे गेली आहे. नव्या दमाचे, खेळाडू या खेळात सज्ज झाले आहेत. हा भातुकलीचा डाव देऊ या की त्यांच्या हातात! ... छोट्या आद्याने खेळत असताना, मला कुठे विचारले, की आजी, मी आता कसे खेळू? तिला मुळीच माझी मदत नको होती. त्या दोघी, त्यांना हवे तसे घरकुल मांडत होत्या, मोडत होत्या. पुन्हा नवीन रचना करीत होत्या. आपलीही मुले, त्यांची भातुकली, अशीच खेळतील. त्यांनाही त्यांचा डाव, मनासारखा मांडू दे. आपण नको त्यात हस्तक्षेप करायला! चुकतील, धडपडतील, पण होतील की अनुभवाने शहाणी!
आपला खेळ आवरायची वेळ झालीय आता! तो वर बसलेला परमेश्‍वर भातुकलीचा खेळ अर्धवट सोडून कधी बोलावेल कोणास ठावूक! आपण आधीच खोकी भरून ठेवून तयारीत असलेले बरे! कोणा गरजवंताने नव्याने डाव मांडला असेल तर देऊ या ना त्यांना आपली चार भांडी, कपडे, न लागणाऱ्या हव्यासाने गोळा केलेल्या वस्तू! त्यांनाही मिळू दे आनंद खेळण्याचा! जुनी ओझी आता कवटाळायला नकोत. कितीतरी घरातील पक्षी दूरदेशी उडून गेलेत, त्यांना तुमच्या जुन्यापुराण्या भातुकलीची मुळीच गरज नाही. कशाला हवा हा पसारा? ... खेळ आवरता घ्या आणि सज्ज राहा नव्या प्रवासाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr jyoti godbole write article in muktapeeth