रायआवळ्याचे दिवस

डॉ. ज्योती गोडबोले
बुधवार, 20 डिसेंबर 2017

परकरी पोरवयात रायआवळ्यांचे काय कौतुक असायचे. अक्षरशः जीव टाकायचो आम्ही. नंतर परसात वाढला रायआवळा. मुलींही या सोनपिवळ्या रायआवळ्यांनी वेड्या होत. पण आता त्याच्याकडे पाहायला कोणी नाही, तो मात्र बहरतोच आहे.

परकरी पोरवयात रायआवळ्यांचे काय कौतुक असायचे. अक्षरशः जीव टाकायचो आम्ही. नंतर परसात वाढला रायआवळा. मुलींही या सोनपिवळ्या रायआवळ्यांनी वेड्या होत. पण आता त्याच्याकडे पाहायला कोणी नाही, तो मात्र बहरतोच आहे.

उषाने पुढाकार घेतला आणि आम्ही मैत्रिणी पन्नास वर्षांनी हुजूरपागेत भेटलो. उषाने सुंदर नियोजन केले होतेच; पण गंमत म्हणजे, तिने रायआवळे, चिंचा, बोरे, पेरू, काजूकंद असा शाळकरी वयातला अतिशय प्रिय असलेला मेवा टोपल्या भरभरून टेबलांवर ठेवला होता. त्या रानमेव्याकडे पाहून आम्हाला किती आनंद झाला म्हणून सांगू! आता आम्ही सगळ्याजणी आज्ज्या झालो आहोत. पण आंबट चिंबट रसरशीत रायआवळे पाहून तोंडाला पाणी सुटायचे राहणार होते थोडेच? मन गेलेच कितीतरी वर्षे मागे! लहान लहान परकऱ्या पोरी आम्ही. शाळेत मोठमोठी आंब्यांची झाडे. एखादी कैरी पडल्याचा आवाज आला, की धावलोच आंबराईत. कैरी चिमणीच्या दाताने खाताना जी मजा यायची ती औरच! शाळेच्या बाहेर टोपली घेऊन एक आजी बसायची. त्या टोपलीत असायचे रायआवळे, कैऱ्या, चण्यामण्या बोरे. आम्हाला आमचे आई-वडील "पॉकेटमनी' देत नसत. क्वचित कधी आईने दहा पैसे दिले, तर मी धावत जाऊन रायआवळे घेत असे.

मला आठवते, माझ्या वडिलांच्या स्नेह्यांचा डेक्कन जिमखान्यावर बंगला होता. त्यांच्या परसदारी सुंदर रायआवळ्याचे झाड होते. त्या रायआवळ्यांच्या आशेने मी आणि माझी मैत्रीण वडिलांचा निरोप पोचवायला संभाजी पुलावरून इतक्‍या लांब चालत जात असू. तेव्हा तर "बालगंधर्व'जवळचा शिंदे पूलही नव्हता झालेला! ते आवळे वेचून पिशवी भरून घरी घेऊन येताना जो काही आनंद होई तो केवळ अवर्णनीय. केवढी अपूर्वाई होती आम्हाला रायआवळ्यांची!

आम्हाला ते मोठे, डोंगरी आवळे कधीच आवडले नाहीत. पण रायआवळ्यांच्या पिवळ्याजर्द मण्यांनी लगडलेल्या झाडाचे घोसच्या घोस बघून मनात आनंद कल्लोळ उसळे. चार आवळ्यांच्या बदल्यात एक पेन्सिल. दहा आवळे दिले तर अडलेल्या गणिताची रीत, असा सौदा तेव्हा गुपचुप चालत असे. हेमाकडे जुईचा सुंदर वेल होता. ती रोज छान छान गजरे करून आणायची. आम्ही नंबर लावून ते गजरे तिच्याकडून हस्तगत करत असू. पण त्या बदल्यात मूठभर रायआवळे घ्यायला ती विसरायची नाही. किती वेळा आम्ही भोंडल्याला एकमेकींच्या घरी जात असू. एका मैत्रिणीच्या हुशार आईने रायआवळे आणि चिंचा अशी मुळीच न ओळखता येणारी खिरापत ठेवून आम्हाला अगदी चकितच केले होते.

मग सगळ्याजणी इकडे तिकडे पांगलो. महाविद्यालयामध्ये गेल्यावर या चिंचा-आवळ्यांची गोडी कमीच झाली. ते कोवळे, निरागस बालपण अभ्यासाच्या मागे धावताना कुठेतरी हरवूनच गेले. सुंदर, सोनेरी आवळ्याचे दिवसही लवकर संपले. वास्तव आयुष्याची लढाई सुरू झाली. आम्ही नवीन बंगला बांधला. तेव्हा शेजारची चिमुरडी मुग्धा आमच्या घरी आली. फ्रॉकमध्ये लपवून तिने आवळे आणले होते. म्हणाली, ""काकू, हे घ्या रायआवळे. तुम्हाला आवडतात का? तुम्हाला रायआवळ्याचे रोप हवेय का? खूप आली आहेत आमच्या बागेत.''

दुसऱ्या दिवशी मुग्धा तीन-चार रोपे घेऊन आली. मी म्हटले, ""तूच लाव गं, तुला हवं तिथे हे रोप.''
तिने नीट विचार करून मागच्या अंगणात रोपे लावली. त्यातल्या एका रोपाने जीव धरला. बघता बघता ते मोठे होऊ लागले. मी अगदी आतुरतेने आवळ्यांची वाट पाहू लागले. मुली हसायच्या. म्हणायच्या, ""रोज काय बघतेस गं? येईल की मोहोर यायच्या वेळी.''

आणि एक दिवस खरेच सगळे झाड चिमण्या हिरव्या मण्यांनी भरून गेले. काय आनंद झाला मला! मग झाड पिवळ्या रसरशीत आवळ्यांनी लगडून गेले. मुली रोज मैत्रिणींसाठी पिशवी भरून आवळे नेऊ लागल्या. दिवस नुसते पुढे पळतच होते. वर्षांतून तीन वेळा माझा आवळा नुसता बहरत होता. पण आता आवळ्याचा सडा पडला तरी तिकडे बघायला ना मला सवड होती, ना तो पूर्वीचा अल्लड उत्साह! मुली लग्न होऊन परदेशी गेल्या. शेजारची मुग्धाही लग्न करून सासरी गेली. बिचाऱ्या आमच्या आवळ्याचे कौतुक करायलाही कोणी नाही उरले! तरी तो मात्र निरपेक्षपणे बहरतोच आहे. परदेशातील छोट्या नातीशी "फेसटाइम' करताना तिला खिडकीतून आवळ्याचे झाड दाखवले. ""आजी. या यलो बेरी कसल्या गं आहेत? किती छान आहेत गं! काय नाव याचे?'' मी हसले. म्हणाले, ""बाळा, हे तर रायआवळे. यलो बेरीज कसले गं!''

परदेशात जन्मलेली, रुजलेली आणि तिथेच वाढणारी तू पोर! या रायआवळ्यांनी तुझ्या आईच्या, मावशीच्या आणि आज्जीच्यासुद्धा आयुष्यात किती मानाचे स्थान पटकावले होते आणि ते बालपण रम्य केले होते ते तुला परदेशी पाखराला कसे गं समजणार!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr jyoti godbole write article in muktapeeth