आधार लेकीचा होता...

आधार लेकीचा होता...

वासंती उघड काही बोलत नव्हती, पण तिचे मन मात्र तिला खात होते. मुलाचे कौतुक करताना मुलीकडे सतत दुर्लक्ष करीत आली ती आणि आता लेकीचाच तिला आधार होता. पोटी मुलगी दिल्याबद्दल तिने देवाचे मनोमन आभार मानले.

वासंती... माझी बालपणापासूनची मैत्रीण. वाड्यात एकत्र राहिलेलो, खेळलेलो. पुढे वासंती बॅंकेत नोकरी करू लागली व मी वैद्यकीय क्षेत्र निवडले. मधे बराच काळ लोटला. दोघींनाही एकमेकींची खबरबात नव्हती.

एकदा रुग्णालयात "राउंड'साठी गेले असताना माझ्या रुग्णाच्या शेजारील बेडवर वासंतीसारखी चेहरा दिसला. माझ्याकडे बघून क्षीण हसणारा. म्हणून मुद्दाम निरखून पाहिले तर ती वासंतीच होती. अतिशय खंगलेली. हाडांवर कातडी ताणून बसवावी तशी. शेजारी पस्तिशीची मुलगी उभी. चिंताग्रस्त चेहरा. वासंतीचीच मुलगी वृंदा! जुजबी चौकशी केल्यावर तिला "लास्ट स्टेज ऑफ कॅन्सर' होता हे कळले. काही मदत लागली तर आवर्जून सांग, असे तिच्या मुलीला सांगून मी काढता पाय घेतला; पण मनात विचारांचे काहूर माजले होते. आमच्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन केला.
वासंतीचे लग्न होऊन ती पुण्यातच राहात होती. तिला दोन मुले... मोठी वृंदा व धाकटा वैभव. चौकोनी खाऊन - पिऊन सुखी कुटुंब! पण नियतीच्या मनात काही वेगळेच दडलेले असते. अचानक अपघातात तिचे पती गेले. मुले लहान! वासंतीचे वडील व भाऊ पुण्यातच राहणारे. आईविना असलेले मोठे घर. त्यामुळे त्यांनी वासंतीला मुलांसकट त्यांच्याकडेच राहावयास बोलाविले. वासंतीला भक्कम आधार मिळाला व घराला बाईमुळे येणारे घरपण मिळाले.

वासंतीने नोकरी करीत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. वैभव हा वृंदापेक्षा दिसायला छान, शिक्षणात हुशार, शिवाय धाकटा, त्यामुळे घरात सर्वांचाच लाडका. याउलट वृंदा सर्वच बाबतीत मध्यमगती. त्यामुळे थोडीशी दुर्लक्षितच राहिलेली. यथावकाश वृंदा पदवीधर झाल्यावर स्थळे पाहणे सुरू झाले; पण जी स्थळे तिला पसंत असत तेथे त्यांचा नकार येई. ज्यांचा होकार येई ती स्थळे वृंदाला पसंत नसत. चार-पाच वर्षे गेली तरी वृंदाबाई काही बोहल्यावर चढेनात. वासंती वृंदाच्या या नकारघंटेमुळे त्रासून गेली. तिने वृंदाचा नादच सोडून दिला. त्यांच्यातील संवादही कमी झाला. याउलट वैभव सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला. त्याने परस्पर लग्नही ठरविले व ते थाटात पार पडले. त्यामुळे वासंती खूश झाली. लग्नानंतर वैभवला आजोळी राहाणे प्रशस्त वाटेना म्हणून वासंतीने स्वतःकडील सर्व पुंजी घालून नवीन फ्लॅट घेतला. तोदेखील मोठ्या मनाने वैभवच्या नावावर! मंडळी तिकडे शिफ्टही झाली. वृंदाने आजोळीच राहाणे पसंत केले.
वासंती नोकरी सांभाळत घरातीलही सर्व पाही, तोपर्यंत सर्व छान चालले होते. वासंती निवृत्त झाल्यावर मात्र तिचा महिन्याचा पगार थांबल्यावर घरातील वातावरण बदलू लागले. वैभवने दुसरीकडे फ्लॅट भाड्याने घेतला व त्याच्या कुटुंबासह तिकडे प्रस्थान ठेवले. अर्थात, या कुटुंबात वासंतीचा समावेश नव्हता. तिला धक्काच बसला. "पत्नीला तू नको आहेस आणि मला मात्र पत्नी हवी आहे', असे साधे-सरळ, सुटसुटीत उत्तर देऊन वैभवने प्रश्‍न सोडविला.

वासंती एकटीच त्या फ्लॅटमध्ये राहू लागली. तिचे वडीलही थकले होते, शिवाय भावानेही परदेशी मुलीशी लग्न केले होते. त्यामुळे वडिलांच्या त्या घरात आता परत जाणे तिला शक्‍य नव्हते. एकटेपणामुळे घर खायला उठे. आताशी तिला खूप थकवा येऊ लागला होता. रोज जुलाब होत, पोट दुखे. आपण मानसिकदृष्ट्या खचलो आहोत व त्याने हे होत असावे, असे तिला वाटे. अखेर एका मैत्रिणीने तिला बळजबरीने रुग्णालयात नेले, तर हे कर्करोगाचे निदान झाले. शस्त्रक्रिया.. केमोथेरपी.. सर्व चक्र सुरू होणार! मैत्रिणीने वृंदाच्या कानावर ही गोष्ट घालताच ती पोर मायेने पळत आली. आजोळ सोडून आईपाशीच राहिली. त्यात कर्तव्याचा भाग नव्हता, तर फक्त आईविषयीचं प्रेम म्हणून! वृंदाने आईच्या आजाराबद्दल वैभवला कळविले; पण वैभवला आईकडे यायला वेळ नव्हता. तो ट्रीटमेंटच्या खर्चाबद्दल म्हणाला, ""आई राहाते तो फ्लॅट माझ्या नावावर आहे. तो विकून उपचाराचा खर्च करता येईल. आईला आश्रमात ठेवता येईल; पण सध्या मी खूप बिझी आहे. मला वेळ होईल तेव्हा मी हे करीन.''

वृंदाने भावाशी कोणताही वाद घातला नाही. आईशीही काही बोलली नाही. वासंतीचे जे काही चार दिवस शिल्लक होते, ते छान जावेत असा वृंदा प्रयत्न करीत होती. वासंती उघड काही बोलत नव्हती; पण तिचे मन मात्र तिला खात होते. मुलावरच्या आंधळ्या प्रेमापोटी आपण सतत मुलीकडे दुर्लक्ष केले... तिला समजून घेतले नाही... आणि आता तीच लेक किती आधार देते आहे. पोटी मुलगी दिल्याबद्दल तिने देवाचे मनोमन आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com