हॅप्पी न्यू इयर, डॉक्‍टर

डॉ. कपिल झिरपे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

म्हटले तर साधे शुभेच्छांचे शब्द; पण कोणा परिचिताने उच्चारलेल्या शब्दांहूनही ते शब्द अधिक वेगळे होते. आत खोलवर उतरणारे. दरक्षणी जगण्याशी लढणाऱ्या लढवय्याने दिलेल्या त्या शुभेच्छा होत्या.

म्हटले तर साधे शुभेच्छांचे शब्द; पण कोणा परिचिताने उच्चारलेल्या शब्दांहूनही ते शब्द अधिक वेगळे होते. आत खोलवर उतरणारे. दरक्षणी जगण्याशी लढणाऱ्या लढवय्याने दिलेल्या त्या शुभेच्छा होत्या.

मी आमच्या रुबी हॉलमधील अतिदक्षता विभागात माझ्या सहकाऱ्यांसमवेत सकाळच्या "राउंड'वर होतो. नववर्षाचा पहिलाच दिवस असल्याने आमच्यातील प्रत्येकात नवा उत्साह संचारलेला होता. प्रत्येक जण एकमेकास नववर्षाच्या शुभेच्छा देत-घेत होता. मी "आयसीयू'मधील एका रुग्णाजवळ असताना माझी "ज्युनिअर रेसिडेंट' माझ्याकडे येऊन म्हणाली, ""सर, एनटीयूमध्ये अमुक बेडपाशी या ना, प्लीज.'' एक अनुभवी वरिष्ठ म्हणून मला प्रारंभी असे वाटले की, तेथे असणाऱ्या महिला रुग्णाच्या तब्येतीमध्ये काही चढउतार झाला असावा. म्हणून मी तातडीने तिच्यापाशी पोचलो. ती स्थिर, शांत होती. माझ्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य उमटलेले होते. माझी ज्युनिअर लगेच म्हणाली, ""सर, हिला तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यावयाच्या आहेत.'' मी क्षणभर स्तब्ध झालो. त्यानंतर त्वरित स्वतःला सावरून मीही तिचे हात हातात घेऊन तिच्या प्रसन्न शुभेच्छांचा मनापासून स्वीकार केला व तिलाही शुभेच्छा दिल्या. हा सारा प्रसंग अवघ्या पाच-सात मिनिटांत घडून गेला. मात्र, दिवसभर हा प्रसंग माझ्या मनात, डोळ्यांपुढे तरळत राहिला. मला "हॅप्पी न्यू इअर' करणाऱ्या त्या रुग्णाच्या "केस'चा विचार मी करू लागलो.
ती सुमारे एक महिन्यापूर्वी आमच्या अतिदक्षता विभागात दाखल झाली होती. जेव्हा तिला दाखल करण्यात आले, तेव्हा तिची अवस्था अतिशय गंभीर होती.

ओटीपोटामध्ये खूप दुखत होते आणि त्यामुळे उलट्याही होत होत्या. जेव्हा ती दीर्घकाळापर्यंत आयसीयूमध्ये होती, तेव्हा तिची तब्येत खूपच बिघडली. इतकी की, जवळपास सहा शस्त्रक्रिया करण्याची, तसेच कृत्रिम श्वासोच्छवासाचीही गरज लागली होती. इतके घडत असतानाही ती कायम हसतमुख असायची. तिला वेदना होत असतीलच, तरीही चेहऱ्यावर दिसायचे ते हास्यच. तिने उपचारालाही चांगले सहकार्य केले. या सर्व प्रक्रियेदरम्यान आम्हा डॉक्‍टर आणि रुग्णात एक अदृश्‍य असे नाते तयार झाले. एकमेकांशी एकही शब्द न बोलता केवळ डोळ्यांतून संभाषण व्हायचे. हे म्हणजे एकेरी वाहतुकीसारखे होते. मला बोलता यायचे; पण ती व्हेंटिलेटरवर असल्याने तिला बोलता येत नसे. त्यामुळे ती डोळ्यांतून खूप बोलत असे.
हा सारा पट माझ्या नजरेपुढून सरकत होता.

आज नव्या वर्षाचा पहिला दिवस होता. सोमवार. मी मुद्दामहून सोमवारचा उल्लेख करतो आहे. कारण, दुर्दैवाने जवळपास दर रविवारी तिला गंभीर समस्या किंवा त्रास होत होता. अगदी कालच्या रात्री म्हणजे 31 डिसेंबरच्या रात्री, पुन्हा रविवारच, तिच्या ओटीपोटातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी एकदम खाली म्हणजे सहा ग्रॅमपर्यंत खाली उतरली होती. या परिस्थितीत, आमच्या टीमने रात्रभर शक्‍य तितके सगळे प्रयत्न केले आणि पहाटेपर्यंत तिला स्थिर करण्यात त्यांना यश आले. रुग्णाची या काळातील मानसिकता कशी असते, हे मला जवळून माहिती आहे. काल रात्रभर आणि आज सकाळीही ती झोपली नव्हती. तरीही ती मला तिच्या डोळ्यांतून आणि स्मितहास्यातून नवीन वर्षाच्या आम्हाला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खूप उत्सुक होती. ती बोलू शकत नव्हती; पण तिचे डोळे बोलत होते, तिचे हसणे बोलके होते. जणू काल रात्री काही घडलेच नव्हते; हे कुठल्याही शास्त्रापलीकडचे आहे. कुठून आणत असेल ही इतकी ऊर्जा?
तिच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप खास होत्या. रुग्ण आणि डॉक्‍टर यांच्यातील नात्यासाठी आपण नेहमी ज्याचा उल्लेख करतो, तोच हा ऋणानुबंध ना!... काही मिनिटांच्या प्रसंगाने मला विचार करायला भाग पाडले. म्हटले तर साधे शुभेच्छांचे शब्द; पण कोणा परिचिताने उच्चारलेल्या शब्दांहूनही ते शब्द अधिक वेगळे होते. आत खोलवर उतरणारे. दरक्षणी जगण्याशी लढणाऱ्या लढवय्याने दिलेल्या त्या शुभेच्छा होत्या.

बावीस वर्षांच्या आयसीयूमधल्या कामाच्या अनुभवानंतरही प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी नवीन असतो आणि मला मानवी मूल्य शिकवितो. आयसीयूमधील रुग्ण त्यांच्या प्रत्येक श्वासासाठी झगडत असतात, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा नवीन वर्षाचा पहिला दिवसच असावा. या जगात त्यांच्यासाठी पहिला दिवस उगवत असतो. त्यांच्या आयुष्यातील एक नवी पहाट. त्या पहाटेच्या प्रकाशात ते पहिली किलबिल अनुभवत असतील. पहिली तांबडरेषा पाहात असतील. गुरांचे हंबर ऐकत असतील. रहाटावरची किणकिण त्यांच्या कानी पडत असेल. पाटाच्या पाण्याची झुळझुळ दिसत असेल. सांगायचे इतकेच की, त्यांच्यासाठी नव्या आयुष्यातील पहिला नवा दिवस असेल, तर मग आपण त्यांना रोज सकाळी का नाही शुभेच्छा देत?
दिवसभर माझा पाठलाग चालवला होता त्या चार शब्दांनी - हॅप्पी न्यू इयर, डॉक्‍टर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr kapil zirpe write article in muktapeeth